संपत्तीच्या मोहातून पत्नी, सासऱ्याची क्रूरपणे हत्या करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:27 PM2018-09-14T13:27:24+5:302018-09-14T13:27:55+5:30

खोऱ्याने वार करून दोघांचा खून करणाऱ्या आरोपीस आज अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

Life imprisonment till death for killer of wife and father-in-law, through the motive of wealth | संपत्तीच्या मोहातून पत्नी, सासऱ्याची क्रूरपणे हत्या करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

संपत्तीच्या मोहातून पत्नी, सासऱ्याची क्रूरपणे हत्या करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

googlenewsNext

उस्मानाबाद : पत्नी, सासऱ्याच्या डोक्यात, पोटात चाकू, खोऱ्याने वार करून त्यांचा खून करणाऱ्या आरोपीस आज अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रूपये दंडही ठोठावला़ ही घटना २२ जानेवारी २०१३ रोजी सायंकाळी उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे घडली होती.

याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी दिलेली माहिती अशी की, ढोकी येथील लिंबराज रामचंद्र कंगले (वय-६०) यांच्या घरी त्यांचा जावई शिवाजी साहेबराव मडके (वय-४० रा़मोहा ताक़ळंब) हा २२ जानेवारी २०१३ रोजी सायंकाळी आला होता़ त्यावेळी शिवाजी मडके याने पत्नी सुरेखा (वय-३६) यांना शेतीची कागदपत्रे व पैशाची मागणी केली़ सुरेखा यांनी ‘शेतीचे कागदपत्र व पैसे दिल्यास मुलांच्या भवितव्याचे काय’ असा सवाल केला़ त्यावेळी शिवाजी मडके याने घराचे दार लावून सोबत आणलेल्या पिशवीतील चाकू काढला़ त्यावेळी लिंबराज कंगले यांनी मध्यस्ती करून तो चाकू त्याच्या हातातून घेऊन फेकून दिला.त्यानंतर मडके याने जवळ पडलेला खोऱ्या घेऊन लिंबराज कंगले यांच्या डोक्यात मारला़ यात जखमी झालेले कंगले हे जमिनीवर कोसळले़ त्यावेळी मध्यस्थी करणाऱ्या सुरेखा यांच्या पोटात, हातावर मडके याने चाकूने वार केले़ जमिनीवर पडलेल्या लिंबराज कंगले यांच्याही छातीवर चाकूने वार केले़

ही घटना पाहून घरात असलेल्या दोन्ही मुली घाबरून घराबाहेर पळून गेल्या़ आरडाओरड ऐकून लोक जमा होत असल्याचे पाहून शिवाजी मडके याने घटनास्थळावरून पळ काढला़ जखमींना ढोकी येथील रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केल्याची फिर्याद राजेंद्र गोपाळ गाढवे (रा़दत्तनगर ढोकी) यांनी ढोकी पोलीस ठाण्यात दिली होती़ गाढवे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी साहेबराव मडके (रा़ मोहा ताक़ळंब) याच्याविरूध्द भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल झाला होता़ या प्रकरणाचा ढोकी पोलिसांनी तपास करून अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारापपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांच्या समोर सुनावणी झाली़ सरकार पक्षाकडून १३ साक्षीदार तपासण्यात आले़ यावेळी समोर आलेले पुरावे, साक्ष व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र बी़ देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांनी आरोपी शिवाजी मडके यास मरेपर्यंत जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ तसेच दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़

Web Title: Life imprisonment till death for killer of wife and father-in-law, through the motive of wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.