कमाल करते हो पांडेजी... मुंबई पोलीस दलातील 'मिसिंग स्पेश्यालिस्ट' 

By पूनम अपराज | Published: July 19, 2018 08:37 PM2018-07-19T20:37:52+5:302018-07-19T20:38:46+5:30

Kamal Karate Ho ... Pandey ... 'Missing Specialist' in Mumbai Police Force | कमाल करते हो पांडेजी... मुंबई पोलीस दलातील 'मिसिंग स्पेश्यालिस्ट' 

कमाल करते हो पांडेजी... मुंबई पोलीस दलातील 'मिसिंग स्पेश्यालिस्ट' 

Next

घरातला एखादा माणूस हरवला तर कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकते. कुठे गेला असेल, कुणी नेलं असेल, का नेलं असेल, काही अघटित तर घडलं नसेल, अशा एक ना अनेक शंकाकुशंकांनी अख्खं घर अस्वस्थ होतं. अशा कुटुंबांसाठी मुंबई पोलीस दलातील 'मिसिंग स्पेश्यालिस्ट पांडेजी' हे देवदूत ठरतात. तब्बल सातशेहून अधिक हरवलेल्या व्यक्तींना शोधून काढण्याची किमया या कर्तव्यदक्ष शिपायानं केली आहे. त्याचं नाव आहे, कॉन्स्टेबल राजेश पांडे.   

एखाद्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हेगारांना शोधून काढण्यात स्कॉटलंड पोलीस अव्वल क्रमांकावर आहेत. त्यानंतर आपल्या मुंबई पोलिसांचा नंबर लागतो. मात्र, अडीच वर्षांपासून हरवलेल्या एका चित्रपट अभिनेत्याला शोधताना मुंबई पोलिसांची दमछाक झाली आहे. मुलुंड पोलिसांनी अक्षरशः हात टेकले आणि मालाड पोलीस ठाण्याचे राजेश पांडे यांची मदत मागितली आहे. त्यामुळे आता विशाल ठक्करला शोधून काढण्यासाठी पांडेजी शक्कल लढविणार आहेत. 

मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात विशाल महेंद्र ठक्करनं छोटी भूमिका केली होती. प्रेमभंग झाल्यानं आत्महत्येचा प्रयत्न करणारा, हॉस्पिटलमध्ये मुन्नाभाई ज्याला समजावतो, तो तरुण आठवतोय? तोच हा विशाल ठक्कर. वय ३१ वर्षं. डिसेंबर २०१५ पासून हा अभिनेता बेपत्ता आहे. त्याला शोधण्याचं काम मुलुंड पोलीस करताहेत. पण, या तपासात फारसं काहीच निष्पन्न होत नसल्याने ठक्कर कुटुंबीय नाराज आहेत. आपला मुलगा नक्कीच घरी येईल अशी आशा विशालची आई दुर्गा ठक्कर यांना आहे. त्यासाठी त्यांनी देवाला साकडंही घातलंय. त्यांना जेव्हा मिसिंग स्पेश्यालिस्ट पांडेजींबद्दल वृत्तपत्रातून कळलं, तेव्हा त्यांना मोठाच आधार मिळाला. त्यांनी पांडेंची भेट घेऊन, आपल्या मुलाला शोधण्याची विनंती केली. त्यानंतर आता पांडेजी मुलुंड पोलिसांना मदत करणार आहेत. 

जाणून घेऊया, कोण आहेत राजेश पांडे ?

सध्या मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले राजेश पांडे हे ५१ वर्षांचे आहेत. १९९३ साली ते पोलीस शिपाई म्हणून मुंबई पोलीस दलात रुजू झाले. त्यांचे वडील कालीदिन पांडे हे देखील मुंबई पोलीस दलात काम करत. १९९७ साली त्यांचे अपघातात  निधन झाले. ते मूळ उत्तर प्रदेशातील असून त्यांचा जन्म, शिक्षण मुंबईत झाले आहे.  गेल्या २५ वर्षांच्या पोलीस सेवेत त्यांनी पोलीस मुख्यालय, एल-विभाग, गुन्हे शाखेत काम केले आहे. २०११ रोजी त्यांची सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेमणूक झाली होती. तिथे गुन्हे शाखा आणि तडीपार विभागात कार्यरत असताना त्यांनी हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या या कामाचे यश पाहून त्यांना याच कामासाठी  नेमण्यात आले आहे. सध्या ते मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत असून तिथे त्यांना चार वर्ष पूर्ण झाली आहे. मालाड पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वीच एक ६७ वर्षीय वयोवृद्ध पुरुष हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याच रात्री पांडे यांना पोलिसांतील जनसंपर्कामुळे हरवलेली वृद्ध व्यक्ती सायन पोलिसांना सापडली असून त्यांना उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. लागलीच त्यांनी याची दखल घेत हरवलेल्या व्यक्तीच्या मुलाला संपर्क साधला. त्यानंतर ते त्या आजोबांना घरीरही घेऊन गेले, पण त्यांची प्राणज्योत मालवली. 

