पोलिसांच्या दहशतीमुळे मुंबईबाहेर हलविला अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 07:34 AM2019-02-03T07:34:16+5:302019-02-03T07:34:47+5:30

नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करणाऱ्या रवी पुजारीने मुंबई बॉम्बस्फोटाच्या मालिकेनंतर सुरुवातीला त्याच्यापासून व नंतर छोटा राजनपासून विभक्त होत स्वत:ची टोळी बनविली.

Due to the police intimidation, the mob had moved out of the city | पोलिसांच्या दहशतीमुळे मुंबईबाहेर हलविला अड्डा

पोलिसांच्या दहशतीमुळे मुंबईबाहेर हलविला अड्डा

Next

- जमीर काझी
मुंबई - नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करणाऱ्या रवी पुजारीने मुंबई बॉम्बस्फोटाच्या मालिकेनंतर सुरुवातीला त्याच्यापासून व नंतर छोटा राजनपासून विभक्त होत स्वत:ची टोळी बनविली. बिल्डर व प्रामुख्याने बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्यावर या टोळीने भर दिला आहे. थेट स्वत:हून फोन आणि मेसेज करून समोरच्याला तो रकमेचा आकडा सांगतो, त्यामुळे फिल्मी वर्तुळात त्याची अद्यापही दहशत कायम असल्याचे सांगितले जाते.

मुंबई पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत पुजारीच्या अनेक हस्तकांना अटक केली आहे. त्यामुळे या टोळीने आपला अड्डा मुंबईबाहेर हलविला. गेल्या आठवड्यात मंगळूरमधून आकाश शेट्टी व १५ जानेवारीला विल्यम रॉड्रिक्सला पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीतून पुजारीबद्दलच्या अनेक बाबी उघडकीस येत आहेत.

पुजारी हा मूळचा मंगळूरमधील पडब्रिदी येथील आहे. त्याला हिंदी, कन्नड या भाषांबरोबरच अस्खलित इंग्रजी बोलता येते. त्यामुळेच छोटा राजनने त्याला सर्वात विश्वासू साथीदार बनविले होते. त्याच्याकडून गुन्ह्याचे धडे घेतल्यानंतर खंडणीवरून वाद झाल्याने ते २००१च्या सुमारास विभक्त झाले. मात्र राजनप्रमाणेच तो कर्मठ असून धर्मनिरपेक्षतावादी, अल्पसंख्याकांसाठी कार्यरत असलेल्यांना ‘टार्गेट’ केले होते. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट यांना त्याने याच कारणासाठी धमकाविल्याचे सांगण्यात येते. २००९ ते २०१४ या पाच वर्षांच्या काळात त्याच्या टोळीने बॉलीवूडमधील अनेक मंडळींकडून कोट्यवधींची खंडणी वसुली केल्याचे सांगण्यात येते. भारतातून पलायन केल्यानंतर तो बरीच वर्षे आॅस्ट्रेलियात वास्तव्यास होता. दाऊद इब्राहिमच्या टोळीपासून धोका असल्याने तो आखाती देशात जात नसे.

...त्यानंतर आला प्रकाशझोतात
रवी पुजारी याला लहानपणी गैरकृत्याबद्दल शाळेतून काढण्यात आले होते. तो हिंदी व इंग्रजी अतिशय उत्तम बोलतो. त्याच्या गुन्ह्याची सुरुवात अंधेरीतील एकाच्या हत्येच्या प्रयत्नातून झाली. मात्र बाळ झाल्टे याच्या हत्येनंतर तो अंडरवर्ल्डमध्ये प्रकाशझोतात आला. त्यानंतर तो छोटा राजनच्या टोळीत सहभागी झाला आणि त्याचा विश्वासू हस्तक बनला. १९९० मध्ये कुकरेजा बिल्डरच्या कार्यालयात त्याने ओम प्रकाश कुकरेजा यांची हत्या केली होती. त्यानंतर १९९८ मध्ये नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुरेश वाधवा यांच्यावर गोळीबार केला होता.

बॉलीवूड अभिनेत्यांना धमक्या

रवी पुजारी व त्याच्या टोळीकडून अभिनेता सलमान खान, अक्षयकुमार, करण जोहर आणि राकेश रोशन यांना धमकाविण्यात आले होते. करिश्मा कपूरचा पूर्वपती संजीव कपूर याच्याकडे ५० कोटींची मागणी केली होती. त्याचा हस्तक दुसºयांदा ई-मेल पाठविण्यासाठी सायबर कॅफेमध्ये गेला असता पोलिसांनी त्याला अटक केली. वकील व राष्टÑवादीचे राज्यसभेतील खासदार मजिद मेनन यांनाही त्याने मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. शाहरूख खानच्या ‘हॅप्पी न्यू ईअर’ या चित्रपटाचे परदेशातील वितरणाचे हक्क देण्यासाठी धमकाविले होते. त्याचबरोबर, त्याचा व्यवसायिक भागीदार करीम मोरनीशी संबंध न ठेवण्याची धमकी किंग खानला दिली होती.

Web Title: Due to the police intimidation, the mob had moved out of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.