ठळक मुद्देमुलगी हरवल्याची तक्रार पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. पोलिसांनी आणि पालकांनी आपला शोध अवितरत सुरुच ठेवला होता.गेली आठ वर्ष मुलगी परतली नसल्याने तिच्या पालकांनी अत्यंत दु:खात घालवली.

मिशिगन - येथील डेट्रॉईट शहरातील पोलिसांनी एक अजबच प्रकार केला आहे. आठ वर्षांपूर्वी एक तरुणी डेट्रॉइटमधून हरवली होती. पोलिसांत तिच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या मृतदेहाचा शोधही लागला होता. मात्र पोलिसांनी त्यावेळेस त्यांच्या पालकांना काहीच सांगितलं नाही. आणि आता तब्बल ८ वर्षांनंतर पोलिसांनीच त्यांच्या पालकांना हा सगळा प्रकार सांगितला आहे.

क्रिस्सीटा केग-टोस्टर ही २८ वर्षीय तरुणी ऑक्टोबर २००९ साली डेट्रॉईट येथून हरवली होती. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतरही पालकांनी त्यांच्यापरीने हरवलेल्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती सापडली नाही. गेली आठ वर्ष तिचे पालक तिच्या शोधात आहेत. आज सापडेल- उद्या सापडेल या आशेवर तिचे आईवडिल होते. मात्र गेल्याच महिन्यात त्यांना पोलिसांकडून सांगण्यात आलं की तिचा मृतदेह २०१० साली सापडला होता. डेट्रॉइट नदीत तिचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. तिची लवकर ओळख पटावी म्हणून तिच्या पालकांनी तिच्या हाताला असलेल्या टॅटूचाही फोटो दिला होता. जेणेकरून कसलीही माहिती प्राप्त झाल्यास पोलीस पालकांना कळवतील. मात्र पोलिसांनी यामध्ये फार दिरंगाई केली. 

हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी पालकांची माफीही मागितली. मात्र आपल्या तरुण मुलीला गमवलेल्या आईला या गोष्टींमुळे बराच मनस्ताप झाला. त्या पोलिसांना म्हणाल्या, ‘तुम्ही मागु नका कारण त्याने माझं सांत्वन होणार नाही. गेल्या आठ वर्षांत आम्ही काय भोगलं हे या नुसतं माफीने भरून निघणार नाही.’

आठ वर्ष ज्या मुलीला आपण शोधतोय तिचा आधीच मृत्यू झालाय ही गोष्ट तिच्या पालकांसाठी किती धक्कादायक असू शकते, याची आपण कल्पना करु शकतो. त्या पालकांनी जे भोगलं ते खरंच माफीच्या पलिकडे आहे. त्यामुळे हा प्रकार समोर आल्यावर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. 

सौजन्य - www.thesun.co.uk