- विजय बाविस्कर

हम आपके है कौन, वास्तव यासारख्या चित्रपटांतून रिमा लागू यांनी साध्या सोप्या भूमिकेचेही कसे सोने करता येते हे अभिनय सामर्थ्यातून जगाला दाखवून दिले.

कुठल्याही कलावंताचे आपल्यातून जाणे म्हणजे आपल्या जीवनाचा एक समृद्ध भाग संपल्यासारखे असते. कारण कलावंत त्यांच्या कलाकृतीतून आपले जगणे आनंददायी आणि समृद्ध करत असतो. म्हणूनच कुठल्याही चांगल्या कलावंताचे आपल्यातून जाणे मोठी पोकळी निर्माण करून जाते. आपल्याच भावविश्वाचा भाग असलेला जवळचा माणूस गेल्याची भावना आपल्या मनात कायम राहते. रीमा लागू हे असेच आपल्या भावविश्वाचा भाग झालेले व्यक्तिमत्त्व. त्यांचे जाणे म्हणूनच तमाम रसिकजनांना चटका लावून गेले. आपल्याच घरातलं जवळचं कुणी गेलं असावं असं काहीसं..
मराठी रंगभूमीवर सहज वावर असणारी समर्थ अभिनेत्री, बॉलिवूडमध्ये अनेक तारकांची आई, कधी खट्याळ सासू तर कधी करारी सून... अशा विविधांगी भूमिकांतून आपल्या चतुरस्त्र अभिनयाने सर्वांची मने जिंकलेल्या रीमा लागू या अभिनेत्रीची अशी आकस्मिक ‘एक्झिट’ दु:ख देऊन गेली. रीमा लागू यांनी आईच्या अनेक भूमिका केल्या पण ‘वास्तव’ या चित्रपटातील त्यांची आईची भूमिका सर्वांनाच विशेष भावली. खरी आई पडद्यावर उतरावी इतकी जिवंत भूमिका त्यांनी त्यात साकारली. हाताबाहेर गेलेल्या आणि चुकीच्या मार्गाला लागलेल्या मुलाकडे पाहताना आईच्या मनाची काय उलाघाल होते हे रीमा लागू यांनी फक्त डोळ्यांतून दाखवले होते. काही भूमिका कलावंत अक्षरश: जगतो म्हणतात, त्यातलीच ही एक. अर्थातच ही अभिनयाची समृद्धी त्यांच्याकडे वारशाने आलेली होती. प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांच्या त्या कन्या. पुण्याच्या हुजुरपागेच्या शाळेत शिकणारी नयन भडभडे हीच पुढे जाऊन रीमा लागू बनली. उपजत अभिनयक्षमतेला परिश्रमाची आणि कष्टाची जोड देऊन त्यांनी स्वत:चे अवकाश कायम विस्तारत ठेवले. आईकडून अभिनयाचे धडे गिरवलेले असल्याने पायाभरणी पक्की होती. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी मराठी रंगभूमीच्या दालनात प्रवेश केला आणि अभिनयाची नांदी झाली. तिथून पुढचा प्रवास म्हणजे अभिनयाला पूर्ण वाव देणारा ठरला. घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष, बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय, सासू माझी ढांसू यासारखी दर्जेदार नाटकं त्यांना मिळत गेली आणि त्यांनी प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं. "पुरुष" हा तर त्यांच्या अभिनयाच्या वाटेवरचा ‘माईलस्टोन’ ठरला! त्यांनी नाटकासोबत टेलिव्हिजन मालिकांमध्येही उत्साहाने काम केले. ‘तू तू मै मै’ या विनोदी मालिकेमधली त्यांची सासूची विनोदी भूमिका आजही साऱ्यांच्या लक्षात राहिली. बॉलिवूडच्या जगात प्रवेश केला तेव्हा तथाकथित नायिकांच्या भूमिका त्यांच्या वाट्याला फारशा आल्या नाहीत. एका ठरावीक साच्यामध्ये बसवता यावे असे ते व्यक्तिमत्त्वच नव्हते. पण तरीही जी भूमिका स्वीकारतील त्यामध्ये स्वत:चा ठसा चांगला उमटवतील असा प्रयत्न कायम त्यांनी ठेवला. सहजता आणि प्रसन्नता ही त्यांची सर्वांत मोठी अ‍ॅसेट होती. सौंदयाचे वरदान होते. पण तरीही बॉलिवूडच्या जगात त्यांच्या वाट्याला आईच्या भूमिका अधिक आल्या. पण तिथेही स्वत:चा ठसा उमटवलाच. ‘आई’च्या भूमिकेच्या टिपिकल प्रतिमेला त्यांनी छेद दिला. अल्पावधीतच त्या बॉलीवूडच्या री‘माँ’ झाल्या. त्यापूर्वीच्या चित्रपटांतून दिसणारी आई पाहिली, आठवली तर यातील फरक सहज लक्षात येण्याजोगा आहे. ‘आयेंगे मेरे करण अर्जुन आयेंगे’ असं म्हणत प्रतिशोध घेणारी आई अगर अत्यंत हलाखीत पीचलेली आणि भूतकाळाचा पश्चात्ताप करणारी आई हे आईचे रूप चित्रपटांतून कायम दिसायचे. पण या प्रतिमेच्या चौकटीतून आई मुक्त करण्याचे श्रेय रीमा लागू यांनी पडद्यावर साकारलेल्या आईला जाते. आधुनिकतेच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणाईला ही आई अधिक भावली. ही पडद्यावर दिसणारी आई प्रसन्न आणि दिलखुलास दिसत होती. नव्या पिढीशी छान जुळवून घेत होती. जगण्याविषयी उसासे काढण्यापेक्षा आजचे जगणे समजून घेताना ती दिसत होती. हक्काची मैत्रीण वाटावी, प्रसंगी आपल्यासोबत गाणारी, नाचणारी अशी एक वेगळी आई पडद्यावर दिसली. तिच्यावर पसंतीची मोहोर उमटली. अशी ही चतुरस्त्र अभिनेत्री आता आपल्यात नाही याची सल कायमच राहणार आहे. मात्र त्यांच्या अजरामर भूमिकांमधून रीमा लागू कायम आपल्यासोबत राहतील यात शंका नाही.