अफवा-ए-आजम

By संदीप प्रधान | Published: July 13, 2018 12:21 AM2018-07-13T00:21:12+5:302018-07-13T00:21:28+5:30

खंडू कात्रेकरनं धापा टाकत कार्यालय गाठलं तेव्हा रिसेप्शनिस्ट मारियानं त्याच्याकडं पाहून नकारार्थी मान हलवली. खंडू, बॉस उखडा है तुम पे... हे मारियाचे शब्द खंडूच्या कानांत शिरताच त्याच्या पोटात खोलवर खड्डा पडला. आज पुन्हा दिवस खराब जाणार, या कल्पनेनं तो कासावीस झाला. खंडू टेबलवर जाऊन बसला, तर किशोर जमदग्नी आपल्या जाड काचेच्या चष्म्यातील बटाट्याएवढ्या डोळ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर काहीतरी न्याहाळत होता.

 Afwa-e-Azam | अफवा-ए-आजम

अफवा-ए-आजम

खंडू कात्रेकरनं धापा टाकत कार्यालय गाठलं तेव्हा रिसेप्शनिस्ट मारियानं त्याच्याकडं पाहून नकारार्थी मान हलवली. खंडू, बॉस उखडा है तुम पे... हे मारियाचे शब्द खंडूच्या कानांत शिरताच त्याच्या पोटात खोलवर खड्डा पडला. आज पुन्हा दिवस खराब जाणार, या कल्पनेनं तो कासावीस झाला. खंडू टेबलवर जाऊन बसला, तर किशोर जमदग्नी आपल्या जाड काचेच्या चष्म्यातील बटाट्याएवढ्या डोळ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर काहीतरी न्याहाळत होता. त्यानं आपला मोबाईल टेबलाखाली धरला होता. मात्र, जेव्हा किशोर आपली जीभ वरच्याखालच्या दातांमध्ये घट्ट दाबून बसल्याबसल्या पायापाशी पाहात असतो, तेव्हा तो व्हॉट्सअ‍ॅपवर काहीतरी न्याहाळतोय, हे खंडू ओळखायचा. तेवढ्यात, कार्यालयातील शिपाई गणोजी आला आणि आजूबाजूच्या साऱ्यांना ऐकू जाईल, अशा आवाजात कात्रेकर, आज तुमची सुटी होणार. केबिनीतला रावण लय खवसलाय, अशी दवंडी पिटून गेला. खंडूच्या हातापायांतील त्राण गेलंं. साहेब कशामुळं भडकला असेल, याचा मनातील गुंता तो सोडवू पाहत असताना त्याला एक शक्कल सुचली. त्यानं किशोरला हाक मारली. किशोरनं वर पाहताच खंडू बोलला की, अरे, आज साहेबाचा वाढदिवस आहे. दे की त्याला शुभेच्छा. लागलीच किशोरनं फुलांच्या ताटव्यासह केक, पेस्ट्री, आईस्क्रीमसह शुभेच्छा दिल्या. किशोरचा मेसेज पडताच साहेबाचा फोन मेसेजने टणटण वाजत राहिला. आता खंडूच्या डोक्यात वेगळंच चक्र फिरू लागलं. तेवढ्यात, एका सप्लायरच्या आलेल्या फोनवर त्यानं साहेबांना शुभेच्छा दिल्या का, अशी दबक्या आवाजात माहितीवजा सूचना केली. आता केबिनमधील साहेबाचा फोन खणखणू लागला. पर्चेस आॅफिसर असल्यानं झाडून साºया पुरवठादारांमध्ये वाढदिवसाची खबर पसरली. व्हॉट्सअ‍ॅपच्या वेगवेगळ्या ग्रुपवर आपला वाढदिवस नाही, हे सांगून साहेब थकला. मात्र, तरीही शुभेच्छांचा महापूर थांबता थांबला नाही. हे कमी म्हणून की काय, फोनचा रतीब सुरू झाला. युनियनच्या नेत्यांना हे समजताच त्यांनी भलामोठा पुष्पगुच्छ देऊन साहेबाचा बळेबळे सत्कार केला. एका नेत्यानं भलंमोठं भाषण ठोकलं. दिवसभर या ‘सुखद’ अफवेत साहेब गर्क राहिल्यानं त्याला खंडूची आठवण झाली नाही. आठवडा उलटला, खंडूनं कार्यालयात पाऊल ठेवताच रिसेप्शनिस्ट मारियानं पुन्हा तेच हावभाव केले. खंडूच्या आयुष्यात आणखी एक काळा दिवस उजाडला. मात्र, आता नवी शक्कल त्यानं लढवली. किशोरच्या फोनवरून त्यानं साहेबाची दिल्लीत बदली झाल्याची पुडी व्हॉट्सअ‍ॅपवर सोडली. पाहतापाहता कार्यालयाचा माहोल बदलला. साहेबाचा फोन मेसेजने टणटण वाजला. मोबाईल खणखणत राहिला. एका फोनवर तर साहेब चक्क आपली बदली आपण करवून घेतली नसल्याबद्दल बायकोची रदबदली करत होता. तेवढ्यात, खबर आली की, साहेबानं सायबर सेलकडे या अफवांची तक्रार केलीय. एक दिवस सायबर सेलवाल्यांनी खंडूला उचलले. मी या अफवांचा उद्गाता आहे, हे कशावरून, खंडूने रोकडा सवाल केला. या दोन्ही अफवांवर कुठलीही प्रतिक्रिया न देणारे या कार्यालयातील तुम्ही एकटेच आहात बच्चनजी, असं पोलीस बोलले.
 

Web Title:  Afwa-e-Azam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.