तिरुअनंतरपुरम- भारताने तिरुअनंतरपुरम येथे निर्णायक टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1ने खिशात टाकली. पण या मालिकेतील राजकोट येथे झालेल्या दुस-या ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यात महेंद्रसिंग धोनी त्याच्या लौकिकाला साजेशी मॅचफिनिशरची भूमिका बजावू शकला नाही. त्यावरून धोनीला पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटूंनी लक्ष्य केलं. धोनीने आता टी-20 तून निवृत्ती घ्यावी आणि युवा खेळाडूंना संधी द्यावी अशी मागणीही अनेक माजी खेळाडूंनी केली. काही माजी खेळाडू धोनीच्या समर्थनार्थ तर काहीजणांनी त्याने आता निवृत्ती घ्यावी असे मत मांडले.

काय म्हणाला विराट कोहली- 
काल मालिका विजय मिळवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने  पत्रकार परिषदेत घेतली.  या पत्रकार परिषदेतधोनीच्या संघातील समावेशाबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न विचारणा-याला कोहलीने चांगलंच सुनावलं. पहिली गोष्ट म्हणजे तर लोकं धोनीवरच का टीका करतायेत हेच मला कळत नाही असं कोहली म्हणाला. मी जर का 3 सामन्यांमध्ये धावा काढण्यात अपयशी ठरलो तर माझ्यावर कोणी प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण मी 35 वर्षांचा नाहीये. मात्र त्याच्यासोबतच असं का? तो मुलगा(धोनी)  फिट आहे, प्रत्येक फिटनेस टेस्ट तो पास होतोय. शक्य असेल त्या सर्व पद्धतीने तो संघाची मदत करतो, त्याच्या बॅटिंगनेही आणि यष्टिरक्षणानेही. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत त्याने चांगलं प्रदर्शन केलंय या मालिकेत त्याला फलंदाजीसाठी जास्त वेळ मिळाला नाही. 'राजकोटच्या सामन्यातील पराभवाबद्दल धोनीला दोष देणं अत्यंत चुकीचं आहे. धोनी ज्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, तिथं येऊन धावा जमवणं सोप्पं नसतं. या मालिकेत हार्दिक पंड्यालाही फारशी चमक दाखवता आलेली नाही. तरीही फक्त धोनीवर टीका होतेय. चार फलंदाज बाद झाले असताना आणि नव्या चेंडूवर गोलंदाजी सुरू असताना फलंदाजावर मोठा दबाव असतो, हे समजून घ्यायला हवं. राजकोटमध्ये जर हार्दिक पंड्या फलंदाजीला आला असता तर तोही धावा करु शकला नसता. कारण तिथली परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे धोनीवर टीका करण्याचा अधिकार कुणाला नाहीये अशा स्पष्ट शब्दात विराटने सुनावलं.