... and Amritpaya was brought in the mouth! | ...अन् अमृतप्याला तोंडाशी लावला !

तातडीने व्हिडीओ कॉलिंग करण्याच्या इंद्रदेवांच्या निरोपाने इंद्रलोकचा मराठीभूमीवरील स्टार रिपोर्टर यमके (एम.के.- अर्थात मनकवडे) पुरता हादरून गेला. दादांच्या खड्डा यात्रेपासून आजपर्यंतच्या सर्व घडामोडींचा रिपोर्ट वेळेत देऊनही इंद्रदेवांना आता आपल्याशी कोणत्या विषयावर बोलायचंय, याचा शोध तो घेऊ लागला. नाथाभाऊंनी गर्दभ ज्ञातीस दिलेले आव्हान, राजसाहेबांनी डीएसकेंना दिलेली क्लीन चिट, कराडभूमीत पवारसाहेबांनी उद्धवराजांना दिलेला फेव्हिकॉलचा झटका आणि राजांनी त्यावर केलेला झंडूबामटाईप उपचार याशिवाय उद्धवराजांनी कोकण नरेश दादांच्या राज्यारोहणाला घातलेला खोडा. हे सगळे रिपोर्ट्स देऊनही आता इंद्रदेव कशाची माहिती मागताहेत? भीत भीतच यमकेने इंद्रदेवांना व्हिडीओ कॉलिंग केले. इंद्रदेवांनी क्रोधातच कॉल घेतला आणि म्हणाले, ‘किती वेळ झाला मी ट्राय करतोय. तुझा कॉल कनेक्ट का होत नाही? असू दे आता मी नारदांना सूचना दिल्या आहेत. त्यांच्याकडूनच मोहिमेची माहिती घे.’ एवढे बोलून देवांनी फोन कट केला. केवळ ब्रह्मांडातील अमेरिका व चायनाचे सॅटेलाईट भारतासारखे ‘सहिष्णू’ नसल्यामुळेच आपला फोन देवाला कनेक्ट झाला नाही, याचा यमकेला राग आला. त्याने नारदांशी संपर्क साधला. नारदांनी दिलेल्या सूचनेवरून इंद्रदेव यमकेला का कॉन्टॅक्ट करत होते हेही समजले. त्याचे घडले असे, स्वर्गलोकातील पर्यावरणवाद्यांनी अचानक संप पुकारला. मागणी मान्य झाल्याशिवाय अमृताचा एक थेंबही न घेण्याची धमकीच त्यांनी इंद्रदेवांना इंद्रलोकी मेल पाठवून दिली होती. इंद्रदेव मात्र मराठीभूमी संदर्भातील तो विषय असल्याने यमकेने कन्फर्म केल्याशिवाय स्वर्गलोकातील पर्यावरणवाद्यांची मागणी मान्य करायला तयार नव्हते. मागणी अशी होती, न्यायराजांनी प. महाराष्टÑातील वाळू उपसा बंद केल्यामुळे कुपोषण होऊन पोट खपाटीला लागल्याने तिथल्या वाळूमाफियांनी आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळविला या कृतीने पर्यावरण धोक्यात येणार असून, जोवर प्रशासनाला ते रोखण्याची सद्बुद्धी इंद्रदेव देणार नाहीत तोवर अमृताचा थेंबही ते घेणार नाहीत. अखेर यमकेने इंद्रदेवांना कन्फर्मेशन दिले आणि स्वर्गलोकातील पर्यावरणवाद्यांनी अमृतप्याला तोंडाला लावला.