धुळे : शहरातील   पश्चिम हुडकोजवळील गोशाळेच्या भिंतीला लागून जमिनीत पुरून ठेवलेल्या सुमारे 17 लाखांच्या तांब्याच्या प्लेट बुधवारी रात्री पोलिसांच्या एका पथकाने हस्तगत केल्या. या प्लेट मध्य प्रदेशातील पिथमपूर येथील एका कंपनीतून  चोरीस गेलेल्या आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मध्य प्रदेशातील पिथमपूर येथील औद्योगिक वसाहतीतील वेदांता लि. कंपनीतर्फे 30 डिसेंबर रोजी मे विकास रोड केरीअर्स लिमिटेड ट्रान्सपोर्ट कंपनीच्या दोन ट्रकमधून तांब्याच्या प्लेट भरून गोव्याला पाठविण्यात आल्या होत्या. परंतु हे दोन्ही ट्रक गोव्याला पोहचलेच नाही. ट्रक व त्यातील माल मध्येच गायब झाला. यासंदर्भात ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मॅनेजरने पिथमपूर पोलीस स्टेशनला दोन्ही ट्रक गायब झाल्याची फिर्याद दिली होती. त्या प्रकरणाची चौकशी करताना तेथील पोलिसांना त्या ट्रकमधील काही माल हा धुळ्यात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ती माहिती धुळे पोलिसांना कळविली. त्या माहितीवरुन  पोलीस अधीक्षक एस.चैतन्या आणि अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली   पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम मोरे,  पोलीस नाईक हाजी मोहम्मद मोबीन, पंकज चव्हाण, कबीर शेख, दिनेश परदेशी, सुनील पाथरवट, पंकज खैरमोडे, नीलेश महाजन, किरन सावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.