नेमकं काय झालं भायखळा जेलमधील महिला कैद्यांना?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 02:26 PM2018-07-20T14:26:10+5:302018-07-20T14:27:01+5:30

३१२ महिला कैद्यांपैकी ८६ कैदी जे. जे. रुग्णालयात दाखल 

What happened to women prisoners in Byculla jail? | नेमकं काय झालं भायखळा जेलमधील महिला कैद्यांना?

नेमकं काय झालं भायखळा जेलमधील महिला कैद्यांना?

Next

मुंबई - भायखळ्यातील महिला कारागृहातील ८६ कैद्यांना सकाळचा नाश्ता केल्यानंतर अचानक उलट्या सुरु झाल्याने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही कैद्याची परिस्थिती गंभीर नाही. सर्व कैद्यांना प्राथमिक उपचार म्हणून अॅन्टीबायोटीक देण्यात आली आहे. उलटी होण्यासोबतच चक्कर येण्याची तक्रारही कैद्यांनी डॉक्टरांकडे केली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. 

भायखळा कारागृहाचे अधिकारी राजवर्धन सिन्हा यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी एका कैद्याला कॉलरा झाल्याचे उघड झाले. त्यानंतर, सर्वच कैद्यांची वैद्यकीय तपासणी आरोग्य विभागाने केली. दरम्यान, काही कैद्यांना एक  अॅन्टीबायोटीक खाण्यासाठी देण्यात आली होती. त्यांनतर आज सकाळी ३१२ महिला कैद्यांपैकी ८६ महिला कैद्यांना अचानक उलट्या सुरु झाल्याने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकी त्यांची तब्येत पाण्यामुळे, अन्नामुळे की अॅन्टीबायोटीक ने बिघडली हे अद्याप निष्पन्न झाले नाही. वैद्यकीय अहवाल जेव्हा हाती येतील तेव्हाच या कैद्यांना विषबाधा झाली होती का ? हे उघड होईल, असं राजवर्धन म्हणाले. या कैद्यांचे जेवण कारागृहातच बनवले जाते. 

त्याचप्रमाणे  जे.जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी आतापर्यंत रुग्णालयात ८६ कैद्यांना उपचारासाठी आणण्यात आले आहे. सकाळी ९.४० पासून कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी दोन गर्भवती महिला आहेत, तर एक 4 महिन्यांची लहान मुलगी आहे. आमचे सर्व डॉक्टर या कैद्यांवर तातडीने उपचार करत आहेत. अजूनही कैद्यांना जेलमधून उपचारासाठी आणलं जात आहे. अन्नातून विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. या कैद्यांना उलट्या होत आहेत.” कैद्यांवर उपचारांसाठी 40 डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आलं आहे. सर्व कैद्यांवर प्राथमिक उपचार करून रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल असे तायडे म्हणाले. 

जे. जे. रुग्णालयाबाहेर पोलिसांचे सुरक्षा कवच 

जे. जे. रुग्णालयात ८६ महिला कैद्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून कैदी पळून जाऊ नये. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त जे. जे. रुग्णालयाबाहेर ठेवण्यात आला आहे. 

Web Title: What happened to women prisoners in Byculla jail?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.