10-year jail term awarded to acccuse in Kharghar baby sitting case | खारघर पाळणाघरामध्ये चिमुकलीला मारहाण करणाऱ्या दोषी आयाला १० वर्षांची कारावास
खारघर पाळणाघरामध्ये चिमुकलीला मारहाण करणाऱ्या दोषी आयाला १० वर्षांची कारावास

ठळक मुद्देपूर्वा प्ले स्कूलची आया अफसाना नासीर शेखने नर्सरीतील रितीशा नावाच्या दहा महिन्याच्या चिमुकलीला अमानुषपणे मारहाण केली होती. रितीशा झोपत नाही म्हणून राग आल्याने अफसानाने रितीशाला निर्दयी आणि अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. दोन आरोपी प्रविण निकम आणि प्रियांका निकम यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

नवी मुंबई - खारघर येथील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात चिमुकलीला बेदम मारहाणप्रकरणी मुख्य आरोपी अफसाना नासीर शेखला न्यायालयाने दहा वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर इतर दोन आरोपी प्रविण निकम आणि प्रियांका निकम यांची निर्दोष मुक्तता केली आहे. नोव्हेंबर 2016 मधील हे निर्दयी आणि अमानुष प्रकरण आहे.

पूर्वा प्ले स्कूलची आया अफसाना नासीर शेखने नर्सरीतील रितीशा नावाच्या दहा महिन्याच्या चिमुकलीला अमानुषपणे मारहाण केली होती. याप्रकरणी भा. दं. वि.कलम 307 आणि 325 अंतर्गत आरोपी अफसानाला अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अलिबाग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अ. सो. वाघवसे यांनी हा निकाल दिला.

खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी रितीशाया या दहा महिन्याच्या चिमुकलीला तिच्या पालकांनी प्ले स्कूलमध्ये ठेवलं होतं. तेथे अफसाना नासीर शेख आया म्हणून कामाला होती. रितीशा झोपत नाही म्हणून राग आल्याने अफसानाने रितीशाला निर्दयी आणि अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून आणि गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नही अफसानाने केला. या मारहाणीत रितीशाच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. याप्रकरणी रितीशाच्या पालकांनी प्ले स्कूल चालक प्रविण निकम, प्रियांका निकम, आया अफसाना नासीर शेखविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. रितीशाला तिच्या पालकांनी पाळणाघरात सुरक्षित सांभाळ करण्यासाठी ठेवलं होतं. मात्र, प्रविण निकम आणि प्रियांका निकम यांनी निष्काळजीपणे आया अफसानाच्या हाती आपल्या मुलीला दिल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. प्रविण निकम आणि प्रियांका निकम यांनी आज निर्दोष मुक्तता झाली आहे.


Web Title: 10-year jail term awarded to acccuse in Kharghar baby sitting case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.