अमेरिकेस दुटप्पी पाकिस्तान उशिराने उमगला

By विजय दर्डा | Published: January 8, 2018 12:39 AM2018-01-08T00:39:37+5:302018-01-08T00:44:02+5:30

अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध आलबेल नाहीत, याचे संकेत ब-याच दिवसांपासून मिळत होते. परंतु अमेरिकेचे ट्रम्प प्रशासन एवढे कठोर पाऊल उचलेल याची कल्पना कदाचित पाकिस्तानलाही नसावी.

America's long-awaited Pakistan soon | अमेरिकेस दुटप्पी पाकिस्तान उशिराने उमगला

अमेरिकेस दुटप्पी पाकिस्तान उशिराने उमगला

Next

अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध आलबेल नाहीत, याचे संकेत ब-याच दिवसांपासून मिळत होते. परंतु अमेरिकेचे ट्रम्प प्रशासन एवढे कठोर पाऊल उचलेल याची कल्पना कदाचित पाकिस्तानलाही नसावी. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक जाहीर केले की, गेल्या १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलर मदतीदाखल दिले. पण त्याबदल्यात अमेरिकेच्या वाट्याला फक्त खोटेपणा व फसवणूकच आली! दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला मदत करत राहिली, पण पाकिस्तान मात्र दहशतवाद्यांना आश्रय देत राहिले. आता हे बस्स झाले! लगोलग अमेरिकेने पाकिस्तानला द्यायची १.१५ अब्ज डॉलरची सुरक्षाविषयक मदत थांबविल्याची बातमीही आली. ही बंदी किती काळासाठी आहे, हे स्पष्ट नाही. अमेरिकेने कितीही पश्चात्ताप झाल्याचा आव आणला तरी अफगाणिस्तानात जमिनीवरून पोहोचायचे असेल तर पाकिस्तानची मर्जी राखावीच लागेल, हे अमेरिका पुरेपूर ओळखून आहे.
अमेरिकेच्या मरिन कमांडो तुकडीने मे २०११ मध्ये पाकिस्तानात घुसून तेथे लपून बसलेल्या ओसामा बिन लादेनला टिपले तेव्हा भयकंपित होऊन पाकिस्तानने अफगाणिस्तानला जाणारा रस्ता रोखला होता, हे आपल्याला आठवत असेल. त्यावेळी अमेरिकेच्या सैन्य तुकड्यांना बºयाच अडचणी सोसाव्या लागल्या होत्या. मात्र आता पाकिस्तान असे काही करण्याचे धाडस करेल, असे मला वाटत नाही.
याचे कारण असे की, सध्या अमेरिका संतप्त आहे. पाकिस्तानने अफगाण तालिबान व हक्कानी नेटवर्क यासारख्या दहशतवादी शक्तींना आश्रय दिल्याचा अमेरिकेने स्पष्ट आरोप केला आहे. अशावेळी पाकिस्तानने ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला तर ट्रम्प प्रशासन कोणत्याही थराला जाऊ शकेल.
खरे तर, मदत देणे थांबवून अमेरिका पाकिस्तानला दुहेरी संदेश देऊ पाहात आहे. एक तर अफगाणिस्तानात डोकेदुखी ठरलेल्या दहशतवादी शक्तींना नष्ट करण्याचा संदेश आहे. दुसरा संदेश आहे, पाकिस्तानने चीनच्या पूर्णपणे कह्यात न जाण्याचा! चीनने पाकिस्तानात हात-पाय पसरणे आपल्या हिताचे ठरणार नाही, याची अमेरिकेस चिंता आहे. पाकिस्तानलाही याची कल्पना आहे. परंतु त्याला हेही पक्के माहीत आहे की, भारताच्या विरोधात चीन जशी साथ देतो तशी अमेरिका आपल्याला देणार नाही. भारताशी अमेरिकेने सलगी करणे आपल्याला पसंत नाही, हे पाकिस्तानला दाखवायचे आहे. म्हणजेच हे प्रकरण ओढाताणीचे आहे. यात जो जेवढी चलाखी करेल तेवढा त्याचा फायदा होईल.
मग, आपण भारतीयांनी अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील या तणातणीने खूष व्हावे का? पाकिस्तान त्यांच्या भूमीवर वावरणाºया दहशतवादाला वेसण घालेल, अशी आशा आपण करू शकतो का? काश्मीरच्या बाबतीत याचा आपल्याला काही फायदा होईल का? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे की, आपण घाईगर्दीने कोणतेही मत बनविणे शहाणपणाचे होणार नाही. खरोखरच पाकिस्तानला पुढील काही वर्षे अमेरिकेकडून मदत मिळणे बंद झाले तर त्याचा परिणाम पाकिस्तानच्या सैन्यशक्तीवर नक्की होईल.
