‘कथनी’प्रमाणेच कृतीही हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 02:16 AM2017-10-30T02:16:55+5:302017-10-30T02:17:07+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, हिंदुस्तान हा फक्त हिंदू धर्मीयांचाच नव्हे तर इतर धर्माच्या लोकांचादेखील आहे

Action should be done just like 'Kathani' | ‘कथनी’प्रमाणेच कृतीही हवी

‘कथनी’प्रमाणेच कृतीही हवी

googlenewsNext

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, हिंदुस्तान हा फक्त हिंदू धर्मीयांचाच नव्हे तर इतर धर्माच्या लोकांचादेखील आहे, असे वक्तव्य केले अन् लगेच राजकीय, सामाजिक वर्तुळातील विविध विचारधारांमधील धुरिणांच्या भुवया उंचावल्या. गेल्या काही काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सामाजिक समरसता मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य येणे यात फारसे आश्चर्य वाटण्याचे तसे तर कारण नाही. मात्र एकीकडे संघाचे स्वयंसेवक ‘एक गाव एक स्मशानभूमी’, ‘एक गाव-एक पाणवठा’ अशी मोहीम राबवत असताना संघ परिवारातीलच काही संघटनांकडून सामाजिक समरसतेच्या भूमिकेला छेद देण्याचे काम सुरू आहे. काही संघटनांचे नेते धर्म व पंथाच्या नावावर जहाल वक्तव्य करताना दिसून येतात. कधी गोरक्षेच्या नावावर इतर धर्मियांवर हल्ले होताना दिसतात, तर कुठे अमुक एका समाजाचा आहे, म्हणून त्याचे शोषण अद्यापदेखील सुरू असल्याचे डोळ्यात अंजन घालणारे चित्र समोर येते. विशेष म्हणजे या संघटना किंवा व्यक्तींना लगाम घालण्यासाठी ठोस पावले उचलल्याचे ऐकिवात नाही. खुद्द सरसंघचालकांनीदेखील आरक्षणासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे देशात मोठा वैचारिक वाद निर्माण झाला होता. त्यामुळे एकाच विचारधारेतून ‘कथनी’ आणि ‘करणी’ यांच्यातील तफावत स्पष्टपणे जाणवते.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली असली तरी अद्यापही समाजात भेदभाव कायम आहे, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. महासत्ता व्हायचे असेल तर जनतेला आपल्या डोक्यातून आणि मनातून भेदभाव हा शब्द कायमचा खोडून टाकावा लागेल. यासाठी केवळ शासन, नेते किंवा पक्ष यांनी पुढाकार घेऊन काहीही होणार नाही. यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांची प्रगती करण्यासाठी समाजाकडून एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. संघाची कार्यप्रणाली व त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार लक्षात घेता, समाजात या गोष्टी समर्पकपणे पोहोचविण्यासाठी ते मौलिक वाटा उचलू शकतात. परंतु एकीकडे सामाजिक समरसता मोहिमेचा डंका पिटायचा आणि दुसरीकडे आरक्षणावर फेरविचार करा, असे जाहीरपणे बोलायचे, अशी विरोधाभासी भूमिका मांडण्याचे प्रकार थांबवावे लागतील. खºया अर्थाने जर देशात सामाजिक समरसता नांदावी आणि हिंदुस्तान नव्हे तर ‘एकात्मिक भारत’ अशी ओळख जगासमोर जावी, असे संघाला वाटत असेल तर ‘कथनी’ प्रमाणे त्याच आशयाची कृतीदेखील अपेक्षित आहे.

Web Title: Action should be done just like 'Kathani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.