नगरसेवकाच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 08:44 PM2019-06-20T20:44:27+5:302019-06-20T21:06:04+5:30

जमीन मालक मयत असताना त्यांच्या नावे विक्री करारनामा नोंदणी प्रकरण

A case has been registered against the brother of the corporator | नगरसेवकाच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

नगरसेवकाच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देउत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोतया व्यक्ती उभ्या करुन विक्री करारनाम्याची दुय्यम निबंधक कार्यालया नोंदणी करण्यात आली आहे.

मीरारोड - जमीन मालकांचे निधण झाले असताना त्यांच्या जागी तोतया व्यक्ती उभ्या करुन विक्री करारनाम्याची दुय्यम निबंधक कार्यालया नोंदणी करण्यात आली आहे. सदर जमीन खरेदी करणारा नगरसेवकाचा भाऊ अमिर गफार शेख रा. केजीएन हाऊस, उत्तन याच्यासह नोंदणीकृत करारनाम्या आधारे सातबारा नोंदी फेरफार करणारे तत्कालिन तलाठी व दोन तोतया व्यक्तीं विरोधात उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदरच्या उत्तन येथील सर्व्हे क्र. २३७ हिस्सा क्र. १७ ह्या सुमारे १० गुंठे जमीनीचे मुळ मालक अब्दुल करीम शेख होते. त्यांचे २१ एप्रिल २००१ रोजी तर त्यांची पत्नी खतीजा यांचे ६ जुन १९९७ रोजी निधन झाले आहे. त्यांना ८ मुलं - मुली वारस असुन त्यातील दोन वारसांचे निधन झाले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्या जिवंत वारसदारांनी सदर जमीनीच्या विकास आणि विक्रीचे अधिकार नोटरीद्वारे एहसान गफार राजपुत (४४) रा. गोविंद नगर, मीरारोड यांना दिले.

परंतु सदर जमीनीवर नगरसेवक अमजदचा भाऊ अमिर गफार शेख हा आपला हक्क सांगत होता. सात बारा नोंदी सुध्दा अमिरचे नाव लागले होते. एहसान यांनी तलाठी कार्यालयात याची चौकशी केली असता खरेदीखत, नोंदणीकृत करारनामा आदी कागदपत्रं मिळाली. त्यामध्ये अब्दुल शेख व हनिफ माजिद यांच्या कडुन २४ फेब्रुवारी २००९ रोजी अमिरने सदर जमीन दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ७ मध्ये रीतसर नोंदणी करुन खरेदी केल्याचे कागदपत्र आढळुन आले.

वास्तविक अब्दुल हे एयरइंडिया मध्ये नोकरी करत होते व २१ एप्रिल २००१ रोजी त्यांचे निधन झाले असताना व तसा मृत्युच दाखला असताना त्यांच्या व हनिफ माजिदच्या नावे दोन खोट्या व्यक्ती उभ्या करुन निबंधक कार्यालयात करारनामा नोंदणी केल्या बद्दल एहसान यांनी २३ फेब्रुवारी रोजी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्या करारनाम्याच्या आधारे तत्कालिन तलाठी गणेश भुताळे यांनी जमीनीचे फेरफार करुन ७/१२ नोंदी अमिर याचे नाव घेतले. फेरफार करताना भुताळे यांनी सुचना नोटीसवर करारनाम्यातील त्याच दोन बोगस व्यक्तींच्या सह्या आणि अंगठे घेतले. या प्रकरणी पोलीसांनी अमिर सह भुताळे व अन्य दोन बोगस व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमीन खरेदी - विक्री व्यव्हाराचा नोंदणीकृत करारनामा सादर केला गेला होता. त्या आधारेच मालकी हक्क ठरल्याने फेरफार करण्यात आला होता. करारनामा नोंदणीकृत असल्याने आपण फेरफार केला. यात आपला काही संबंध नसुन पोलीसांनी सखोल चौकशी करुन न्याय्य निर्णय घ्यावा असे भुताळे म्हणाले.

Web Title: A case has been registered against the brother of the corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.