अभियंत्यावर प्राणघातक हल्ला, डोंबिवली स्कायवॉकवरची घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 04:39 AM2019-03-23T04:39:32+5:302019-03-23T04:39:45+5:30

केडीएमसीच्या डोंबिवली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास चार सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला चढवला.

A deadly attack on the engineer, the incident at Dombivli Skywalk | अभियंत्यावर प्राणघातक हल्ला, डोंबिवली स्कायवॉकवरची घटना

अभियंत्यावर प्राणघातक हल्ला, डोंबिवली स्कायवॉकवरची घटना

Next

कल्याण -  केडीएमसीच्या डोंबिवली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास चार सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मानपाडा रोडवरील खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डोंबिवली महापालिका विभागीय कार्यालयाच्या बाजूकडील स्कायवॉकवर भरवस्तीत हा हल्ला झाल्याने स्थानिक रामनगर पोलिसांच्या अब्रूची लक्त रे वेशीवर टांगली गेली आहेत. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.
पाटील हे गेली तीन वर्षांपासून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून डोंबिवलीत कार्यरत आहेत. रस्त्यांच्या कामांबरोबरच गटार, पायवाटांची बांधणी या विभागात काम करणारे पाटील हे मितभाषी आणि शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. ठाण्यात वास्तव्याला असलेले पाटील हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी कार्यालयातून घरी जात असताना, हा प्राणघातक हल्ला झाला. ते महापालिकेच्या विभागीय कार्यालयातून निघून स्कायवॉकने डोंबिवली स्थानकाकडे जात होते. त्यावेळी पाटकर रोडवरील स्कायवॉकवर दबा धरून बसलेले आणि तोंडावर मास्क लावलेले चौघेजण त्यांच्या दिशेने आले. त्यांनी त्यांच्याजवळील तीक्ष्ण हत्याराने पाटील यांच्या पोटावर, छातीवर, मानेवर आणि पाठीवर पाच ते सहा सपासप वार केले. त्यानंतर, हल्लेखोर लगेच पसार झाले. जखमी अवस्थेतील पाटील यांनी तत्काळ आपल्या मोबाइलने उपअभियंता प्रशांत भुजबळ यांना हल्ल्याची माहिती दिली. भुजबळ यांनीही प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेत अन्य एका सहकाऱ्याच्या मदतीने पाटील यांना रुग्णालयात दाखल केले. ही घटना वाऱ्यासारखी पसरून महापालिका अधिकाऱ्यांसह नगरसेवक, कर्मचारीवर्ग आणि पोलीस यंत्रणेने रुग्णालयात धाव घेतली. महापौर विनीता राणे यांच्यासह नगरसेवक विश्वनाथ राणे, मनसेचे गटनेते मंदार हळबे, निलेश म्हात्रे, राजन सामंत, संदीप पुराणिक, राजन मराठे, मनोज घरत आदींसह अन्य लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात जाऊन पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांच्या
तोंडचे पाणी पळाले
निवडणूक आणि शिव जयंतीच्या पूर्वसंध्येला दिवसाढवळ्या गजबजलेल्या ठिकाणी हा हल्ला झाल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे. घटनेपासून हाकेच्या अंतरावर रामनगर पोलीस ठाणे असूनही ही घटना घडल्याने खाकी वर्दीचा धाक राहिला नसल्याबाबत महापालिका कर्मचाºयांकडून संताप व्यक्त झाला. यासंदर्भात कार्यकारी अभियंता दीपक भोसले यांनी हल्ल्याचा निषेध करत सखोल चौकशीची मागणी केली.

पोलिसांचे मौन
रुग्णालयात आलेले सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी हल्ल्यासंदर्भात मौन धारण केले होते. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पवार यांच्यासमवेत ज्याठिकाणी हल्ला झाला, त्या परिसराची पाहणी केली. हल्लेखोर कोठून आले व कोणत्या दिशेने पसार झाले, याबाबतची माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेज मिळतात का, याचीही चाचपणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयुक्त आणि महापौरांकडून विचारपूस : महापौर विनीता राणे यांनी रुग्णालयात जाऊन पाटील यांची विचारपूस केली. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. आयुक्त गोविंद बोडके यांनीही पोलीस यंत्रणा तपास क रत असून हल्लेखोरांना तत्काळ अटक व्हावी, असे लोकमतशी बोलताना सांगितले.

पाटील शांत स्वभावाचे असल्याने हा हल्ला पाटील यांच्यावरच करायचा होता की, अन्य कोणा अधिकाºयावर करायचा होता, यासंदर्भात पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Web Title: A deadly attack on the engineer, the incident at Dombivli Skywalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.