देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाहीत, राज ठाकरेंचं मोदी-फडणवीसांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 02:08 PM2018-09-02T14:08:08+5:302018-09-02T15:38:53+5:30

राज्यातील प्रत्येक शहराकडे पाहून वाईट वाटत असून देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाही. प्रत्येक पक्ष स्वत:च्या तुंबड्या भरून घेत असेल तर निवडणूक लढवून करायचे काय?, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Dhule city has become worse than ever before - Raj Thackeray | देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाहीत, राज ठाकरेंचं मोदी-फडणवीसांवर टीकास्त्र

देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाहीत, राज ठाकरेंचं मोदी-फडणवीसांवर टीकास्त्र

Next

धुळे - राज्यातील प्रत्येक शहराकडे पाहून वाईट वाटत असून देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाही. प्रत्येक पक्ष स्वत:च्या तुंबड्या भरून घेत असेल तर निवडणूक लढवून करायचे काय?, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागीय मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे पुढे म्हणाले की, देशात १९८४ मध्ये राजीव गांधींना व त्यानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळाले. पण बहुमत मिळूनही काय केले? तर नोटा बंद केल्या. मोदींनी सर्वप्रथम देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या व्यापा-यांनी मोदींना सत्तेवर आणलं त्याच व्यापा-यांची मोदींनी वाट लावली. 

स्मार्ट सिटी योजनेचे काय झाले? मुख्यमंत्री म्हणाले होते, नाशिक दत्तक घेणार, पण नंतर तिकडे फिरकलेही नाही. नाशिकमध्ये विकास आम्ही केला आणि सरकार स्मार्ट सिटीच्या नावाखाली ती कामे दाखवत आहे. लाख कोटी रूपयांच्या कामांच्या मंत्री घोषणा करतात, पण मंत्र्यांना कागद पेन दिल्यास आकडेही लिहिता येणार नाही. भाजपावाले काँग्रेसच्या नावाने बोंबा मारतात पण स्वत:चं काय? दुस-यांची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात भाजपाला काय आनंद वाटतो तेच कळत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. 

अन्य पक्षातून घेऊन उमेदवार निवडून आला तर तो भाजपाचा विजय कसा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचा पाणीप्रश्न एकटे सरकार सोडवू शकत नाही, त्यासाठी लोकसहभाग हवा. लोकसहभागच हवा असेल तर सरकार हवे कशाला? अशी टीका राज ठाकरे यांनी केली. बाहेरचे लोक येऊन तुमचे रोजगार बळकवताय, मराठी माणसांचे प्रमाण कमी होतेय. बाहेरचे लोक येऊन स्वत:चे मतदारसंघ तयार करताय, ते निवडणूक जिंकतील. आपण काय करतोय? असे ते म्हणाले.

धुळे शहर काही पॅरिस नाही!
राज्यातल्या अन्य शहरांच्या तुलनेत धुळे शहर बरे आहे. पण बरे आहे म्हणजे ते काही  पॅरिस नाही. पूर्वी धुळे शहर राज्यातले सर्वात श्रीमंत शहर होते, त्या शहराची आज धुळधाण झाली आहे़ सर विश्वैश्वरैय्या यांनी या शहराची रचना केली. आज तेच डोक्याला हात लावून बसले असतील, असे राज ठाकरे म्हणाले. मंत्री असूनही विकास झाला नसल्याचे ते म्हणाले.

तरूणांनो तुमची स्वप्नं मांडा
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान, तरूणांनी आपल्या शहराबद्दल, राज्याबद्दल आपली काय स्वप्नं आहेत. आपल्याला काय बदल हवे आहेत, विकास कसा असायला हवा? धुळेकर आनंदी राहावे, यासाठी आपण काय करणार? याबाबतची माहिती ध्येयवेड्या तरूण, तरूणींनी ८६९८७३१९९९ या क्रमांकावर ६ तारखेपर्यंत व्हॉट्स अ‍ॅप करावी. त्यानंतर ८ तारखेला जयप्रकाश बाविस्कर यांच्यासह आमची टीम ती माहिती तपासेल. त्यापैकी काही प्रस्ताव निवडून ते पाठविणा-यांशी संवाद साधेल, ध्येय असलेल्या तरूणांना पक्षात संधी दिली जाईल. त्यानंतर मी स्वत: धुळयात येऊन त्यांच्याशी चर्चा करेल, असे राज ठाकरे म्हणाले.

Web Title: Dhule city has become worse than ever before - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.