शिरसोली : कुर्‍हाडदा रस्त्यावरील काठेवाडी वस्तीतील दोन गोसेवकांच्या ३५ गायींचा तणनाशकाची फवारणी केलेले गवत खाण्यात आल्याने मृत्यू झाला. आणखी १५ गायींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून त्यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू आहेत.
तणनाशक औषधामुळे मृत्यू
शिरसोली परिसरातील कुर्‍हाडदा रस्त्यावर भिमा काठेवाडी, हिरा काठेवाडी, रघुनाथ काठेवाडी यांच्यासह पाच ते सहा जणांची वस्ती आहे. गो-पालन आणि संगोपन हा व्यवसाय असलेल्या भिमा काठेवाडी व रघुनाथ काठेवाडी यांनी मंगळवार २७ रोजी शिरसोली रेल्वे स्टेशन परिसरात गायी चराईसाठी आणल्या होत्या. चराई दरम्यान काही शेतातील तणनाशक औषध फवारणी केलेले गवत या गायींच्या खाण्यात आले.
पाणी प्यायल्यानंतर तत्काळ मृत्यू
संध्याकाळी गायींना भिमा काठेवाडी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वाड्यावर आणले. वाड्यावर गायींनी पाणी प्यायल्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने गायी दगावण्यास सुरुवात झाली. पाणी प्यायल्यानंतर पोट फुगून कातडी कोरडी पडायला सुरुवात झाली. एकाच वेळी दहा ते ११ गायी दगावल्यानंतर काठेवाडी कुटुंबात घबराट पसरली. त्यांनी शिरसोली गावात धाव घेत गुरांच्या डॉक्टरांना उपचारासाठी बोलविले. डॉक्टरांनी उपचार केले मात्र गायी दगावणे सुरुच होते. बुधवारी भिमा काठेवाडी यांनी महाबळ परिसरातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडे धाव घेत उपचारासाठी बोलविले. या दरम्यान गुरांचे दगावणे सुरुच असल्याने डॉक्टरदेखील हतबल झाले. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत भिमा काठेवाडी यांचे २० आणि रघुनाथ काठेवाडी यांच्या मालकीच्या १५ गायींचा मृत्यू झाला आहे. तर अजून १५ गायी गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत गायींचा व्हिसेरा पुण्याला रवाना
मृत झालेल्या ३५ गायींपैकी काही गायींचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. चार्‍यासोबत अतितीव्र स्वरूपाची औषधी पोटात गेल्यामुळे गायींचे यकृत खराब झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. डॉक्टरांनी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी व्हिसेरा तपासणीसाठी पशुरोग अन्वेशण विभाग प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविला आहे.
डॉक्टरांचे पथक तळ ठोकून
गंभीर आजारी असलेल्या गायींवर उपचार उपलब्ध व्हावे यासाठी डॉ.एन.ई.चोपडे, आर.एस.जाधव, डॉ.गोपाळ सोनवणे, डॉ.बारेला, डी.एम.महाजन, एन.डी.पाटील यांचे पथक शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत थांबून होते. गंभीर आजारी असलेल्या १५ गायींवर औषधोपचार सुरू आहेत.