ब्रिटीश महिला बलात्कार प्रकरण : तीन दिवसांच्या पाळतीनंतर आरोपी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:37 PM2019-07-16T16:37:57+5:302019-07-16T16:39:06+5:30

सहा महिन्यापूर्वी पाळोळे-काणकोण येथे एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार करुन तिला लुटण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या व नंतर मडगाव न्यायालयातून फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

British woman rape case: one arrested from Bengaluru | ब्रिटीश महिला बलात्कार प्रकरण : तीन दिवसांच्या पाळतीनंतर आरोपी जाळ्यात

ब्रिटीश महिला बलात्कार प्रकरण : तीन दिवसांच्या पाळतीनंतर आरोपी जाळ्यात

Next

 - सुशांत कुंकळयेकर

मडगाव - सहा महिन्यापूर्वी पाळोळे-काणकोण येथे एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार करुन तिला लुटण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या व नंतर मडगाव न्यायालयातून फरार झालेल्या यल्लप्पा रामचंद्रनप्पा या आरोपीला मडगाव पोलिसांनी बंगळुरू शहरापासून 30 कि.मी. अंतरावर असलेल्या जिगानी या परिसरात सोमवारी रात्री मोठय़ा शिताफीने अटक केली. गोव्यातून पळून गेल्यावर मूळ तमिळनाडूच्या या आरोपीने बंगळुरुला आसरा घेतला होता व तिथे तो ट्रॅक्टर चालविण्याचे काम करीत होता, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.

सोमवारी रात्री तो जिगानी या भागात येणार याची माहिती मिळाल्यानंतर मडगावचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी पनरगट्टा (कर्नाटक) पोलिसांच्या सहाय्याने त्याचा पाठलाग केला. सदर आरोपी अ‍ॅक्टीव्हा स्कुटरने येत असल्याचे पाहिल्यावर गोवा पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. आपल्याला पकडणार हे ठाऊक झाल्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडत त्याला शिताफीने अटक केली.

मागच्या वर्षी 20 डिसेंबरला या आरोपीने काणकोण रेल्वे स्थानकावरून पाळोळेला जात असलेल्या एका ब्रिटीश महिलेवर पहाटेच्यावेळी बलात्कार करुन तिला लुटले होते. मात्र त्यावेळी त्याचे छायाचित्र जवळच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले गेले होते. हा बलात्कार करुन तो ट्रेनने मडगावला येऊन उतरला असता, त्याने अंगावर घातलेले जॅकेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील छायाचित्रच्या आरोपीप्रमाणे असल्याने मडगाव रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हय़ाची कबुली दिली होती. गोव्यातील वास्तव्यात त्याने पेडणे व वास्को येथेही झालेल्या दोन चोऱ्यात त्याचा हात असल्याचे उघडकीस आले होते. 29 जून रोजी त्याला मडगावच्या न्यायालयात सुनावणीसाठी आणले असता आपल्याला शौचाला जायला पाहिजे असे सांगून तो शौचालयात गेला. त्यानंतर त्याने आतून कडी घालून नंतर शौचालयाच्या व्हेंटिलेटरचे गज वाकवून तो पळून गेला होता.

अधीक्षक गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, यापुर्वी गोवा पोलीस त्याच्या कृष्णगिरी तामिळनाडू येथील घरात चौकशीसाठी गेले होते. त्यामुळे त्याचे घर पोलिसांना माहित होते. आरोपीचे घर बंगळूरुपासून 8 कि.मी. अंतरावर असून, गोव्यातून पळुन गेल्यानंतर तो आपल्या घरी न जाता त्याने बंगळूरुला आश्रय घेतला होता. मात्र तरी गोवा पोलिसांनी त्याच्या बायकोवर स्थानिक खबऱ्यामार्फत नजर ठेवली होती. यातूनच त्याची बायको आपल्या नवऱ्याला भेटायला बंगळुरुला जाते ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बंगळूरुला आपला मुक्काम हलविला होता. बंगळुरुला तो कोणत्या भागात रहातो याची माहिती मिळाल्यानंतर मागचे तीन दिवस मडगाव पोलीस बंगळुरुला ठाण मांडून होते. सोमवारी रात्री तो जिगानी या परिसरात येणार याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे साफळा लावून ठेवला त्यात आरोपी अडकला अशी माहिती गावस यांनी दिली.

मडगाव पोलिसांनी केलेली ही कामगिरी धाडसी स्वरुपाची होती,अशी प्रतिक्रिया गावस यांनी व्यक्त करताना या पथकाची बक्षिसासाठी शिफारस केली जाईल असेही त्यांनी सांगितले.




 

Web Title: British woman rape case: one arrested from Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.