डोंबिवलीतील लैंगिक शोषणः आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलीस बनले बांधकाम मजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 02:43 PM2018-07-18T14:43:18+5:302018-07-18T14:44:10+5:30

पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

Sexual harassment in Dombivli: police became construction workers to find out the accused | डोंबिवलीतील लैंगिक शोषणः आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलीस बनले बांधकाम मजूर

डोंबिवलीतील लैंगिक शोषणः आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलीस बनले बांधकाम मजूर

Next

डोंबिवली - डोंबिवलीतील मानपाडा परिसरात एका सात वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या दोघां नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हाचा छडा लावण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याचे काही पोलीस हत्या झाली त्या बांधकामाच्या ठिकाणी म्हणजेच घटनास्थळी गेले काही दिवस मजूर म्हणून काम करत होते. काम करत असताना त्यांना आरोपी अहसान आलम (वय - २२) आणि नदीम आलम (वय - २१) यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. फिल्मी स्टाईलने पोलिसांनी नाट्य रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

२४ मे रोजी डोंबिवलीतील देसलेपाडा येथे राहणारा एक सात वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आई वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानंतर या मुलाचा मृतदेह त्याच्या घरापासून जवळच सुरु असलेल्या असलेल्या बांधकामच्या ठिकाणी सापडला होता. इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातून या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. तपासाच्या सुरूवातीला असं वाटत होतं की खेळता खेळता हा मुलगा पाण्यात पडला असावा. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद केली होती. मात्र, या मुलाच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या गुप्तांगावर जखमा असल्याचे निष्पन्न झाले. 

याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी बांधकाम मजुराच्या वेशात  जिथे त्या मुलाचा मृतदेह आढळला त्या बांधकामस्थळी बांधकाम मजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दिवसरात्र पोलीस तेथील इतर मजूरांसोबत राहत, त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते. काही दिवसांनी तेथील मजूरांशी मैत्री झाल्यानंतर या पोलिसांनी २४ मे रोजी सर्व जण काय करत होते याबाबत चौकशी केली. त्यावेळी अहसान आलम आणि नदीम आलम या आरोपींनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावरून पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. याप्रकरणी या दोघांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Sexual harassment in Dombivli: police became construction workers to find out the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.