'Facebook' request was lost to millions! | ‘फेसबुक’ रिक्वेस्ट पडली सव्वा लाखांना!
‘फेसबुक’ रिक्वेस्ट पडली सव्वा लाखांना!

ठळक मुद्देआॅनलाइन मैत्रिणीने महागड्या भेटवस्तू देण्याच्या नावाखाली त्याला चुना लावला.साकिनाका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.तक्रारदार सनी (नावात बदल) हा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गाडीचालक म्हणून काम करतो.

मुंबई - ‘फेसबुक’वर स्वीकारलेली रिक्वेस्ट एका व्यक्तीला सव्वा लाखांना पडली. त्याच्या आॅनलाइन मैत्रिणीने महागड्या भेटवस्तू देण्याच्या नावाखाली त्याला चुना लावला. ही बाब लक्षात येताच, त्याने साकिनाका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार सनी (नावात बदल) हा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गाडीचालक म्हणून काम करतो. त्याच्या ‘फेसबुक’ खात्यावर काही दिवसांपूर्वी विकी रोझ नामक महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती लंडनची राहणारी असल्याचा उल्लेख तिच्या प्रोफाइलमध्ये होता. त्यानंतर, सनी आणि रोझमध्ये चॅटिंग सुरू झाले. ती ब्राझीलची रहिवासी असून, सध्या लंडनमध्ये राहत असल्याचे रोझने सनीला सांगितले. त्यानंतर, त्यांनी एकमेकांना स्वत:चे मोबाइल क्रमांक दिले आणि व्हॉट्सअपवरूनही त्यांच्यात गप्पा होऊ लागल्या. या दरम्यान, एका काकासोबत संपत्तीवरून न्यायालयात खटला सुरू असल्याचे रोझने सनीला सांगितले. काही दिवसांनंतर तो खटला ती जिंकली असून, त्याचे सगळे श्रेय सनीचे आहे. त्यामुळे याच्यासाठी काही भेटवस्तू पाठविण्यास ती इच्छुक असल्याचे तिने सनीला सांगितले.
रोझने तेव्हा त्याला व्हॉटसअपवरून घड्याळ, कपडे, बूट याचे काही फोटो पाठविले. दोन दिवसांनी पुन्हा फोन करत, त्या भेटवस्तूसाठी खान नामक वकिलाच्या खात्यात २५ हजार रुपये भरावे लागतील, असे रोझने सनीला सांगितले. त्याला तिचे बोलणे खरे वाटून भेटवस्तूच्या लोभापायी त्याने २५ हजार खानच्या खात्यात भरले. मात्र, त्याला भेटवस्तूचे पार्सल मिळालेच नाही. तेव्हा त्याने रोझला फोन करत याबाबत विचारणा केली. तेव्हा पार्सल विमानतळावर अडकले असून, त्या महाग वस्तू सोडविण्यासाठी १ लाख रुपये भरावे लागतील, असे त्याला सांगण्यात आले. तेव्हादेखील सनीने कोणतीच शहानिशा न करता ते पैसे सांगितलेल्या ठिकाणी जमा केले. त्यानंतरही त्याला पार्सल मिळाले नाही. त्यानंतर, सनीला एक फोन आला. फोन करणाऱ्याने पार्सलमध्ये डॉलर असल्याने त्याचा कर दोन लाख रुपये भरावा, असे सांगितले. याबाबत विचारण्यासाठी सनीने रोझला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा फोन बंद होता.


Web Title: 'Facebook' request was lost to millions!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.