धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सहा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:24 PM2018-04-14T12:24:31+5:302018-04-14T12:24:31+5:30

१ ते ३१ जुलैदरम्यान मोहीम ; जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायतींना सूचना

The goal of cultivating six lakh trees is to the village panchayats in Dhule district | धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सहा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सहा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

Next
ठळक मुद्देधुळे तालुक्यातील १४१ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींचा समावेश धुळे महापालिकेत झाला आहे़  यामुळे तालुक्यात सद्य:स्थितीत १३१ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक हजार ९१ प्रमाणे एकूण १ लाख ४२ हजार ९२१ वृक्षांची लागवड करण्याचा लक्ष्यांक देण्यात आला आहे़  तसेच साक्री तालुक्यातील १६९ ग्रामपंचायतीअंतर्गत एकूण १ लाख ८४ हजार ३७९, शिंदखेडा तालुक्यातील १२३ ग्रामपंचायतींना १ लाख ३४ हजार १९३ आणि शिरपूर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतींना एक लाख २८ हजार १३८ वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  राज्य शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार सन २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचा शासनाचा मानस आहे. त्या पार्श्वभूमीवर  शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत  विभागासह जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींनादेखील वृक्ष लागवडीबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायतीअंतर्गत ५ लाख ९० हजार २३१ वृक्षांची लागवड केली जाणार आहे. ही मोहीम १ ते ३१ जुलैदरम्यान राबविण्यात येणार आहे. 
लोकसंख्या वाढीमुळे बेसुमार वृक्षतोड होत आहे. परिणामी, पर्यावरणाचा ºहास होत असून तापमानातही वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठरविले आहे. तर सन २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचा शासनाचा मानस आहे़  शासनाच्या या उपक्रमात धुळे जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचादेखील समावेश राहणार आहे़ यावर्षी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. ५४१ ग्रामपंचायतीअंतर्गत एकूण  पाच लाख ९० हजार २३१ वृक्षांची लागवड केली जाणार आहे़ 
उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाला सूचना 
जागतिक तापमानात होणारी वाढ, हवामानात होणारे बदल, यामुळे पडणारा कमी-अधिक पाऊस आणि विविध भागात निर्माण होणारा ओला व कोरडा दुष्काळ या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासनाचे विविध विभाग आणि जनतेच्या लोकसभागातून ५० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी  शासनाने आतापासूनच कंबर कसली असून त्यासंदर्भात जिल्हा पातळीवरील प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींनाही वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करून देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायतींनी त्यांच्या क्षेत्रात करावयाच्या वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी एकूण ५ लाख ९० हजार २३१ वृक्षांची लागवड करायची आहे़ या सर्व ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक हजार ९१ इतके वृक्ष लावायच्या सूचना देण्यात आल्या आहेत़  तसेच त्यापेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यास प्रोत्साहित करण्यात येईल. 
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागासदेखील ८ हजार ३८० वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, ग्रामपंचायत विभागाकडे वृक्ष लागवडीसाठी जागा शिल्लक नसल्याने या विभागाला दिलेला लक्ष्यांक तालुकानिहाय ठरवून देण्यात आला आहे़  त्यानुसार जिल्ह्यातील चारही तालुक्यात प्रत्येकी २ हजार १०० वृक्ष लागवड केली जाणार आहे. गेल्या वर्षीदेखील शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात वृक्ष लागवड झाली होती. परंतु, वृक्ष लागवड मोहीम राबविल्यानंतर लागवड केलेल्या वृक्षांकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे वृक्षांचे नुकसान झाले. त्यामुळे वृक्ष लागवड मोहीम राबविताना वृक्षारोपण झाल्यानंतर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, असा सूर पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे. 

Web Title: The goal of cultivating six lakh trees is to the village panchayats in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.