चिडे हत्या प्रकरणात १३ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 05:11 AM2018-11-09T05:11:27+5:302018-11-09T05:11:49+5:30

मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दारू माफियाच्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना चिरडून ठार केले. या हत्या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले असून पाच जणांना अटक केली आहे.

13 accused in cheating case | चिडे हत्या प्रकरणात १३ जणांवर गुन्हे दाखल

चिडे हत्या प्रकरणात १३ जणांवर गुन्हे दाखल

Next

ब्रह्मपुरी (चंद्रपूर)  - मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दारू माफियाच्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना चिरडून ठार केले. या हत्या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले असून पाच जणांना अटक केली आहे.
मौशी रस्त्याने पवनी - तोरगाव मार्गे दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ठाणा प्रभारी चिडे यांना मिळताच ते पीएसआय ए.एस. मलकापूरे , संदीप कोवे आणि पितांबर खरकाटे, रामकृष्ण बोधे यांना सोबत घेऊन मौशीकडे निघाले. यादरम्यान दारूची वाहतूक करणारी गाडी थांबली. त्यामुळे पोलीस गाडीतून खाली उतरले. तेवढयात दारू माफियांनी गाडी रिव्हर्स घेऊन छत्रपती चिडे यांना चिरडले.
याप्रकरणी पोलिसांनी १३ जणांविरुध्द अपराध क्र. व कलम ४३९/१८ कलम ३०२, ३०६, ३४३, ३३२, ३३३, १२०, सह कलम ६५ अ ८२, ८३ मदाका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून काही रडारवर आहेत. पुढील तपास ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी करीत आहेत.

१० लाखांचे अर्थसहाय्य
दिवंगत पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रूपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी चिडे कुटुंबीयांना १० लाख रूपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय जाहीर केला. लवकरच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार छत्रपती चिडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अर्थसहाय्याचा धनादेश प्रदान करतील.

नाकाबंदीदरम्यान पोलीस बाळगणार शस्त्र
चंद्रपूर जिल्ह्यात नाकाबंदीदरम्यान पोलीस शस्त्र बाळगणार असून त्यांच्यावर जर कुणी प्राणघातक हल्ला चढवत असेल तर त्या शस्त्राचा वापर करून ते स्वसंरक्षण करू शकतात, असे निर्देश चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी यंत्रणेला दिले. नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांच्या अंत्यसंस्कारासमयी ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त निर्देशाची माहिती दिली. गुंंडांशी आता कठोरपणे वागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले, चंद्रपूर जिल्हा शांत जिल्हा असल्याने नाकाबंदीच्या वेळी पोलीस शस्त्र सोबत बाळगत नव्हते. आता आम्ही निर्देश दिले आहेत की पोलिसांनी शस्त्र सोबत बाळगावे. जर कुणी अंगावर गाडी घालत असेल आणि त्यात जीव जाणार असेल तर स्वसंरक्षणार्थ गाडी चालवणा-यावर गोळ्या झाडण्याचे निर्देश दिले आहेत.

चिडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दारु तस्करांच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना बुधवारी पोलीस मुख्यालयात शोकाकूल वातावरणात मानवंदना देण्यात आली. यावेळी बंदुकीतून तीन फैरी झाडण्यात आल्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि पोलीस दलातील वरिष्ठांनी चिडे यांना पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

या गुन्ह्याचा तपास युध्दपातळीवर सुरू आहे. लवकरच सर्व आरोपींना ताब्यात घेतले जाईल. पकडलेल्या पाच आरोपींकडून अधिक माहिती घेतली जात आहे.
-प्रशांत परदेशी,
उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी.

Web Title: 13 accused in cheating case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.