मालेगाव स्फोट: 'त्या' बाईक कोर्टात आणल्या, न्यायाधीशांनी पाहिल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 08:23 PM2019-07-08T20:23:44+5:302019-07-08T20:27:49+5:30

बॉम्बस्फोटासाठी वापरलेली मोटारबाईक साक्षीदाराने ओळखली

Malegaon bomb blast: Judge sees 'those' bikes in court | मालेगाव स्फोट: 'त्या' बाईक कोर्टात आणल्या, न्यायाधीशांनी पाहिल्या!

मालेगाव स्फोट: 'त्या' बाईक कोर्टात आणल्या, न्यायाधीशांनी पाहिल्या!

Next
ठळक मुद्देहे पुरावे तपासण्यासाठी न्यायाधीशांना वकील, साक्षीदार आणि आपल्या स्टाफसह कोर्टाखाली उतरावं लागलं आहे. याच सुनावणीदरम्यान आरोपी समीर कुलकर्णीच केवळ कोर्टात उपस्थित होते असून उद्यापर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. 

मुंबई: मालेगाव २००८ बॉम्बस्फोट घडविण्यासाठी भाजपची भोपाळची खासदार प्रज्ञासिंह ठाकूर हिच्या मोटारबाईकमध्ये स्फोटके ठेवण्यात आली, असा आरोप ठाकूरवर आहे. ही बाईक आणि पाच सायकली पुरावा म्हणून एका टेम्पोमधून सोमवारी विशेष एनआयए न्यायालयात आणण्यात आल्या. पुराव्यांची पाहणी करण्यासाठी न्यायाधीशांसह, वकील व साक्षीदार कोर्टरुम सोडून न्यायालयाच्या इमारतीखाली उतरले व ज्या टेंपोमध्ये हे पुरावे आणण्यात आले होते, त्या टेंपोत चढून पुराव्यांची पाहणी केली. दरम्यान, साक्षीदाराने बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटारबाईक न्यायाधीशांसमोर ओळखली.

नाशिकमधील मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात सहाजण मृत्यूमुखी पडली तर १०० हून अधिक लोक जखमी झाली. या बॉम्बस्फोटासाठी स्फोटके ठेवण्याकरिता ठाकूरची ‘एलएमएल फ्रीडम’ वापरण्यात आली, असा आरोप पोलिसांनी केला आहे. घटनेच्या दिवशी हीच मोटारबाईक घटनास्थळावर होती, अशी साक्ष एका साक्षीदाराने न्यायाधीशांसमोर दिली.
सुरुवातील या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस)ने केला. बॉम्बस्फोटासाठी स्फोटके ठेवण्याकरिता ठाकूरने तिच्या जवळची व्यक्ती व याप्रकरणी अद्यापही फरारी असलेला रामजी कलसंग्रा याला दिली, असा आरोप एटीएसने केला आहे.

त्यनंतर २०१११ नंतर हा तपास राष्ट्रीय तपास पथक (एनआयए)कडे वर्ग करण्यात आला. एनआयएने २०१६ मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल करून ठाकूरला क्लीनचिट दिली. बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटारबाईक ठाकूरच्या ताब्यात नव्हती. बॉम्बस्फोटापूर्वी दोन वर्ष ती बाईक कलसंग्राच्या ताब्यात होती. त्यामुळे तिचा या बॉम्बस्फोटाशी संबंध नाही, असे म्हणत एनआयएने ठाकूरला क्लीनचिट दिली.

एनआयएने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राचा हवाला देत ठाकूरने या आरोपातून मुक्त करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज सादर केला. २७ डिसेंबर २०१७ रोजी विशेष न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला. सकृतदर्शनी, बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटारबाईक ठाकूरच्या नावावर आहे. आरटीओमध्ये तिच्याच नावावर संबंधित मोटारबाईकची नोंदणी करण्यात आलेली आहे. ती मोटारबाईक आजही तिच्याच नावावर आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

विशेष न्यायालयात या खटल्यावर दररोज सुनावणी सुरू आहे. आता मंगळवारी यावर सुनावणी सुरू राहणार आहे. समीर कुलकर्णीशिवाय सोमवारच्या सुनावणीत एकही आरोपी उपस्थित नव्हता.

ठाकूरशिवाय या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या खटल्यात आरोपी आहेत.



 

 

Web Title: Malegaon bomb blast: Judge sees 'those' bikes in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.