Washing of police who went to raid gambling at Hingoli | हिंगोलीत जुगार अड्ड्यावर छापा मारायला गेलेल्या पोलिसांचीच धुलाई
हिंगोलीत जुगार अड्ड्यावर छापा मारायला गेलेल्या पोलिसांचीच धुलाई

आखाडा बाळापूर/दांडेगाव (हिंगोली): कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यास गेलेल्या पोलिसांना जुगाऱ्यांनी  येथेच्छ धुतले आणि धूम ठोकली. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. मध्यरात्री जखमी पोलिसाच्या तक्रारीवरून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी हॉटेलमालक चांदू बळवंते यास पोलिसांनी अटक केली असून दोघे स्वत: शरण आले. इतर सर्वजण फरार आहेत.  

दांडेगाव येथील चांदू बळवंते याच्या हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची  माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली. पोलीस अंकुश शेळके व हरिप्रसाद गुरुपवार हे छापा मारण्यासाठी गेले असताना  जुगाऱ्यांनीच त्यांना घेरले. दोन्ही पोलिसांनी मारहाण करुन जुगाऱ्यांची धूम ठोकली.  या मारहाणीत शेळके व गुरुपवार यांना मुका मार लागला. त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले. याप्रकरणी अंकुश शेळके यांच्या फिर्यादीवरून अशोक साळुंखे, शिवपालसिंह ठाकूर, शंकर चांदीवाले, पंडित दवणे, अंबादास बळवंते, लक्ष्मण बळवंते, चांदू बळवंते व इतर एकूण तेरा जणांविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले करीत आहेत.

दोन वर्षांत तिसरी घटना
दांडेगाव शिवारात यापूर्वीही रामेश्वर तांडा येथील दोघांनी अवैध दारूवर छापा टाकण्यास गेलेल्या जमादारास मारहाण केली होती. दोन वर्षांपूर्वी येडशीच्या यात्रेत तिघांवर जमावाने हल्ला चढविला होता.अवैध धंदे वाल्यांची मुजोरी वाढल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. स्वत: पोलीस असुरक्षित झाल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.   

पोलीस रिकाम्या हाताने परतले
हल्लेखोरांपैकी हॉटेलमालक चांदू बळवंते यास रात्रीच पोलिसांनी अटक केली.  लक्ष्मण बळवंते व शिवपालसिंग ठाकूर हे बुधवारी सकाळी स्वत:हून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात हजर झाले. इतर सर्व आरोपी फरार आहेत.  आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, कुरूंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, महिला पोलीस निरीक्षक सविता बोधनकर  आदींच्या पथकाने बुधवारी गावात आरोपींचा शोध घेतला. मात्र पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.  


Web Title: Washing of police who went to raid gambling at Hingoli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.