विराटला संघात घेतल्याने मला निवड समितीतून काढलं होतं; वेंगसरकरांचा श्रीनिवासन यांच्यावर निशाणा

निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 08:47 AM2018-03-08T08:47:59+5:302018-03-08T14:25:15+5:30

whatsapp join usJoin us
Vengsarkar's decision to take Virat Kohli in team | विराटला संघात घेतल्याने मला निवड समितीतून काढलं होतं; वेंगसरकरांचा श्रीनिवासन यांच्यावर निशाणा

विराटला संघात घेतल्याने मला निवड समितीतून काढलं होतं; वेंगसरकरांचा श्रीनिवासन यांच्यावर निशाणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली. निमित्त होते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रथमच देण्यात येणाऱ्या क्रीडा पत्रकार पुरस्कार वितरणाचे. माजी कसोटीपटू व यष्टिरक्षक फारुख इंजीनिअर हेदेखील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

वेंगसरकर यावेळी म्हणाले की, दोन वर्षे भारतीय क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष होतो. ही जबाबदारी माझ्या कारकीर्दीतील सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती. तेव्हा ऑस्ट्रेलियात उदयोन्मुख खेळाडूंची स्पर्धा होत असे. त्यात भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असे संघ खेळत. त्यात आम्ही २३ वर्षांखालील संघ घेऊन जायचे ठरवले. तेव्हा १९ वर्षांखालील विश्वचषकही जिंकलो होतो. त्या संघाचा कर्णधार विराट कोहलीला आम्ही त्या स्पर्धेसाठी निवडले. त्यात विराटने १२३ धावांची नाबाद खेळी केली होती. विराटमध्ये निश्चितच काहीतरी आहे, याची खात्री पटली. म्हणून श्रीलंकेच्या पुढील दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघात विराटची निवड करण्याचे आम्ही ठरवले. त्याचा तिथे कस पाहता येईल, अशी अपेक्षा होती. संघप्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी तेव्हा सांगितले की, आम्ही त्याला खेळताना पाहिलेले नाही. त्यामुळे त्याला संघात घेऊ नये. पण हे सगळे त्या संघात तामिळनाडूच्या बद्रिनाथला संघात घेण्यासाठी चालले होते, हे लक्षात येत होते. तेव्हा बद्रिनाथ चेन्नई सुपर किंग्जला खेळत होता आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे खजिनदार म्हणून एन. श्रीनिवासन होते. ते तामिळनाडूचे अध्यक्षही होते. 

मी विराटला संघात घेतल्यानंतर बद्रिनाथला बाहेर बसावे लागले. श्रीनिवासन यांनी त्याबद्दल मला जाब विचारला, तेव्हा विराटला संघात घेणे कसे आवश्यक होते हे मी सांगितले. पण ते तडकाफडकी के. श्रीकांतला घेऊन तत्कालिन बोर्ड अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेले आणि मला निवड समितीतून बाहेरचा रस्ता दाखविला. श्रीकांत हा त्यानंतर निवड समिती अध्यक्ष झाला होता.

वेंगसरकर आणि फारुख इंजीनिअर यांनी अशा अनेक किश्श्यांनी या सोहळ्यात रंगत भरली. सूत्रसंचालक अश्विन बापट यांनी या दोघांनाही बोलते केले. विशेष म्हणजे फारुख इंजीनिअर यांनी मराठीतून उपस्थितांशी संवाद साधला. खवय्येगिरी, मुंबई क्रिकेटची अवस्था, विंडीज दौऱ्यातील वेगवान गोलंदाजीचा सामना, चंद्रशेखर यांची गोलंदाजी, टी-२० क्रिकेट अशा विविध विषयांवर या मान्यवरांनी आपली दिलखुलास मते व्यक्त केली. 

फारुख इंजीनिअर यांनी कसोटी क्रिकेट हेच सर्वोत्तम क्रिकेट असल्याचे सांगितले. सध्या कसोटीपेक्षा आयपीएलकडे खेळाडू अधिक आकर्षित होत असल्याचे खंतही त्यांनी बोलून दाखविली. तर कसोटी क्रिकेट नसेल तर क्रिकेटच मृत्युपंथाला जाईल, असा इशारा वेंगसरकर यांनी दिला. 

यावेळी माजी कसोटीपटू सुधीर नाईक, क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी, बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी, कॅरम संघटक अरुण केदार आदि अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.   

Web Title: Vengsarkar's decision to take Virat Kohli in team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.