Georgyan foreign gang detained in Goa | गोव्यात घरफोडी करणारी जॉर्जीयन विदेशी टोळी जेरबंद 
गोव्यात घरफोडी करणारी जॉर्जीयन विदेशी टोळी जेरबंद 

म्हापसा - गोव्यात पहिल्यांदाच घरफोडी करणा-या विदेशी नागरिकांच्या आंतराष्ट्रीय टोळीस हणजूण पोलिसांनी जेरबंद केले. घरफोडी घटनेची तक्रार दिल्यानंतर अवघ्या काही तासात चौघा संशयीतांना अटक करून त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी घेतली. कोन्स्टटाईन लायदेझ (४६), लुरा पिरवेली (४२), लाशा गुरचीआनी (४६), रावली तामीयानी (३३) सर्व जॉर्जिया नागरिक अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. 

घरफोडीची तक्रार बामणवाडो-शिवोली येथील मारिया इझाबेला फर्नांडिस (५०) यांनी दिली होती. या बाबत हणजूण पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ११ रोजी मारिया फर्नांडिस यांच्या घरात घरफोडी झाली. या दिवशी सायंकाळी ६.३० ते ९.३० यावेळेत मारिया फर्नांडिस यांच्या घरातील सर्व जण कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले होते. रात्री जावून पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घरातील कपाट फोडून घरातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने व किंमती वस्तू चोरून नेल्याचे आढळले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून तीन लाखांची रोख रक्कम (वेगवेगळ्या प्रकारात) तसेच दोन लाख किंमतीचे दोन नेकलेस, दोन लाख किंमतीच्या ७० ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या बांगड्या, एक लाख किंमतीची जाड सोन्याची बांगडी, एक लाख किंमतीच्या १५ जोड्या कानातील रिंग, एक लाख ३० हजार किंमतीच्या दोन सोन्याच्या चैनी, ७५ हजार रुपये किंमतीच्या पाच सोन्याच्या अंगठ्या, पाच हजार किंमतीची एक गोल्ड प्लेटेड पैजण, ५० हजार किंमतीचे वितळलेले सोने (काळ्या रंगाचे) असा एकूण ११ लाख ६० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

तक्रारीनंतर हणजूण पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विश्वजित चोडणकर यांनी तपास कार्यास सुरुवात केली. घरफोडी झालेल्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासली असता त्या घराजवळ रात्रीच्यावेळी एक वाहन येऊन थांबलेले व काही जणांच्या हालचाली आढळल्या. त्यातील एक जण तेथील एका स्थानिकाजवळ बोलताना आढळला. त्या स्थानिकाकडे चौकशी केली असता रेंट अ कार हृुंदाई कार असल्याचे समजले. हणजूण पोलिसांनी रेंट अ कार संघटनेशी संपर्क साधून दीड हजार रेंट अ कार मधून जॉर्जिया (विदेशी) नागरिकांनी भाड्याने घेतलेल्या गाडीची माहिती मिळवली व सदर कार हडफडे येथे असल्याचे समजले. 

त्यानंतर निरीक्षक नवलेश देसाई, उपनिरीक्षक विश्वजित चोडणकर, उपनिरीक्षक तेजस कुमार नाईक, महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा पेडणेकर, पोलीस शिपाई विशाल नाईक, सुहास जोशी, अनंत च्यारी, रूपेश मठकर, तीर्थराज म्हामल, संतेद्र नास्रोडकर, यतीन शेट्ये, गोदिश गोलतेकर, संजय गावडे, आदर्श नागेशकर या पोलीस पथकाने हडफडे येथे गाडी असलेल्या ठिकाणी दबा धरून तेथील एका इमारतीतील खोलीवर धाड टाकून चौघा संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून पोलिसांनी २,४५,९२० रोख तसेच ५९० यूएस डॉलर (सर्व मिळून ३ लाखांची रोख) दोन नेकलेस, १२ कानातील रिंग, एक अंगठी, एक पैंजण, तीन बांगड्या, एक नेकलेस, दोन कडे, वितळलेले सोने (सर्व मिळून सहा लाखांचा) असा एकूण ९ लाखांचा ऐवज हस्तगत केला. यातील सोने सदर चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूला शेतात पुरून ठेवलेले होते. 

तसेच हणजूण पोलिसांनी या संशयीताकडून जीए ०३ डब्ल्यू ३०१६ क्रमांकाची आयटेन रेंट अ कार, एक स्टिल टॉर्च, काळ्या दांड्याची एक पिलर, नारिंगी रंगाचे ग्लोव्ह, दोन स्क्रू ड्रायव्हर टापारिया कंपनीचे, एक स्क्रू ड्रायव्हर इआफिक्सी कंपनीचा, एक अ‍ॅक्सो ब्लेड, एक हातोडा, एक करवत, टेप, केबल, हायड्रॉलिक, कटर मशीन, इलेक्ट्रीक ग्रार्इंडर, पाच ग्रायंडर, ब्लेड, एक्स्टेशन कॉर्ड, एक लागडी दांडा असा घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली. 

संशयीत दि. ६ मार्च रोजी येऊन हडफडे येथे भाड्याने रहात होते. घरमालकाने त्यांचा सी फॉर्म सादर न केल्याने घरमालकाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे निरीक्षक नवलेश देसाई यांनी सांगितले. 


Web Title: Georgyan foreign gang detained in Goa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.