धोकादायक इमारतींचा धोका कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:46 PM2017-07-26T23:46:20+5:302017-07-26T23:50:43+5:30

धुळे : मुंबईत ‘साईदर्शन’ ही इमारत अचानक कोसळल्याने १७ जणांना प्राण गमावावा लागल्याची घटना मंगळवारी घडली़

dhule city threat of building collapse | धोकादायक इमारतींचा धोका कायम!

पेठ भागातील ही जीर्ण इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते़

Next
ठळक मुद्देधुळे शहरात तब्बल १०५ धोकादायक इमारतीस्ट्रक्चरल आॅडिटकडे दुर्लक्ष

धुळे : मुंबईत ‘साईदर्शन’ ही इमारत अचानक कोसळल्याने १७ जणांना प्राण गमावावा लागल्याची घटना मंगळवारी घडली़ धुळे शहरातदेखील आजच्या स्थितीत तब्बल १०५ धोकादायक इमारती असूनही मनपाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे भविष्यात धुळ्यातही अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ शहरात अनेक इमारती कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचे ‘लोकमत’ सर्वेक्षणात समोर आले आहे़
नोटिसांची ‘औपचारिकता’
शहरातील जुने धुळे, पेठ भाग व अन्य काही परिसरांमध्ये इंग्रजकालीन इमारती आहेत़ त्यापैकी बहुतांश इमारतींची बांधकामे १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहेत़ धोकादायक इमारतींना मनपाने दरवर्षी मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम १९४९ मधील इमारतीसंबंधी अधिनियम २६४(१) नुसार नोटिसा बजावणे क्रमप्राप्त असल्याने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी संबंधित धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या जातात़
स्ट्रक्चरल आॅडिटकडे दुर्लक्ष
सदर नोटीस मिळाल्यावर संबंधित इमारत मालकाने त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून ते महापालिकेला सादर करायला हवे़ मात्र एकाही इमारत मालकाने इमारतीच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल महापालिकेला सादर केलेला नाही़ उलट धोकादायक इमारत असल्यास त्यावर पावसाळ्यात प्लॅस्टिकचे कागद टाकून व इमारत धोकादायक असल्याचा फलक लावून इमारतीचे मालक स्वत: मुक्त होण्याचा प्रयत्न करताना दिसतात़
संभाव्य वादांमुळे टाळाटाळ
बहुतांश धोकादायक इमारती या कधीही कोसळण्याची शक्यता आहे़ मात्र असे असतानाही त्यामध्ये नागरिक रहिवास करतात़ त्यामुळे इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते़ इमारतीवर कारवाईपूर्वी नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत असल्याने संभाव्य वाद लक्षात घेऊन मनपा प्रशासन त्याकडे डोळेझाक करते़ त्याचप्रमाणे धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने ते इमारत सोडण्यास तयार नसतात, तर बहुतांश इमारतींचे वादविवाद न्यायप्रविष्ठ असल्याने पालिका प्रशासन त्यावर कारवाई करण्यास धजावत नाही़ मुंबईत घडलेल्या इमारत दुर्घटनेमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर ठोस आवश्यक आहे़ जेणेकरून संभाव्य दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतील़

महापालिकेतर्फे दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या जातात़ मात्र नागरिकांनीही या इमारतींवरील कार्यवाहीसाठी सहकार्य करायला हवे़ धोकादायक इमारतींबाबत निश्चितपणे कार्यवाही केली जाईल़
-रवींद्र जाधव,
उपायुक्त, मनपा, धुळे
 

Web Title: dhule city threat of building collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.