आडम मास्तर, तुमचं जरा चुकलंच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 11:43 AM2019-01-12T11:43:12+5:302019-01-12T11:43:57+5:30

नरसय्या आडम यांच्यासारख्या कडव्या कम्युनिष्ट ‘मास्तरा’ने सोलापुरात जाहीर व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान गायल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

adam master you are wrong | आडम मास्तर, तुमचं जरा चुकलंच!

आडम मास्तर, तुमचं जरा चुकलंच!

googlenewsNext

- नंदकिशोर पाटील

उजव्या, प्रतिगामी आणि तितक्याच असहिष्णू मनोवृत्तीची पिलावळ अंगाखांद्यावर बाळगणाऱ्या सध्याच्या राजकीय वर्तमानाला काँग्रेस, समाजवादी आणि डाव्यांसहित समस्त समविचारी पक्षांनी कडवे आव्हान उभे केलेले असताना नरसय्या आडम यांच्यासारख्या कडव्या कम्युनिष्ट ‘मास्तरा’ने सोलापुरात जाहीर व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान गायल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मास्तरांच्या हातून मोठे राजकीय पातक घडल्याची प्रतिक्रियाही समाजमाध्यमात उमटली. मोदींना ‘लालनिशाण’ दाखविण्याऐवजी नरसय्यांनी भगव्या कळपात सामील होणे अनेकांना रुचलेले दिसत नाही. ज्यांना आडम मास्तरांची वैचारिक भूमिका, राजकीय कारकीर्द आणि कामगार चळवळीतील त्यांचे योगदान माहित आहे, अशांना देखील मास्तरांचे ‘मोदीगान’ पचनी पडणारे नाही. आम्हाला मात्र मास्तरांच्या हातून काही वावगे घडले असे वाटत नाही. जरा मागे वळून आपण राजकीय संस्कृतीचा गतकाळ आठवला तर, आडम मास्तरांनी दाखविलेल्या अशा राजकीय शिष्टाचाराला वैचारिक मतभेदाच्या भिंतींचा अडसर कधीच नव्हता. इंदिरा गांधींनी पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून बांगलादेशाची निर्मिती केली, तेव्हा विरोधी बाकांवर बसलेल्या अटलबिहारी वाजपेयींनी दुर्गेची उपमा देऊन त्यांचा गौरव केला. इंदिराजींचे कौतुक करताना वाजपेयींना जशी त्यांची विचारधारा आडवी आली नाही, तशी अटलजींच्या भूमिकेवर कुणी किंतु, परंतु उपस्थित केला नाही. अलीकडच्या काळात अशा शिष्टाचाराचे दर्शनच दुर्मीळ झाल्याने आडम मास्तरांची ती कृती अनेकांना खटकली,विचारधारेशी केलेली प्रतारणा वाटली.

कधीकाळी गिरणगाव म्हणून ओळख असलेल्या सोलापुरात एका गिरणी कामगाराच्या पोटी नरसय्या आडम यांचा जन्म झाला. वडील गिरणी कामगार तर आई विडी कामगार. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे ते मॅट्रिकपर्यंतच शिकू शकले. कुटूंबाला हातभार लावण्यासाठी मुलांच्या शिकवण्या घ्यायचे, म्हणून ते ‘मास्तर’! कामगाराच्या घरची हालअपेष्टा हा त्यांचा जीवनानुभव असल्याने गिरणी आणि विडी कामगारांच्या समस्या पोटतिडकीने मांडत त्यांनी या असंघटीत वर्गाचे मोठे संघटन उभे केले. लालबावट्याखाली कष्टकºयांना संघटीत केले आणि पुढे याच ‘नाही रे’ वर्गाच्या पाठबळावर १९७४ मध्ये सोलापूर महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. पालिकेतील कामगिरीच्या जोरावर १९७८ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. सोलापूर हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना कष्टकºयांच्या पाठबळावर १९७८, १९९५ व २००४ असे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले. मात्र मागील दोन निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिता शिंदे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. सोलापुरचा खासदार भाजपाचा असला तरी, स्थानिक पातळीवर मास्तरांचा राजकीय संघर्ष काँग्रेसशी आहे. हा संदर्भही त्यांच्या वक्तव्याचे विश्लेषण करताना लक्षात घ्यावा लागेल.

एकीकडे संघर्षांतून माध्यमातून मागण्या मान्य करून घेताना रचनात्मक कामातून त्यांनी सोलापूरमध्ये दहा हजार महिला विडी कामगारांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला. जुलै २०१३ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हाही मास्तरांनी डॉ. मनमोहन सिंग यांचा गौरव करत उत्कृष्ट पंतप्रधान असे प्रशस्तीपत्र डॉ. सिंग यांना दिले होते. तसेच या प्रकल्पासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी शरद पवारांबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. प्रश्न एवढाच आहे की, मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरण वरवंट्याखाली लहान-मोठ्या उद्योगातील कामगार भरडले जात आहेत. त्याविरोधात देशभरातील कामगार संघटनांनी एल्गार पुकारलेला असताना, आडम मास्तरांनी ‘पुन्हा मोदीच पंतप्रधान !’ अशी भविष्यवाणी वर्तवून कम्युनिष्टांनी आजवर जपलेल्या (अंध)श्रद्धेलाच नख लावले आहे. त्यामुळे मास्तर तुमचं जरा चुकलंच !

(लेखक, लोकमतचे कार्यकारी संपादक आहेत)

Web Title: adam master you are wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.