धुळे : महानगरपालिकेलगतच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राबाबत पर्यायी जागेची मागणी कायम ठेऊन गुरुवारी सकाळपासून अध्ययन केंद्राची जागा रिकामी करून देणार असल्याचे  अध्ययन केंद्राचे अध्यक्ष एम़जी़धिवरे यांनी बुधवारी सायंकाळी कळविले आहे.
  तत्पूर्वी बुधवारी दुपारी मनपाने अध्ययन केंद्राला अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात अंतिम नोटीस देत गुरुवारी बांधकाम काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेतला  तर मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांना देण्यात आलेल्या धमकीचा निषेध म्हणून बुधवारी मनपाचे कामकाज दिवसभर बंद ठेवण्यात आल़े कर्मवीर दादासाहेब गायकवाड बहुउद्देशीय शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ संचलित हे केंद्र  1981 पासून कार्यरत आहे. या केंद्रासाठी मनपाने नगरविकास विभागाच्या 7 मे 2004 च्या आदेशानुसार पर्यायी जागा व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.  अशांतता निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे धिवरे यांच्यासह वाल्मीक दामोदर, संजय पगारे, शशिकांत वाघ, आनंदराव बागुल, एस़आऱबागुल, सिध्दार्थ बोरसे, राजेश ओहाळ, बाळासाहेब कसबेकर, संजय बैसाणे, प्रेम अहिरे, राज चव्हाण, सुरेश लोंढे, शंकर खरात, भरत खरात व शिवाजी जमदाळे यांनी जाहीर केले आह़े