‘सिव्हिक सेन्स’च्या अभावामुळे निष्पापांचे बळी!

By रवी टाले | Published: July 12, 2019 06:27 PM2019-07-12T18:27:58+5:302019-07-12T18:34:31+5:30

सर्वसामान्य नागरिकांमध्ये ही जाणीव ज्या दिवशी निर्माण होईल, त्या दिवशी कुण्या डॉक्टरला, कुण्या चिमुकल्याला गटारात पडून जीव गमवावा लागणार नाही.

Absence of civic sense; inocent people pay for it | ‘सिव्हिक सेन्स’च्या अभावामुळे निष्पापांचे बळी!

‘सिव्हिक सेन्स’च्या अभावामुळे निष्पापांचे बळी!

Next
ठळक मुद्देजबाबदारी पालिका प्रशासनाप्रमाणेच नागरिकांचीही असल्याचे सांगून, त्यांनी नागरिकांचा ‘सिव्हिक सेन्स’ही काढला! सामाजिक नीतीनियमांचे पालन म्हणजे ‘सिव्हिक सेन्स’ असे ढोबळमानाने म्हणता येईल. आपल्या देशात कुणी सार्वजनिक मालमत्तेस हानी पोहोचवताना दिसला तर त्याला हटकण्याची जबाबदारी कुणीही घेताना दिसत नाही.


