मंचर येथे गर्भपातास नकार दिल्याने नवविवाहितेचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 09:52 PM2018-09-28T21:52:15+5:302018-09-28T21:57:50+5:30

माहेरहून पैसे व दागिने आणत नाही,तसेच गर्भपातासही नकार देणाऱ्या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देवून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.

married murdered due to refuses abortion at Manchar | मंचर येथे गर्भपातास नकार दिल्याने नवविवाहितेचा खून 

मंचर येथे गर्भपातास नकार दिल्याने नवविवाहितेचा खून 

Next
ठळक मुद्देआरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल नवविवाहितेला फाशी दिल्याचे वैदकीय अहवालात नमूद

निरगुडसर : माहेरहून पैसे व दागिने आणत नाही,तसेच गर्भपातासही नकार देणाऱ्या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देवून ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २७) घडली. याप्रकरणी मंचरपोलिसांनी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पूनम स्वप्नील ढमाले (वय २५) असे झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती स्वप्निल भरत ढमाले, सासु संगीता भरत ढमाले, सासरे भरत ढमाले, दिर निखिल भरत ढमाले, सुमित भरत ढमाले यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पूनम हि विज्ञान शाखेची पदवीधर तर पती स्वप्नील हा बारावी शिकलेला आहे. त्याची पेठ येथे चायनीजची गाडी आहे. दोघांमध्ये प्रेम प्रकरण होते. तिच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध होता. सात महिन्यापूर्वी दोघांनी तिच्या आईवडिलांचा विरोध असतानाही विवाह केला. त्यानंतर एक महिन्याने तिच्या आईवडिलांची सहमती मिळाल्यानंतर आळंदी येथे सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत पुन्हा विवाह केला. लग्नानंतर दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. तिला वारंवार मारहान करून माहेरून पैसे व दागिने घेवून ये असा तगादा लावला होता. त्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला होता. ती तीन महिन्याची गर्भवती होती. तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला जात होता, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितले.
गुरुवारी (ता. २७) सकाळी दहा वाजण्याच्या पुर्वी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. वडील शाम भिमाजी सैद (रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) यांना  घटना समजताच ते मंचर पोलीस ठाण्यात आले. ‘‘माझी मुलगी कधीही आत्महत्या करणार नाही. सासरच्या लोकांनी पुनमचा गळा दोरीने आवळून तिला ठार केले आहे.’’ अशी फिर्याद  नोंदविली.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी भेट दिली. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री शवविच्छेदन करण्यात आले. तिला फाशी दिल्याचे वैदकीय अहवालात नमूद केले आहे. मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर तिच्यावर माहेरी महाळुंगे पडवळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पांचाळ करत आहेत.

Web Title: married murdered due to refuses abortion at Manchar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.