cbi arrested two GST superintendents in case of Accepting the bribe | लाच स्वीकारताना दोन जीएसटी अधिक्षक सीबीआयच्या जाळ्यात 
लाच स्वीकारताना दोन जीएसटी अधिक्षक सीबीआयच्या जाळ्यात 

पुणे : सेवा कर कमी करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाच्या पुणे कार्यालयातील दोन अधिक्षकांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने रंगेहाथ पकडले. यानंतर घराच्या झडतीत एका अधिक्षकाच्या घरात तब्बल २० लाख रुपयांची रोकड सापडली. दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. 
विवेक देकाते (वय ४६) आणि संजीव कुमार (वय ३६) अशी अटक करण्यात अधिक्षकांची नावे आहेत. त्यांच्यावर संगनमताने लाचखोरी करणे व कट रचण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. खोपोली ते खालापूर येथील एका हॉटेलचा २०१६-१७ मधील सेवा कर कमी करून देण्यासाठी दोघा अधिक्षकांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत हॉटेल व्यावसायिकाने सीबीआयकडे तक्रार केली. तक्रारदार व अधिक्षकांची भेट झाल्यानंतर तिथे त्यांनी पाच लाखाची मागणी करून तीन लाख देण्यास सांगितल्याच्या ध्वनीफितीद्वारे लाच मागितल्याची खात्री केली. त्यानंतर सापळा रचला. ठरलेल्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये संजीव कुमार यांनी स्वीकारला. यावेळी विवेक देकाते हेही तिथे हजर होते. दोघांनाही लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यानंतर सीबीआय पथकाने त्यांची कार्यालये व घराची झडती घेतली. त्यामध्ये एका अधिक्षकाच्या घरात २० लाख रुपयांची रोकड आढळून आली. त्यांच्याकडून काही कागदपत्रे, अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, दोघांनाही सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी त्यांना तीन दिवस सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अ‍ॅड. सुधीर शहा यांनी न्यायालयात अधिक्षकांची बाजू मांडत कोठडी न देण्याची मागणी केली. सीबीआयचे वकील मनोज चलादान यांनी दोघांची पोलिस कोठडीची मागणी केली.  


Web Title: cbi arrested two GST superintendents in case of Accepting the bribe
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.