...आणि संशोधन शिक्षणाच्या खिडक्या उघडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 07:04 AM2018-10-15T07:04:17+5:302018-10-15T07:05:21+5:30

‘ शिक्षण’ म्हणजे शाळा, हे समीकरण आपल्या डोक्यात पक्के बसलेले, किंबहुना बसवलेले असते. शाळेत शिकवितात ते म्हणजेच शिक्षण , ...

... and opened the education window of research | ...आणि संशोधन शिक्षणाच्या खिडक्या उघडल्या

...आणि संशोधन शिक्षणाच्या खिडक्या उघडल्या

Next

शिक्षण’ म्हणजे शाळा, हे समीकरण आपल्या डोक्यात पक्के बसलेले, किंबहुना बसवलेले असते. शाळेत शिकवितात ते म्हणजेच शिक्षण, असा आपला (गैर) समज अगदी लहानपणापासूनच झालेला असतो. मग शिक्षण म्हणजे फक्त पुस्तके-वर्ग-शिक्षक-शाळा-परीक्षा-निकाल एवढ्यापुरतेच मर्यादित राहते, परंतु यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या जीवनप्रवासात शिक्षणाचा मोठा वाटा असायला हवा, यावर माझा विश्वास आहे. खरे तर शिकण्याची आणि शिकविण्याची प्रक्रिया आनंददायी असेल, तर हा आनंद मुलांना जगण्याच्या मूल्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. या घुसळणीमधून मिळणारे वेगवेगळे दृष्टिकोन घेऊन जगाकडे चौकस नजरेतून बघता येऊ शकते, म्हणूनच अशा शिक्षणाची आज आपल्याला नितांत आवश्यकता आहे.


कॉलेजमध्ये मुले वर्गात बसत नाहीत, शिकविण्याकडे लक्ष देत नाहीत, अशी ओरड सतत सुरूच असते. मुलांवर सरसकट चूक-बरोबर अशा फुल्या न मारता, कधीतरी फक्त त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायला, आपण तरी उपलब्ध असतो का? खरे तर या वयातल्या मुलांच्या भावविश्वाला समजून घ्यायला आपणच कमी पडतो. या वयात त्यांची जी मानसिक घुसळण होतेय, त्याची आपल्याला क्वचितच जाणीव असते. एकीकडे त्यांच्यावर माहितीचा प्रचंड मारा केला जातोय, तर दुसरीकडे खूप साऱ्या अनुभव आणि घटनांना त्यांना एकट्यानेच सामोरे जावे लागतेय. चांगले काय, वाईट काय, हे कळण्याच्या आधीच ते त्यात खोल गुरफटलेले असतात. अशा वेळी भावनेचा ओलावासुद्धा सगळ्यांनाच मिळतो, असे नाही.


सिडने हैरिस यांनी शिक्षणाची सुंदर व्याख्या केलीय, ते म्हणतात, ळँी ६ँङ्म’ी स्र४१स्रङ्म२ी ङ्मा ी४िूं३्रङ्मल्ल ्र२ ३ङ्म ३४१ल्ल े्र११ङ्म१२ ्रल्ल३ङ्म ६्रल्लङ्मि६२... म्हणजे आरशांना/काचांना खिडक्यांमध्ये परावर्तित करणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असतो. स्वत:कडे, स्वत:च्या जीवन प्रवाहाकडे आणि सोबतच सभोवतालाकडे चिकित्सक नजरेने बघायला सुरुवात झाली की, निरंतर शिक्षणाची ही प्रक्रिया सुरू होते. हे सभोवतालचे जगच शाळा आणि अनुभव शिक्षक होतात.


मुंबईत असाच एक शिकण्या-शिकविण्याचा अभिनव प्रयोग ‘पुकार’ (पार्टनर्स फॉर अर्बन नॉलेज, अ‍ॅक्शन अ‍ॅण्ड रिसर्च) या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेने तरुणांसाठी चालविला आहे. तरुण मुलांमध्ये चिकित्सक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांनी स्वत:च्या जीवनाबरोबरच समाजाचाही सखोल विचार करायला सुरुवात करावी आणि अनुभवाधारित शिक्षणातून तरुणांची विवेकी वृत्ती विकसित व्हावी, या मुख्य हेतूंपर्यंत पोहोचण्यासाठी ‘कृती-संशोधन’ या माध्यमाचा उपयोग करावा असे ठरले. ‘संशोधन हा प्रत्येकाचा हक्क आहे’ या तत्त्वाला धरून, ‘पुकार’ मुंबईच्या वस्ती-तळीवर आतापर्यंत अनेक कार्यक्रम करत असल्यामुळे या हेतूंच्या सिद्धीसाठी ‘कृती-संशोधन’ हा उत्तम मार्ग असू शकतो, यावर आम्हा सर्वांचा विश्वास होता. वर्षभर तरुणांनी एकत्र येऊन वस्ती-पातळीवर गट-संशोधन करायचे, हे या उपक्रमाचे स्वरूप.


या अनुभवाधारित शिक्षण प्रक्रियेची सुरुवात ‘स्व’ भानातून होते आणि ‘समाज’ भानापर्यंत पोहोचते. त्यांचे संशोधन तर एका वर्षात संपते, पण विचारांची ही चाके अशीच अविरत सुरू राहतात. मग त्यांच्या खुल्या झालेल्या या खिडक्या अधिकच रुंदावत जातात आणि ही मुले नवनवीन क्षितिजे धुंडाळण्यासाठी खिडकीबाहेर कधीच झेपावलेली असतात.

सुनील गंगावणे । प्रकल्प संचालक, पुकार

Web Title: ... and opened the education window of research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.