आजार बरा करण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 07:15 AM2019-03-19T07:15:13+5:302019-03-19T07:15:26+5:30

जादूटोण्याने मुलाचा कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली, विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत वर्षभर महिलेवर अत्याचार सुरू होते.

Rape on women in Mumbai | आजार बरा करण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

आजार बरा करण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

googlenewsNext

मुंबई : जादूटोण्याने मुलाचा कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली, विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत वर्षभर महिलेवर अत्याचार सुरू होते. अखेर, या प्रकरणी शनिवारी ढोंगी बाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैतन्य जुहारी उर्फ चैतन्य कुमार सोनी असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या उज्जैनला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, तपास पथक उज्जैनला रवाना झाले आहे.
तक्रारदार ३७ वर्षीय विवाहिता या चेंबूर परिसरात राहतात. त्यांच्या मुलावर कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. मुलगा लवकर बरा व्हावा म्हणून त्यांचे सर्व बाजूने प्रयत्न सुरू असतानाच, २९ मे २०१७ रोजी त्या सोनीच्या संपर्कात आल्या. सोनीने धार्मिक विधी करून मुलाचा कर्करोग बरा होऊ शकतो, असे महिलेला सांगितले. मुलाच्या प्रेमापोटी आशेने ही महिला त्याच्या जाळ्यात अडकली. त्याने तिला भस्म खाण्यास भाग पाडले आणि विधीच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार केले.
त्याच दरम्यान त्याने तिचे व्हिडीओ, फोटो काढले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. जवळपास २ आॅक्टोबर २०१८ पर्यंत विवाहितेवर अत्याचार सुरू होते. तसेच, महिलेकडूनच पैसे उकळण्यासही त्याने सुरुवात केली.
६० हजार रुपयांसह तिच्या सोन्याच्या बांगड्या त्याने काढून घेतल्या. पतीकडूनही अभिषेकाच्या नावाखाली २ लाख ९८ हजार रुपये उकळले.
अखेर, सोनीचा अत्याचार वाढत असल्याने महिलेने याबाबत पतीला सांगितले. त्यानुसार, ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी लैंगिक अत्याचार, धमकावणे तसेच जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत शनिवारी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Rape on women in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.