२०११ पासून त्यांनी सातशेहून अधिक हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेतला आहे. त्यात बहुतांश वयोवृद्धांसह अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अनेकदा हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्यांना बँकाँकसह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, गुवाहाटी, गोवा, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांत जावे लागले होते. त्यांच्या कामाचे वरिष्ठांनी नेहमीच कौतुक केले. त्यांना अलीकडेच माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्याकडून गौरविण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्यांना काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांचे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. 

हरवलेल्यांना शोधण्यासाठी असं काय करतात पांडे?

पांडे हे संपूर्ण भारतातील मिसिंग व्हॉट्स अप ग्रुपचे मेम्बर आहेत. तसेच मोबाईल लोकेशन आणि वाय - फाय लोकेशन आणि इतर तंत्रज्ञान वापरून ते हरवलेल्यांना शोधतात. तसेच दांडगा जनसंपर्क देखील महत्त्वाची भूमिका पार पडतो. अनेकदा पांडे आपली खरी ओळख लपवून वेष बदलून देखील हरवलेल्या व्यक्तीचा माग काढतात. ते म्हणतात, मला मुलींची फार काळजी वाटते. त्यामुळे हरवलेल्या मुलींना शोधून काढण्यासाठी मी शर्थीचे प्रयत्न करतो. प्रेमप्रकरणातून काही मुली फरार होतात. अल्पवयीन, लहानग्या मुलांना काही उद्देशाने पळविले जाते. १८ वयोगटाखालील मुलं - मुलींच्या केसेस या अपहरण म्हणून घेतल्या जातात. १८ वयोगटावरील व्यक्तींच्या केसेस मिसिंग म्हणून घेतल्या जातात. १२ वर्षांची चिमुकली अहमदाबाद येथील चाईल्ड वेल्फेयर सोसायटीत असल्याची माहिती मिळताच पांडे यांनी तिला तिच्या पालकांकडे सुखरूप पोहोचवलं होतं.तसेच नवी मुंबईत माजी सैनिकांची हरवलेली आई पांडे यांनीच शोधून काढली. हरवलेल्या व्यक्तींचा ३५ वर्षांचा डेटा हा पुण्यात जमा केला जातो. ज्येष्ठ नागरिक हरवलेल्याच्या केसेस खूप असल्याचं सांगत पांडे यांनी त्यावर उपाय देखील सांगितला आहे. वय वाढल्याने, स्मृती गेल्याने ज्येष्ठ नागरिक हरवतात. पण ज्यांच्या घरी वयोवृद्ध आई - वडील आहेत, त्यांनी त्यांच्या बॅगेत घरातील व्यक्तींची माहिती, संपर्क क्रमांक ठेवावा किंवा त्यांच्या हातावर घरातील व्यक्तीचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवावा, अशी मोलाची सूचना पांडे यांनी केलीय.

थर्टी फर्स्टच्या पार्टीला गेलेला विशाल ठक्कर परतलाच नाही 

चांदनी बार, टँगो चार्ली, मुन्नाभाई एमबीबीएस आदी चित्रपटासह काही हिंदी मालिकांमध्ये विशाल ठक्कर याने काम केले आहे. चाँदनी बार आणि मुन्नाभाई एमबीबीएसमधील त्याच्या भूमिकेची सर्वांनीच प्रशंसा केली होती. त्यामुळे अल्पावधीत त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. ३१ डिसेंबर २०१५ रोजी विशाल हा चित्रपट पाहण्यासाठी घरातून निघून गेला. रात्री उशिरा घरी आला नाही म्हणून त्याच्या आईने त्याला फोन केला. यावेळी त्याने आपण थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी मित्रांसोबत जात असल्याचे सांगितले. मात्र, दुसर्‍या दिवशी तो घरी आलाच नाही. त्यानंतर ठक्कर कुटुंबीयांनी विशालचा सर्वत्र शोध घेतला. मित्रमंडळी, नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली, मात्र तो कुठेच नव्हता. त्यामुळे त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार केली होती. त्याचा फोटो आणि संपूर्ण तपशील असलेला मजकूर असलेले पोस्टर्सही विविध पोलीस ठाण्यात व परिसरात लावले. इतकेच नव्हे तर विशालची माहिती देणार्‍या व्यक्तीला योग्य ते बक्षीस दिले जाईल असेही जाहीर केले. मात्र, अडीच वर्ष उलटूनही अद्याप विशाल सापडला नाही. शेवटी विशालच्या आईने पांडे यांच्याकडे नव्या उमेदीने धाव घेतली आहे. विशालचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. काही महिने ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. मात्र, त्यांच्यात वाद झाला आणि या तरुणीने त्याच्याविरुद्ध मारहाणीसह लैगिंक अत्याचाराची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली होती. याच गुन्ह्यात नंतर विशालला जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर या तरुणीनेही विशाल विरोधातील तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शविली होती. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन त्याच्या याच तरुणीच्या घराजवळ होते, मात्र पंधरा दिवसांनी त्याचा मोबाईल बंद झाला होता.

Web Title: Kamal Karate Ho ... Pandey ... 'Missing Specialist' in Mumbai Police Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.