पोटचा गोळा अचानक नाहीसा होण्याचे दु:ख काय असते, हे त्या प्रसंगाला सामोरे जावे लागलेल्या मातेलाच कळू शकते! मुंबईतील गोरेगाव भागातील एका मातेवर बुधवारी रात्री असा प्रसंग ओढवला. तिचा अवघा दोन वर्षांचा मुलगा घराबाहेरून वाहत असलेल्या नाल्याच्या उघड्या ‘मॅनहोल’मध्ये पडला आणि वाहून गेला. वृत्त वाहिन्यांवर झळकत असलेल्या, त्या मातेच्या आक्रोशाच्या चित्रफिती हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. गेल्या वर्षीही मुंबईतील एका प्रथितयश डॉक्टरचा अशाच प्रकारे, रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे दिसत नसलेल्या ‘मॅनहोल’मध्ये पडून दुर्दैवी अंत झाला होता. अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विरोधात जनआक्रोश उफाळणे स्वाभाविक असते. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट दिली तेव्हा त्यांना असाच जनतेच्या आक्रोशाचा सामना करावा लागला.
घटनास्थळाच्या भेटीनंतर एका वृत्त वाहिनीशी बोलताना महापौरांनी उघड्या गटारांसाठी मुंबईकरांनाही जबाबदार धरले. अशा घटना घडू नये, हे बघण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाप्रमाणेच नागरिकांचीही असल्याचे सांगून, त्यांनी नागरिकांचा ‘सिव्हिक सेन्स’ही काढला! महापौरांच्या या वक्तव्यावरून कदाचित गदारोळ होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्याचे राजकारण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही; परंतु महापौर जे बोलले ते चुकीचे म्हणता येईल का? स्वत:ची बाजू झाकण्यासाठी त्यांनी नागरिकांवर दोषारोपण केले, असे म्हणता येईल; पण त्यांनी जो ‘सिव्हिक सेन्स’चा मुद्दा उपस्थित केला, तो अयोग्य कसा म्हणता येईल?
दोन वर्षांपूर्वी इस्राएलमधील एका ‘स्टार्ट अप कंपनी’च्या मुख्यालयास भेट देण्याचा योग आला. ती कंपनी चालकविरहित कारचा विकास करीत आहे. चर्चेदरम्यान मी तेथील संशोधकांना म्हणालो, की तुम्ही या कारचे परीक्षण भारतात करायला हवे, जर ही कार भारतात अपघात न करता धावू शकली, तर मग ती जगभरात कुठेही धावू शकेल! त्यावर ते हसून म्हणाले, की ते त्यांच्या कारची चाचणी भारतात करतच आहेत आणि त्यांची कार भारतात यशस्वीरीत्या धावली तर ती कुठेच अपयशी ठरणार नाही, याची त्यांना जाणीव आहे! भारतीयांच्या ‘ट्रॅफिक सेन्स’बद्दलचा केवढा हा विश्वास! यामधील गमतीचा भाग सोडून द्या; पण भारतीयांमधील ‘सिव्हिक सेन्स’च्या अभावाने जागतिक कीर्ती मिळवली आहे, हे मात्र खरे!
‘सिव्हिक सेन्स’ म्हणजे नेमके काय? सामाजिक नीतीनियमांचे पालन म्हणजे ‘सिव्हिक सेन्स’ असे ढोबळमानाने म्हणता येईल. स्वत:पुरताच विचार न करता इतरांच्याही सोय-गैरसोयीचा विचार करून त्यानुसार आपले सार्वजनिक आचरण ठेवणे म्हणजे ‘सिव्हिक सेन्स’ अशीही व्याख्या करता येईल. दुर्दैवाने बहुतांश भारतीय इतरांच्या सोय-गैरसोयीचा विचारच करत नाहीत. ही प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये आढळते. ती जशी अशिक्षितांमध्ये आहे, तशीच सुशिक्षितांमध्येही आहे. ती जशी गरिबांमध्ये आढळते, तशीच श्रीमंतांमध्येही आढळते. ती जशी ग्रामीण भागात दिसून येते, तशीच मुंबईसारख्या महानगरांमध्येही जागोजागी दृष्टोत्पत्तीस पडते.
वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, वाहने चालविताना, उभी करताना मनमानी करणे, चौकात सिग्नल लाल असताना ज्यांना डावीकडे वळायचे आहे त्या वाहनचालकांचा मार्ग अवरुद्ध करणे, रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा न करून देणे, सार्वजनिक ठिकाणी जोरजोरात बोलणे, रस्त्यांवर कचरा टाकणे, कुठेही थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी मूत्र विसर्जन करणे, विवाह प्रसंगी वरात काढून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, खासगी कार्यक्रमांसाठी रस्त्यांवर मंडप घालून इतरांची गैरसोय करणे, रात्रीच्या वेळी फटाके फोडणे, डीजेवर जोरजोरात गाणी वाजविणे, रस्त्यांवर सार्वजनिक उत्सव साजरे करणे, बस, रेल्वे अथवा लिफ्टमधून बाहेर पडणाऱ्यांना आधी बाहेर न पडू देता आत शिरण्याची घाई करणे, वीज व पाण्याची नासाडी करणे, ही ‘सिव्हिक सेन्स’च्या अभावाची भारतात यत्र तत्र सर्वत्र आढळणारी काही उदाहरणे आहेत. ही यादी बरीच मोठी केली जाऊ शकते.