आर्थिक मदतीच्या बाबतीत अमेरिकेची जागा घेण्याएवढा चीन उदार नाही. वास्तवात पाकिस्तान स्थापन झाले तेव्हापासूनच अमेरिका या देशाला मदत देत आली आहे. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला झाल्यापासून पाकिस्तान अमेरिकेचा सहयोगी झाला व त्याबदल्यात अमेरिका मदत देत आली. ‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट’ हा अमेरिकेतील बुद्धिजीवी मंच व अमेरिकी काँग्रेसच्या अहवालानुसार २००२ पासून २०१५ पर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला ३९ अब्ज ९३ कोटी डॉलर दिले.
दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आपण जो पैसा देत आहोत त्याचा पाकिस्तान दुरुपयोग करते, याचीही अमेरिकेला सुरुवातीपासून जाणीव आहे. ज्यांच्यापासून खुद्द आपल्याला धोका आहे अशाच दहशतवादी संघटनांविरुद्ध पाकिस्तानने कारवाई केली. दुसरे असे की, ज्यांचा भारताविरुद्ध वापर केला जाऊ शकतो, अशा दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठीही पाकिस्तानने अमेरिकेकडून मिळणाºया या पैशाचा उपयोग केला.
मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांची सूत्रे पाकिस्तानमधून हलविली गेली, याचे पक्के पुरावे अमेरिकेकडे आहेत. यात हाफीज सईदचे नाव सर्वात वर येते. अमेरिकेने हाफीज सईदला जागतिक दहशतवादी घोषित करून त्याच्यावर कोट्यवधी डॉलरचे इनामही लावले असले तरी या हाफीज सईदला जेरबंद करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर कितपत दबाव टाकला? मुळीच नाही!
अमेरिकेने खरंच मनावर घेतले असते तर हाफीज सईद त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत कधीच तुरुंगात गेला असता. त्यामुळे आपण ज्या दहशतवादाने पोळले जात आहोत तो निपटून काढण्यात अमेरिकेला फारसे स्वारस्य नाही, असे आपण म्हणू शकतो. अमेरिकेला फक्त स्वत:च्या हिताची चिंता आहे. आपण दिलेले लष्करी साहित्य पाकिस्तान भारताविरुद्ध वापरते हेही अमेरिकेला पक्के माहीत आहे.
आता अमेरिका भारताशी मैत्री करत आहे त्याचे खरे कारण चीन, रशिया हे आहे. अमेरिकेपुढे खरे आव्हान या दोन देशांचे आहे. त्यामुळे जगाच्या या भागात आपल्या हाताशी एक शक्ती असावी म्हणून अमेरिका भारताला जवळ करत आहे. आपल्याला सावध राहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही, हे आपल्याला अमेरिकेस स्पष्टपणे जाणवून द्यावे लागेल.
मी खास करून पाकिस्तानच्या बाबतीत असे म्हणेन की, त्याने डोळे उघडे ठेवायला हवेत. आपल्या जनतेच्या हिताची काळजी करायला हवी. इतरांना त्रास देण्यासाठी ज्या दहशतवादास पाकिस्तान थारा देत आहे तो अखेरीस आपल्याही मुळावर उठेल, याचे भान पाकिस्तानने ठेवायला हवे.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
अलीकडेच मी इस्रायलचा दौरा केला. तेथे बरेच लोक भेटले. त्यांच्याशी गप्पागोष्टी झाल्या. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावास भारताने संयुक्त राष्ट्रसंघात विरोध का केला, असे मला तेथे अनेकांनी विचारले. भारत तर इस्रायलचा मित्र आहे. बरं, अरब देशांना नाराज करायचे नव्हते तर भारत त्या मतदानाच्या वेळी अनुपस्थितही राहू शकला असता. भारताने घेतलेल्या या भूमिकेने इस्रायलमध्ये खूप नाराजी आहे, असे मला जाणवले.

Web Title: America's long-awaited Pakistan soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.