अमित शहा यांची ‘चाणक्यनीती’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 08:05 AM2018-07-12T08:05:28+5:302018-07-12T08:07:10+5:30

भ्रष्टाचार राहणारच. हे आर्य चाणक्यांनी मांडले आहे, असे सांगून २०१४ च्या ‘भ्रष्टाचारमुक्ती’च्या आश्वासनावर अमित शहा यांनी चाणक्यनीतीचाच जणू ‘दाखला’ दिला. 

Amit Shah's 'Chanakyaneeti'! | अमित शहा यांची ‘चाणक्यनीती’!

अमित शहा यांची ‘चाणक्यनीती’!

googlenewsNext

- विजय बाविस्कर

आपली गुपिते कधीही कुणाला सांगू नका, ही प्रवृत्ती तुमचा विनाश करू शकते, हा आर्य चाणक्याचा सर्वात मोठा गुरुमंत्र. त्यामुळे  ‘आर्य चाणक्य- जीवन आणि कार्य - आजच्या संदर्भात’ या व्याख्यानात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपाच्या पुढील रणनीतीची काही गुपिते उघड करतील, अशी अपेक्षाही नव्हती. परंतु, शहा यांच्या भाषणात उपस्थितांनी अर्थ लावलाच. त्याला कारणही होते. चाणक्यांचे वचन उद्धृत करून शहा जेव्हा म्हणाले, की चोवीसशे वर्षांपूर्वी आर्य चाणक्यांनी सांगितले, की राजाचा पुत्र ‘सुझबुझवाला’ नसेल तर त्याला कधीही राजा बनविता कामा नये. घराणेशाहीला महत्त्व न देता जो श्रेष्ठ  आहे, राष्ट्रीयच्या हिताचा आहे त्याचीच निवड केली पाहिजे. हे कोणासाठी होते हे सुज्ञांना सांगण्याची गरज नाही. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रधानसेवक’ शब्दाचे मूळ शहा यांनी चाणक्यनीतीत शोधले तेव्हा तर भारतीय जनता पक्षाचे हे चाणक्य कशासंदर्भात बोलत आहेत, हे उपस्थितांच्या ‘व्यवस्थित’ लक्षात आले. सर्व जनतेला सोबत घेऊन त्यांचा विकास करायला हवा. शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचविण्यासाठी चाणक्यांनी नीती तयार केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देत चाणक्यनीतीचा अवलंब केला आहे. 

शहा यांनी राजकीय भाष्य करण्याचे टाळतानाही टोकदार भूमिका मांडलीच. ‘परिवारवादका विच्छेदन और क्षमता के आधार पर नेतृत्व’ हा तर त्यांचा सिक्सरच होता. त्यामुळेच ‘सत्य हे मौन असते’ आणि ज्या असत्याचा सर्व जण स्वीकार करतात तेच सत्य असते, असे शहा म्हणाले तेव्हा उपस्थित बुचकळ्यातच पडले आणि आपापल्या परीने याचा अर्थ शोधू लागले. ‘आमच्या राज्यात भ्रष्टाचार नाही,’ असे कोणताही राजा म्हणत असला तरी ते सत्य नाही. हे जिभेवर मध दिल्यानंतर तो गोड लागत नाही, असे म्हणण्यासारखे आहे. भ्रष्टाचार हा शाश्वत आहे. त्यामुळे कोणतेही राज्य त्यापासून सुटलेले नाही. भ्रष्टाचार राहणारच. हे आर्य चाणक्यांनी मांडले आहे, असे सांगून २०१४ च्या ‘भ्रष्टाचारमुक्ती’च्या आश्वासनावर अमित शहा यांनी चाणक्यनीतीचाच जणू ‘दाखला’ दिला. 

चाणक्य ही व्यक्ती कोण होती आणि मुख्य म्हणजे खरी होती का? याविषयी इतिहासकारांमध्ये अद्यापही वाद आहेत. परंतु, भारतीय जनमानसात चाणक्याविषयी प्रचंड कुतूहल आणि त्याच्या राजकीय तत्वज्ञानाविषयी आदर आहे. त्यामुळेच राजकारणातील एखाद्या ‘मास्टरस्ट्रोक’ला चाणक्यनीती म्हटले जाते. भारतीय जनता पक्षाच्या एकंदर विचारधारेत भारतीय गौरवशाली परंपरेचे विशेष महत्त्व असल्याने त्यांच्यासाठी तर चाणक्य आणखीच महत्त्वाचा ठरतो. गेल्या चार वर्षांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूंविषयी शंका घेतल्या गेल्या नसल्या तरी या सरकारला राज्यकारभार करता आला नाही, असा एक आरोप केला जातो. त्यालाही उत्तर देण्यासाठी आम्ही ‘चाणक्यनीती’चा अवलंब करतोय, असे सांगण्याची ही सुरुवात तर नाही ना? चाणक्याचे राज्यकर्त्यांशी संबंधित असलेले विचार हे कूटनीती, कर्तव्यकठोरता आणि विजिगिषु वृत्तीसाठी ओळखले जातात. ‘विकासपुरुष’ या २०१४ च्या मोदींच्या परंपरेला चाणक्यनीतीमध्ये रंगवून ‘सुशासक’ म्हणून न्यायचा तर भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न नाही ना, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारले जाऊ शकतात. 

आर्य चाणक्यांच्या जीवनातील सोनेरी पान म्हणजे पाटलीपुत्रावरील विजय. यासाठी त्यांनी नंद घराण्याविरोधात असलेल्यांची मोट बांधली. यामध्ये हिमालयपुत्रासारखे बलाढ्यही होते ज्यांना पाटलीपुत्राचा सम्राट होण्याची इच्छा, ताकद आणि योग्यताही होती. मात्र, चंद्रगुप्ताला गादीवर बसविण्यासाठी या सगळ्यांना चाणक्यांनी अत्यंत चतुराईने दूर केले. दुसºया बाजूला नंद घराण्याची ताकद असलेल्या अमात्य राक्षसाला आपल्या बाजूने वळवून घेऊन पुढील काळात सशक्त विरोध राहणार नाही, याची काळजीही घेतली. याबाबत मात्र शहा यांनी काहीही भाष्य केले नाही.

 राजनीतीवरील विचार महत्त्वाचे असले तरी त्यापेक्षा जास्त ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ अधिक महत्त्वाचे आहे.  ‘संपूर्ण एक भारतवर्ष’ हे चाणक्याचे स्वप्न आणि करांबाबत तर अनेक सुधारणा त्यांनी केल्या. मात्र, तरीही नोटाबंदी आणि जीएसटीच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी आपल्या भाषणात अर्थशास्त्राचा उल्लेख मात्र आवर्जून टाळला. याचीही चर्चा जाणकार आणि अभ्यासकांमध्ये सुरू आहे. 

Web Title: Amit Shah's 'Chanakyaneeti'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.