हल्ली कामानिमित्त अथवा पर्यटनासाठी विदेशात जाणाºयांची संख्या बरीच वाढली आहे. हे लोक देशात परत आले की, त्यांनी भेट दिलेल्या देशातील शिस्तीची, स्वच्छतेची, नागरिकांच्या वर्तणुकीची प्रशंसा करताना थकत नाहीत; पण त्यापैकी एकाही बाबीचा अंगिकार करण्याचा मात्र प्रयत्नही करत नाहीत. शिस्त इतरांनी पाळायची असते, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता इतरांनी राखायची असते, चांगली वर्तणूक इतरांनी ठेवायची असते, असेच आम्हा भारतीयांना वाटत असते. मुळात ‘सिव्हिक सेन्स’ नावाची काही गोष्ट असते आणि तो बाळगला पाहिजे, लहान मुलांना त्याचे बाळकडू दिले पाहिजे, ही गोष्टच आमच्या गावी नसते. आमच्या देशातील शालेय अभ्यासक्रमांमध्ये नागरिकशास्त्र नावाचा एक विषय असतो, जो सर्वात दुर्लक्षित समजला जातो. वर्ष संपत आले असताना शेवटच्या काही दिवसांमध्ये उरकून घेण्याचा विषय म्हणजे नागरिकशास्त्र, असाच आमच्या देशातील बहुसंख्य शिक्षकांचाच समज झाला आहे. मग विद्यार्थ्यांना ‘सिव्हिक सेन्स’चे धडे मिळतील तरी कसे? जर विद्यार्थ्यांनाच ‘सिव्हिक सेन्स’चे धडे मिळत नसतील, तर चांगले, शिस्तप्रिय, इतरांच्या अधिकार व हक्कांची पायमल्ली न करणारे सुजाण नागरिक घडतील तरी कसे?
मध्यंतरी समाजमाध्यमांवर एक चित्रफित बघण्यात आली होती. एक स्वच्छता कर्मचारी रस्ता झाडत असताना कारमधील एक जण त्याच्या गाडीतील कचरा रस्त्यावर टाकतो. तो स्वच्छता कर्मचारी चुपचाप तो कचरा गोळा करतो; मात्र तेवढ्यात एक जण येतो आणि तो सगळा कचरा त्या कारच्या खिडकीतून आत ओततो! ‘सिव्हिक सेन्स’ याला म्हणतात! सामाजिक नीतीनियमांचे पालन केवळ स्वत:च न करता, इतर कुणी त्याचा भंग करत असेल तर त्यालाही तसे करण्यापासून परावृत्त करणे हादेखील ‘सिव्हिक सेन्स’चाच भाग आहे. दुर्दैवाने आपल्या देशात कुणी सार्वजनिक मालमत्तेस हानी पोहोचवताना दिसला तर त्याला हटकण्याची जबाबदारी कुणीही घेताना दिसत नाही. त्यामुळेच आपल्या देशातील रेल्वेगाड्या, बसेस घाणेरड्या असतात, ऐतिहासिक स्थळांवर जागोजागी कुण्या तरी प्रेमवीरांची नावे कोरलेली दिसतात!
देशात सर्वत्र आढळणारा ‘सिव्हिक सेन्स’चा अभाव हे जसे आमच्या शिक्षण प्रणालीचे अपयश आहे, तसेच ते पालकांचेही अपयश आहे. लहान मुलांच्या शालेय जीवनास प्रारंभ होण्याच्याही आधी ‘सिव्हिक सेन्स’चे धडे घरातच दिले जाणे गरजेचे आहे. विकसित देशांमध्ये तसे ते दिले जातात म्हणून ते देश विकसित आहेत. आपल्या देशात मात्र लहान मुलांना शौचासाठी रस्त्यावर बसविले जाते. रस्त्यावर घाण करण्यापासूनच जर त्याच्या जीवनाचा प्रारंभ होत असेल, तर पुढे त्याच्याकडून काय ‘सिव्हिक सेन्स’ची अपेक्षा करता येईल? रात्रीच्या वेळी रस्त्यात बंद पडलेल्या गाडीला ‘रिफ्लेक्टर’ नसण्यासारख्या, गटारांचे ‘मॅनहोल’ उघडे असण्यासारख्या, वरवर क्षुल्लक भासणाºया बाबी एखाद्याच्या जीवावर बेतू शकतात. ‘सिव्हिक सेन्स’च्या अभावामुळे आमच्या देशात नित्य अशा घटना घडत असतात आणि त्यामध्ये निष्पापांचे बळी जात असतात. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ही जाणीव ज्या दिवशी निर्माण होईल, त्या दिवशी कुण्या डॉक्टरला, कुण्या चिमुकल्याला गटारात पडून जीव गमवावा लागणार नाही. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भले त्यांच्या पक्षाचा, पालिका प्रशासनाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असेल; पण त्या निमित्ताने त्यांनी ‘सिव्हिक सेन्स’च्या अभावाच्या ज्या मुद्याला हात घातला आहे, तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाने त्याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे.

- रवी टाले                                                                                                      

ravi.tale@lokmat.com

Web Title: Absence of civic sense; inocent people pay for it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.