बोगस कॉल सेंटरप्रकरणी फरार अभिनेत्री जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 05:05 PM2019-03-26T17:05:09+5:302019-03-26T17:06:05+5:30

या फसवणुकीत संबधित कंपनीत तिने ही स्वत:चे पैसे गुंतवल्याचं तपासात निष्पन्न झालं होते.

The absconding actress of Bogus Call Center arrested | बोगस कॉल सेंटरप्रकरणी फरार अभिनेत्री जेरबंद 

बोगस कॉल सेंटरप्रकरणी फरार अभिनेत्री जेरबंद 

googlenewsNext
ठळक मुद्देआरती सक्सेना असं या अटक अभिनेत्रीचं नाव असून ती बाॅलीवूडमधील मॉडेल, गायिका आणि अभिनेत्री आहे. या फसवणुकीत संबधित कंपनीत तिने ही स्वत:चे पैसे गुंतवल्याचं तपासात निष्पन्न झालं होते.तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी तिला न्यायालय परिसरातून अटक केली.

मुंबई - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ९ च्या पोलिसांनी सप्टेंबर २०१८ मध्ये अंधेरीत सुरू असलेल्या बनावट काॅलसेंटरवर कारवाई केली होती. या कारवाईतील फरार तरुणीस गुन्हेे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. आरती सक्सेना असं या अटक अभिनेत्रीचं नाव असून ती बाॅलीवूडमधील मॉडेल, गायिका आणि अभिनेत्री आहे. या फसवणुकीत संबधित कंपनीत तिने ही स्वत:चे पैसे गुंतवल्याचं तपासात निष्पन्न झालं होते.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना सप्टेंबर २०१८ मध्ये अंधेरीच्या डी.एन.नगर परिसरातील एस.व्ही.रोडवरील एका इमारतीत एक बोगस काॅल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या काॅल सेंटरवर कारवाई केली. एक्सफिनिटी आणि इनोव्हेशन ३६० अशी या दोन काॅल सेंटरची नावे आहेत. या दोन्ही कंपनीद्वारे अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून संबंधित संगणक आणि लॅपटाॅपवर मालवेअरसारख्या भयानक सायबर हल्ला केल्याचं सांगत तो काढण्यासाठी पैसे मागायचे. तसेच पैसे न पाठवल्यास डेटा डिलिट करण्याची धमकी द्यायचे. 

या कंपनीद्वारे शेकडो अमेरिकन नागरिकांना फसवण्यात आलं होतं. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यावेळी ९ जणांना अटक केली होती. या काॅल सेंटरमध्ये त्यावेळी ३६ जण कामाला होते. या काॅल सेंटरमधून दिवसाला अमेरिकेत शेकडो फोन करण्यात येत होते. आतापर्यंत लाखो जणांचा डेटा पोलिसांनी या काॅलसेंटरमधून हस्तगत केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीत अभिनेत्री आरती सक्सेना हिच्यासह ४ जणांनी पैसे गुंतवल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलीस आरतीचा शोध घेत होते. मात्र, आरतीने अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळवल्याने पोलिसांना तिला अटक करता येत नव्हती. या अटकपूर्व जमिनीची मुदत सोमवारी २५ मार्च रोजी संपली. दरम्यान, जामीन वाढवून हवा असल्याचं कारण देत आरतीनं न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी तिला न्यायालय परिसरातून अटक केली. 

या प्रकरणी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी संबंधितांविरोधात ३ हजार ६०० पानी दोषारोपपत्रही दाखल केले. त्यात अमेरिकेतील नागरिकांनी ट्विटरद्वारे केलेल्या १७ तक्रारी आणि ३० जणांच्या जबाबाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आरतीला आता न्यायालयाने २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: The absconding actress of Bogus Call Center arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.