बस आग प्रकरणी अखेर जबाबदारी निश्चित; पहिलाच गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 10:15 PM2019-02-05T22:15:36+5:302019-02-05T22:16:16+5:30

पीएमपी कार्यशाळाअधीक्षकासह तिघांवर गुन्हा 

Just fix responsibility for the matter after the fire; First offense | बस आग प्रकरणी अखेर जबाबदारी निश्चित; पहिलाच गुन्हा

बस आग प्रकरणी अखेर जबाबदारी निश्चित; पहिलाच गुन्हा

Next

पुणे -  बसच्या अंतर्गत यांत्रिक सुरक्षितेची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने पीएमपी बसला आग लावून प्रवाशांचा जीव धोक्यात आल्याने वानवडी पोलिसांनी हडपसर आगाराचे कार्यशाळा अधीक्षक व दोन फिटरांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या साडेतीन वर्षात पीएमपीच्या सुमारे २१ हून अधिक बसना अचानक आग लागून त्यात बसमधील प्रवाशांचा जिविताला धोका उत्पन्न झाला आहे. चालत्या बसला आग लागण्याच्या घटनांनी प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करु नये, यासाठी पीएमपीकडून पोलिसांवर दबाब आणण्यात येत होता. 

कार्यशाळा अधीक्षक मनोहर पिसाळ, फिटर गोरखनाथ विश्वनाथ भोसले आणि कैलास नारायण गव्हाणे (हडपसर आगार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.याबाबतची माहिती अशी, हडपसर ते कात्रज कोंढवा ही मार्ग क्रमांक २९१ ची बस (एम एच १२/ ई़ क्यु ७७९६) ही १७ डिसेंबर २०१८ रोजी सोलापूर महामार्गाने रामटेकडी चौकातून जात होते. प्रवासी चढत व उतरत असताना रामटेकडी चौकात बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. चालकाने बस रामटेकडी चौक पास करुन बीआरटी मध्येच थांबविली. प्रवासी खाली उतरवले़ तेवढ्यात बसने पेट घेतला. त्यामुळे बसच्या पुढील भागामधील केबीन, टायर, बाक, तसेच इंजीनचा भाग व पत्रा जळाला़ त्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने येऊन आग विझविली़ या घटनेमध्ये चालकाच्या म्हणण्यानुसार अंदाज ३ लाख रुपयांचे नुकसान झाले़ त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही़ पोलिसांनी पंचनामा करुन चालकाचा जबाब नोंदविला़ याप्रकरणी अकस्मात जळीत अशी नोंद केली होती.

या प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड व सहायक आयुक्त मिलिंद पाटील यांनी ही घटना गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले़ वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबुल यांनी याचा तपास केला़ मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमपीचे अपघात विभागाचे निरीक्षक आणि हडपसर आगार वर्कशॉपचे व्यवस्थापक यांना पत्रव्यवहार करुन माहिती घेतली़ त्यात जळालेली बस ही बसच्या इंजीन बोनेटच्या आतील बाजूस स्टार्टरजवळ वायरिंगचा शॉर्टसर्किट होऊन बसने पेट घेतला आहे़ असे निष्पन्न झाले़ त्याप्रमाणे बसची अंतर्गत यांत्रिक सुरक्षितेतेची कायदेशीर जबाबदारी कार्यशाळा अधीक्षक तसेच फिटर यांची असताना त्यांनी यांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष व बेजाबदारपणा केल्यामुळे वाहनाची यांत्रिक सुरक्षेकडे लक्ष दिले नाही़ त्यामुळे ही घटना घडली असल्याचे फिर्यादींचे मत झाले़ त्यावरुन कार्यशाळा अधीक्षक व दोघा फिटरांविरुद्ध भादवि क्ऱ ३३६, ३८७ तसेच मोटार वाहन अधि़ १९८८ चे कलम १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पीएमपी कर्मचाऱ्यांवर  गुन्हा दाखल करुन अन्याय केला आहे़ क्लिनर व हेल्पर हे मदतनीस म्हणून त्यांची जबाबदारी आहे़ त्यांना फिटरचे काम सोपविण्यात आले होते़ ही प्रशासनाची चुक असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे अन्यायकारक आहे़ गुन्हा मागे न घेतल्यास पीएमपी कामगार आंदोलन करतील़.  

राजेंद्र खराडे, अध्यक्ष, इंटक, पीएमपी़

Web Title: Just fix responsibility for the matter after the fire; First offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.