व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करणे बेतले जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 07:49 PM2019-04-12T19:49:37+5:302019-04-12T19:50:49+5:30

पतीने केली पत्नीची हत्या : अंधेरीतील घटना

 Chatting on WhatsAppApple | व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करणे बेतले जीवावर

व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करणे बेतले जीवावर

Next
ठळक मुद्देअंधेरी पूर्वच्या कामगार रुग्णालय वसाहतीत चौगुले हा आई, वडील व त्याची पत्नी आरती (२२) यांच्यासोबत राहत होता.त्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

मुंबई - पत्नी सतत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत असल्याच्या रागात पतीने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीत उघडकीस आला. पती चेतन चौगुले (३३) याला या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनीअटक केली.
अंधेरी पूर्वच्या कामगार रुग्णालय वसाहतीत चौगुले हा आई, वडील व त्याची पत्नी आरती (२२) यांच्यासोबत राहत होता. तीन वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आहे. चौगुले गेले अनेक महिने बेरोजगार होता. आर्थिक कारणावरून तसेच आरती सतत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडण होत असे. या भांडणाला कंटाळून त्याची आई काही दिवसांपूर्वी नातेवाइकांकडे निघून गेली होती.
बुधवारी आरतीने त्याच्याकडे खर्चासाठी पैसे मागितले. त्याने ते देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्या रात्री चौगुलेचे वडील बाहेर झोपले तर बाळासह हे जोडपे आतल्या खोलीत झोपले. चौगुलेला रात्री जाग आली. तेव्हा एवढ्या रात्रीही आरती मोबाइलवर काहीतरी करीत असल्याचे त्याने पाहिले. ती व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग करीत असल्याच्या रागातून त्याने जवळच पडलेल्या नायलॉन दोरीने तिचा गळा आवळला.
राग शांत झाल्यावर त्याने तिला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच प्रयत्न करूनही ती उठली नाही. तेव्हा त्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरतीला रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चौगुलेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी सांगितले.

Web Title:  Chatting on WhatsAppApple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.