गौरी लंकेश हत्येतील मुख्य आरोपी एटीएसच्या कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:59 PM2018-09-14T23:59:19+5:302018-09-15T00:01:00+5:30

हे दोघेही वैभव राऊतच्या संपर्कात होते. त्यांनी सोबतच शस्त्र तसेच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा संशय एटीएसला आहे.

The main accused in murder of Gauri Lankesh, in the custody of ATS | गौरी लंकेश हत्येतील मुख्य आरोपी एटीएसच्या कोठडीत

गौरी लंकेश हत्येतील मुख्य आरोपी एटीएसच्या कोठडीत

Next

मुंबई - पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील मुख्य आरोपी  सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांचा सहभाग नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातही स्पष्ट झाल्याने बुधवारी एटीएसने त्यांचा ताबा घेतला आहे.पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल आणि पद्मावत सिनेमादरम्यान बेळगावात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटात या दोघांचाही सहभाग असल्याचे एटीएसच्या तपासादरम्यान पुढे आले आहे. या दोघांवर एटीएसने गुन्हा नोंदवला असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे या प्रकरणात आता अटक आरोपींची संख्या ९ वर पोहचली आहे. 

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी पोलिसांनी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार, वासुदेव सूर्यवंशी आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उखर्डूली लोधी या ९ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करताना एटीएस आणि सीबीआयला  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले. पोलिस चौकशीत पुढे शूटर सचिन अंधुरेचे नाव पुढे आल्यानंतर शरद कळसकरचा सहभाग ही निश्चित झाला. मात्र, ही दोन्ही प्रकरण उघडकीस आली ती पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अमोल काळेच्या अटकेनंतर त्यामुळे अधिक चौकशीसाठी आता काळेचा ताबा सीबीआयने मिळवला आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांनी अमोल काळे याला अटक केली. त्याच्या चौकशीतून शरद कळसरकर, वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांची नावे पुढे आली. या तिघांच्या चौकशीत हा गुंता पुढे सोडवण्यात एटीएस, सीबीआयला यश आले. याच प्रकरणात, राऊतच्या चौकशीतून लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या कुमार आणि कुरणे यांची नावे समोर आली. बंगळुरूचा कुमार हा ३ महिन्यांपासून तर बेळगावचा कुरणे गेल्या दीड महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत आहे. कर्नाटक पोलिसांकडून दोघांचा ताबा मिळताच, बुधवारी दोघांना नालासोपारा स्फोटकांप्रकरणी एटीएसने अटक केली. त्यांना सत्र न्यायालयात हजर करत कोठडीची मागणी केली. स्फोटके प्रकरणात जप्त स्फोटकांमध्येही दोघांचा सहभाग असल्याची शक्यता एटीएसने न्यायालयात वर्तवली. हे दोघेही वैभव राऊतच्या संपर्कात होते. त्यांनी सोबतच शस्त्र तसेच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा संशय एटीएसला आहे.

Web Title: The main accused in murder of Gauri Lankesh, in the custody of ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.