Virat Kohli hits century! | कोहलीचे विराट दीडशतक! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 304 धावांचे आव्हान

केप टाऊन - भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज खेळीचा नजराणा क्रिकेटप्रेमींना आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला निमंत्रित केल्यावर विराट कोहलीने केलेल्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 304  धावांचे आव्हान दिले. 
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराटने शिखर धवनच्या साथीने भारताचा डाव सावरला. त्याने धवनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली. विराटप्रमाणेच शिखर धवननेही आक्रमक फलंदाजी केली. मात्र तो 76 धावांवर बाद झाला. 
शिखर धवन बाद झाल्यावर भारताच्या इतर फलंदाजांना खेळपट्टीवर फार काळ तग धरता आला नाही. अजिंक्य रहाणे (11), हार्दिक पांड्या (14), महेंद्र सिंग धोनी (10) आणि केदार जाधव (1) हे झटपट बाद झाले. मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या विराटने छोट्या पण उपयुक्त भागीदाऱ्या रचत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. दरम्यान विराटने या मालिकेतील दुसरे आणि वनडे कारकिर्दीतील 34 वे शतक पूर्ण केले.
119 चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर विराटने अधिक आक्रमक पवित्रा घेतला. आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यावर विराटने भुवनेश्वर कुमारसोबत 67 धावांची अभेद्य भागीदारी करत भारताची धावसंख्या तीनशेपार पोहोचवली. भारताने निर्धारीत 50 षटकात 6 बाद 303 धावा फटकावल्या. विराट 159 चेंडूत 12 चौकार आणि 2  उत्तुंग षटकारांसह 160 धावा काढून नाबाद राहिला.  तर भुवनेश्वर कुमार 16 धावांवर नाबाद राहिला.  
 


Web Title: Virat Kohli hits century!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.