लोन ट्रान्सफरच्या वादातून मुलाचे अपहरण झाले,पोलिसांनी अवघ्या 4 तासांत आरोपींना जेरबंद केले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:59 PM2019-03-25T13:59:32+5:302019-03-25T14:02:25+5:30

आरोपींची नावे जिन्नत बचरसिंग राव(28), सरोज जिन्नत राव(25), आणि जिन्नतचा भाऊ अर्जुन बचरसिंग राव(25) अशी आहेत. 

Kidnapped son for loan transfer, arrested the accused in just four hours | लोन ट्रान्सफरच्या वादातून मुलाचे अपहरण झाले,पोलिसांनी अवघ्या 4 तासांत आरोपींना जेरबंद केले

लोन ट्रान्सफरच्या वादातून मुलाचे अपहरण झाले,पोलिसांनी अवघ्या 4 तासांत आरोपींना जेरबंद केले

Next
ठळक मुद्देनआरआय पोलिसांच्या या उल्लेखनीय कारगिरीबद्दल नवी मुंबई पोलील आयुक्त संजय कुमार यांनी या पथकाला विशेष बक्षिस जाहीर केले रात्री 10 च्या सुमारास भरूच टोल नाका येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक योगेश गढीया व एसओजीचे पोलीस अधिकारी यांनी ही गाडी आणि मुलाला ताब्यात घेतले.

नवी मुंबई - विकलेल्या गाडीचे लोन ट्रान्सफर करण्याच्या वादातून मूळ गाडीमालकाच्या अडीच वर्षाच्या मुलाचेच अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. एनआरआय पोलिसांच्या तीन पथकांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना अटक करून मुलाला आईवडिलांच्या ताब्यात सुरक्षितपणे दिले आहे. एनआरआय पोलिसांच्या या उल्लेखनीय कारगिरीबद्दल नवी मुंबई पोलील आयुक्त संजय कुमार यांनी या पथकाला विशेष बक्षिस जाहीर केले असल्याची माहिती परिमंडळ 1 चे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली. अटक केलेल्या आरोपींची नावे जिन्नत बचरसिंग राव(28), सरोज जिन्नत राव(25), आणि जिन्नतचा भाऊ अर्जुन बचरसिंग राव(25) अशी आहेत. 

23 मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास हसिना अब्दुल हमिद शेख( 25) यांनी सरोज जिन्नत राव ही महिला आपल्या अडीच वर्षाचा मुलाला आईस्क्रिमच्या देतो असे सांगून घरातून घेऊन गेली. मात्र अद्यापर्यंत परत घेऊन आली नाही अशी तक्रार एनआरआय पोलीस ठाण्यात नोंदविली. जिन्नत राव हा आपल्या इमारतीखाली त्यावेळी उभा होता आणि त्याने मुलाला गाडीतून कुठेतरी नेले त्यानंतर त्याचा मोबाईलही बंद येत असल्याची माहिती हसिना यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार तातडीने पोलिसांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस सह आयुक्त डॉ. सुरेश कुमार मेकला यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 चे उपायुक्त सुधाकर पठारे व तुर्भे विभागाचे सहपोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी तत्काळ शोध अभियान राबविण्यास सुरूवात केली.

जिन्नत हा मूळचा राजस्थानमधील जालोर जिल्हातील रहिवासी असून त्याच्याकडे हुंडाई अक्सेन्ट ही गाडी असल्यामुळे तो तिथे जाऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्यासाठी तीन पथके बनविली.एका पथकाला नवी मुंबई ते राजस्थानपर्यंतच्या महामार्गांवरील टोल नाक्यांवर या वाहनाचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली. एका पथकाला गुजरात राज्यातील विविध जिल्ह्यांतील स्थानिक गुन्हे शाखा व विशेष अभियान ग्रुप (एसओजी) चे पोलीस अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी देवून गुजरातला रवाना करण्यात आले. एका पथकाला गुजरात व राजस्थान येथील विविध जिल्हांतील नियंत्रण कक्षाक्षी समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली. पोलीस हवालदार गोकुळ ठाकरे यांनी याकामी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या टोकनाक्यांशी असलेल्या संपर्कामुळे ही गाडी वापी, वलसाड, सुरत, भरूचमार्गे गेल्याची माहिती त्यांना तातडीने मिळाली, त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक भूषण कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक योगेश परदेशी यांनी गुजरात येथील संबंधित गुन्हे शाखा आणि एसओजीचे पोलीस अधिकारी यांना ही माहिती दिली. अखेर रात्री 10 च्या सुमारास भरूच टोल नाका येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक योगेश गढीया व एसओजीचे पोलीस अधिकारी यांनी ही गाडी आणि मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींना एनआरआय पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Kidnapped son for loan transfer, arrested the accused in just four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.