शाळांच्या परिपाठात २२ भाषांचा संगम 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 08:35 PM2018-12-06T20:35:26+5:302018-12-06T20:37:30+5:30

सकस समाज घडवायचा असेल तर समतेचा, समभावाचा, एकतेचा, एकोप्याचा, सलोख्याच्या संस्काराचे योग्य वेळी बीजारोपण करावे लागेल. 

22 languages in school syllabus | शाळांच्या परिपाठात २२ भाषांचा संगम 

शाळांच्या परिपाठात २२ भाषांचा संगम 

Next

- धर्मराज हल्लाळे

वर्तमानातील समस्या आणि भविष्यातील आव्हाने पेलायची असतील तर एकमेव शाश्वत प्रयोगाचे ठिकाण म्हणजे शाळा. अर्थात शालेय वयात जे पेरू ते उद्या उगवणार आहे. एकंदर सकस समाज घडवायचा असेल तर समतेचा, समभावाचा, एकतेचा, एकोप्याचा, सलोख्याच्या संस्काराचे योग्य वेळी बीजारोपण करावे लागेल. हा प्रयत्न भाषा संगम उपक्रमातून शाळा-शाळांत दिसून येत आहे़ केंद्राच्या मानव संसाधन मंत्रालयाने देशभरातील शाळांना २२ भाषांचा भाषासंगम कार्यक्रम दिला आहे. जो २२ दिवस सुरू राहणार आहे. शासनाच्या अनेक मोहिमा आणि अभियानासारखेच या निर्णयाकडे न पाहता शिक्षक व शाळांनी एक कृतिशील उपक्रम विद्यार्थ्यांच्या हाती देत आहोत या दृष्टीने पाहिले पाहिजे. 

देशभरात भाषासंगम उपक्रम राबविला जात असून महाराष्ट्रातही शिक्षण विभागाने सर्व शाळांना दररोजच्या परिपाठात एक भाषा संवाद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोकणी, काश्मिरी, मैथिली, मल्याळम, गुजराती, पंजाबी, बंगाली अशा २२ भाषांची ओळख रोज एक या प्रमाणे शाळेत होत आहे. स्वत:ची ओळख करून देणारे व खुशहाली विचारणारे पाच वाक्य मुलांसमोर वाचून दाखविली जातात. त्यानंतर मुले त्या त्या भाषेतून एकमेकांशी संवाद साधतात. शिवाय सूचना फलकावर लिहिलेले हे संवाद विद्यार्थी आपल्या वहीत नोंदवून घेतात.  त्यात विद्यार्थ्यांनी भाषांची तोंडओळख पूर्णत: अवगत करावी, अशी अपेक्षा आहे. साधारणपणे शाळांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा शिकविल्या जातात. काही शाळांमध्ये संस्कृत आहे़ परंतु शेजारच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात या राज्यातील भाषांबद्दल आपण अनभिज्ञ असतो. ज्यावेळी समोरच्या व्यक्तीच्या मातृभाषेत आपण दोन-चार वाक्य बोलतो तेव्हा त्याची आपल्याविषयीची आपुलकी वाढते. दररोज शाळांमध्ये प्रतिज्ञा म्हटली जाते... भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आपण म्हणतो. परंतु जात, धर्म, भाषा, वेशभूषा ही विविधता अंगीकारत नाही. विविधतेत एकता याचाही उच्चार करतो. मात्र ती एकता कशी प्रस्थापित होईल याचा कुठलाही प्रयोग करीत नाही. त्याला भाषा संगम हे उत्तम उत्तर ठरू शकेल. 

भाषा जरी भिन्न असली तरी आम्ही ती जाणतो हे आपण कृतीतून, प्रत्यक्ष बोलण्यातून दाखवतो. त्यावेळी माझ्यापेक्षा वेगळी भाषा बोलणाराही माझा बांधव आहे, ही भावना वृद्धिंगत होऊ शकते. आपली प्रांत रचना ही भाषावार झाली असून भिन्न भाषेबरोबर वेशभूषाही भिन्न असते. जी भाषा परिपाठात घेतली जाईल त्याच प्रदेशाची वेशभूषा करून विद्यार्थी जेव्हा परिपाठ सादर करतात, विविध भाषेत संवाद साधतात तेव्हा देशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आकलन होते. अत्यंत कमी वेळेत विविधतेत एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचा कोरला जातो. त्यामुळे शिक्षण विभाग आणि डायटकडून राबविला जाणारा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात यशस्वी करणे, ही शाळांची जबाबदारी आहे.
 

Web Title: 22 languages in school syllabus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.