परदेशी जोडीदाराच्या स्वप्नात गमविली आयुष्याची जमापुंजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:31 AM2019-07-22T03:31:59+5:302019-07-22T03:32:19+5:30

पावणेतीन लाखांची फसवणूक : जेट एअरवेजच्या कार्गो असिस्टंट महिलेची व्यथा

Life partner of a foreign couple lost their dream | परदेशी जोडीदाराच्या स्वप्नात गमविली आयुष्याची जमापुंजी

परदेशी जोडीदाराच्या स्वप्नात गमविली आयुष्याची जमापुंजी

googlenewsNext

मुंबई : जेट एअरवेज बंद पडल्यामुळे आधी नोकरी गेली आणि त्यात परदेशी जोडीदाराशी लग्न करण्याच्या स्वप्नात आयुष्याची जमापुंजी गमविण्याची वेळ पवईतील एका महिलेवर आली आहे.

मरोळ परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षांच्या नेहा (नावात बदल) आई, वडील आणि भावासोबत राहतात. २०१५ मध्ये त्या जेट एअरवेजमध्ये कार्गो असिस्टंट पदावर रुजू झाल्या. २०१९ मध्ये जेट एअरवेज बंद पडल्यामुळे जूनमध्ये त्यांना एका नामांकित कंपनीत नोकरी लागली. याच दरम्यान वय वाढत असल्याने आईने लग्नाचा तगादा लावला. २०१७ मध्ये तिने जीवनसाथीडॉटकॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानुसार, तिच्या मोबाइलवर वेगवेगळे प्रोफाइल येत होते. २२ मे रोजी करुणाकर रेड्डी नावाच्या तरुणाची रिक्वेस्ट तिला आली. त्याने तो अमेरिकेतील राहण्यास असून, तेथीलच एका नामांकित कंपनीत १० वर्षांपासून इंजिनीअर म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. तिलाही त्याचा प्रोफाइल आवडल्याने दोघांमध्ये संवाद वाढला, ओळख वाढली. त्याचे रूपांतर प्रेमात होत, दोघांनी लग्न करायचे ठरविले.
संवादादरम्यान, रेड्डीने नोकरी सोडून तो भारतात येत असल्याचे सांगितले.

अमेरिकेमध्ये कमविलेले पैसे आणि व्यवसायानिमित्त आणलेले महत्त्वाचे साहित्य व कागदपत्रे शिपमध्ये सोबत घेतल्याचे सांगितले. ७ जून रोजी त्याचे जहाज भारतात पोहोचणार असल्याचे सांगितले. भारतात आल्यानंतर त्याने लग्न करू, असेही नेहाला सांगितले. नेहाने दोघांच्या सुखी संसाराचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली. मात्र, त्यापूर्वीच तिची फसवणूक झाली. यात, तिने आतापर्यंत तिने पावणेतीन लाख रुपये गमविले आहेत.

...म्हणे समुद्र लुटेरे मागे लागले
३ जून रोजी तिने रेड्डीच्या आईच्या नावाने आलेला मेल पाहिला. त्यात, सोमालीयन समुद्री लुटेरे हे आमच्या जहाजाचा पाठलाग करत आहेत. त्यामुळे कॅप्टनने आमची शिप एका ठिकाणी थांबविली असून, त्या ठिकाणी आम्ही आमच्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे व रोख विदेशी चलन हे सर्व नेपच्यून सिक्युरीटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले. तिचा पत्ता घेत, त्यावर सर्व पाठवित असल्याचेही सांगितले. तिनेही विश्वास ठेवून त्याला पत्ता दिला.

... आणि पावणेतीन लाखांचा गंडा
पुढे नेपच्यून सुरक्षा कंपनीतून बोलत असल्याचे सांगून थॉमस नावाच्या व्यक्तीने कॉल केला. पार्सल शुल्क म्हणून तिला ९३ हजार रुपये देण्यास सांगितले. सुरुवातीला तिने नकार दिला. मात्र, रेड्डीने तिला भारतात परतल्यावर पैसे देण्याचे आश्वासन दिले. तिनेही विश्वास ठेवत पैसे ऑनलाइन पाठविले. पुढे सर्व ऐवज सुखरूप भारतात पोहोचला असून, तिला पॅनल्टी चार्ज म्हणून १ लाख ५२ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पार्सल कस्टम विभागाकडे असून, लवकरच मिळेल, असे सांगितले.

वेळीच सतर्क...: ९ जून रोजी थॉमसने पुन्हा कॉल करून, पार्सलमध्ये विदेशी चलन असल्याने ३ लाख ८२ हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, यावेळी तिला संशय आला. तिने रेड्डीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानेही प्रतिसाद दिला नाही़ यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संपर्क थांबविला. या प्रकरणात तिने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Life partner of a foreign couple lost their dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.