The woman was beaten to death by a stone. Accused arested | चारित्र्यावर संशय : दगडाने ठेचून पत्नीची हत्या; पतीस अटक  
चारित्र्यावर संशय : दगडाने ठेचून पत्नीची हत्या; पतीस अटक  

वाडेगाव (जि. अकोला): चारित्र्यावर संशय घेणाºया पतीने दगडाने ठेचून पत्नीची हत्या केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी वाडेगाव जवळच असलेल्या धनेगाव शिवारात उघडकीस आली. बबिता आकाश हिवराळे (२४) रा. चितोडा, ता. खामगाव, जि. बुलडाणा असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिासांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मृतक महिलेचा पती आकाश प्रभाकर हिवराळे यास अटक केली. 
वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या धनेगाव शेतशिवारातील डॉ. नीलेश घाटोळ यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती समजताच धनेगावचे पोलीस पाटील प्रमोद लांडे यांनी वाडेगाव पोलीस चौकीला कळविले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वैभव पाटील व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळ गाठले, तसेच ठसे तज्ज्ञानांही घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. मृतक महिलेच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची हत्या करण्यात आली. तसेच महिलेची हत्या करून मृतदेह धनेगाव शेतशिवारात फेकून देण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान मृतक महिलेजवळ एक चिठ्ठी आढळली. त्यात मोबाइल क्रमांक लिहलेला होता. त्या आधारावर ही मृतक महिला बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोळा येथील रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाचा तपास करून सहायक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र अहेरकर, विजय जमनिक, संजय वाघ, गोवर्धन इंगळे यांनी तपास करून अवघ्या काही तासातच महिलेचा पती आकाश प्रभाकर हिवराळे यास अटक केली. चारित्र्यावर संशय घेऊन आकाश हिवराळे याने बबिताची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)


Web Title: The woman was beaten to death by a stone. Accused arested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.