चोरीच्या गाड्या डिलिव्हरी करणाऱ्या सराईताला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 04:32 PM2018-07-18T16:32:13+5:302018-07-18T16:33:47+5:30

गाड्या चोरणारा मुख्य आरोपी वसीमच्या मागावर पोलीस 

The arrest of a man who delivers stolen vehicles | चोरीच्या गाड्या डिलिव्हरी करणाऱ्या सराईताला अटक 

चोरीच्या गाड्या डिलिव्हरी करणाऱ्या सराईताला अटक 

मुंबई - चोरलेल्या गाड्यांची डिलेव्हरी करणाऱ्या सराईत आरोपीला बेड्या ठोकण्यास मालमत्ता कक्षास यश आले आहे. या सराईत आरोपीचे नाव हजरतअली फकरुद्दीन खान (वय - ३२ ) हे आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच गाड्या जप्त करण्यात आल्या. त्यात डिझायर, वॅगनआर, शेवर्लेट इंजॉय, महिंद्र पिकअप टेम्पो, सॅण्ट्रो या गाड्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी गाडीचोरीच्या गुह्यात शिक्षा भोगून खान बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा चोरीच्या गाड्यांच्या डिलेव्हरीचे काम सुरू केले होते.

चोरलेल्या चारचाकी गाड्यांची बॉस सांगेल त्या ठिकाणी जाऊन डिलेव्हरी देणाऱ्या सराईत आरोपीला मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच चारचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गाड्या चोरणारा एक सराईत आरोपी कुर्ला पश्चिमेकडे वास्तव्यास असून त्याच्याकडे चोरीच्या गाड्या असल्याची खबर पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांना मिळाली. त्यानंतर हजरतअली फकरुद्दीन खान (३२) याला पकडले. दादर पोलीस ठाण्याच्या परिसरात उभा असलेला टेम्पो गेल्या आठवड्यातच खानने लंपास केला होता.

गाड्या चोरून आरोपी हजरतअलीचा बॉस वसीम हा हजरतअलीला त्या गाड्या मोठी शक्कल लढवत डिलेव्हरी करायला सांगायचा. त्यामुळे कोणाला गाड्या विकायच्या आहेत हे वसीम त्याला सांगत नव्हता. फक्त एखाद्या ठिकाणी जाऊन गाडी उभी कर आणि चाकावर चावी ठेवून निघून जा ऐवढे काम हजरतअलीला वासिमकडून सांगण्यात यायचे. जर हजरतअली पकडला गेलाच तर कोणाला गाडी विकली हे गुलदस्त्यातच राहील आणि त्या संबंधितावर कारवाई होणार नाही अशी सावधगिरी फरार आरोपी वसीम घेत होता. आता वसीमचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

वसीम हा मुख्य गाडीचोर आहे. तो शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मागणीनुसार गाड्या चोरतो. मग त्या गाड्या हजरतअली कुर्ला येथील म्हाडा इमारती परिसरात आणून पार्क करतो. त्यानंतर वसीम सांगेल त्या ठिकाणी चोरीच्या गाड्या नेऊन पोहचविण्याचे काम हजरतअली करीत होता. या कामासाठी त्याला पाच ते दहा हजार मिळायचे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या सूचनेनुसार कोळी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने, पुराणिक, उपनिरीक्षक अमित भोसले व दत्तात्रय कोळी, बाळासाहेब बाणगे, अशोक सावंत, किरण जगताप, किरण जगदाळे, शरद मुकुंदे, पंडीत या पथकाने कुर्ला येथील सीएसटी रोड परिसरात सापळा रचून खानला अटक केली. 

Web Title: The arrest of a man who delivers stolen vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.