तिरंगी टी२० मालिका : बांगलादेशवर दमदार विजय

शिखर धवनने सलग दुसºया सामन्यात झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिरंगी टी२० मालिकेत पहिला विजय मिळवताना बांगलादेशचा ६ बळींनी पराभव केला. १३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १८.४ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १४० धावा केल्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:27 AM2018-03-09T02:27:00+5:302018-03-09T02:30:58+5:30

whatsapp join usJoin us
Tricolor T20 Series: Strong Victory in Bangladesh | तिरंगी टी२० मालिका : बांगलादेशवर दमदार विजय

तिरंगी टी२० मालिका : बांगलादेशवर दमदार विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलोंबो - शिखर धवनने सलग दुसºया सामन्यात झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिरंगी टी२० मालिकेत पहिला विजय मिळवताना बांगलादेशचा ६ बळींनी पराभव केला. १३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १८.४ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १४० धावा केल्या. धवनने पुन्हा एकदा शानदार अर्धशतक झळकावताना ४३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली. 
प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या हा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण होता. सलामीला यजमान श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर विजयी मार्गावर येण्यासाठी भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धचा विजय अनिवार्य होता. यावेळी सर्वांच्या नजरा हिटमॅन रोहित शर्माकडे लागल्या होत्या. खराब फॉर्मच्या गर्तेत सापडलेल्या रोहितने आपल्या लौकिकाप्रमाणे आक्रमक सुरुवात केलीही, परंतु मोठी खेळी करण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. मुस्तफिझूर रहमानने त्याला त्रिफळाचीत करत भारताला पहिला धक्का दिला. रोहित १३ चेंडूत ३ चौकारांसह १७ धावा काढून परतला. यानंतर युवा फलंदाज रिषभ पंत (७) पुन्हा एकदा चमक दाखवण्यात अपयशी ठरला. यामुळे भारताचा डाव सहाव्या षटकात २ बाद ४० धावा असा घसरला.
मात्र, धवन - सुरेश रैना या अनुभवी फलंदाजांनी सर्व सूत्रे आपल्याकडे घेत भारताला विजयी मार्गावर आणले. या दोघांनी ६८ धावांची भागीदारी करुन संघाला सुस्थितीत आणले. रैनाने संयमी परंतु दमदार फलंदाजी केली. रुबेल हुस्सैनने रैनाला बाद करुन ही जोडी फोडली. रैनाने २७ चेंडूत १ चौकार व एका षटकारासह २८ धावा केल्या. मात्र, एका बाजूने टिकून राहिलेल्या धवनने ‘गब्बर’ फटकेबाजी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. भारताचा विजय १७ धावा दूर असताना धवन बाद झाला. परंतु, मनिष पांडेने १९ चेंडूत ३ चौकारांसह नाबाद २७ धावा फटकावत भारताला विजयी केले. (वृत्तसंस्था)

तत्पूर्वी, सलामीच्या सामन्यातील चुका टाळून गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित माºयाच्या जोरावर भारताने बांगलादेशला २० षटकात ८ बाद १३९ धावा असे रोखले. जयदेव उनाडकटने ३ आणि विजय शंकरने २ बळी घेत बांगलादेशला आक्रमणाची फारशी संधी दिली नाही. दरम्यान भारतीयांनी नियंत्रित मारा केला असला तरी, १५ अवांतर धावांची खैरात करत बांगलादेशच्या धावसंख्येत हातभारही लावला.

तमिम इक्बाल (१५), सौम्य सरकार (१४), मुशफिकर रहिम (१८) हे प्रमुख फलंदाज झटपट परतल्याने बांगलादेश संघ दडपणाखाली आला. मात्र, एकाबाजूने टिकून राहिलेल्या लिटॉन दास याने ३० चेंडूत ३ चौकारांसह ३४ धावा करत संंघाला सावरले. त्याचप्रमाणे, शब्बीर रहमान यानेही दासला चांगली साथ देत २६ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह महत्त्वपूर्ण ३० धावांची खेळी केली.

परंतु, ठराविक अंतराने बळी गेल्याने बांगलादेशला मोठी धावसंख्या रचता आली नाही. उनाडकटने ४ षटकात ३८ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत बांगलादेशला मर्यादित धावसंख्येत रोखण्यात मोलाचे योगदान दिले. विजय शंकरनेही ४ षटकात ३२ धावांत २ बळी घेत उनाडकटला चांगली साथ दिली. शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

सलामीच्या सामन्यात
यजमान श्रीलंकेविरुद्ध
झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने सावध खेळ केला. कर्णधार रोहित शर्माने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोलंदाजांनी
अपेक्षित कामगिरी केली. असे असले तरी क्षेत्ररक्षकांकडून मोक्याच्यावेळी झालेल्या चुकांमुळे बांगलादेशला फायदाही झाला. अन्यथा त्यांची धावसंख्या आणखी कमी झाली असती.

सामनावीर विजय शंकर

९व्या आणि ११व्या षटकात शंकरने अनुक्रमे मुशफिकुर आणि महमुदुल्लाह या प्रमुख फलंदाजांना बाद केल्याने बांगलादेशच्या धावसंख्येला ब्रेक लागला. याच कामगिरीसाठी शंकरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

धावफलक

बांगलादेश : तमिम इक्बाल झे. उनाडकट गो. शार्दुल १५, सौम्य सरकार झे. चहल गो. उनाडकट १४, लिटॉन दास झे. रैना गो. चहल ३४, मुशफिकुर रहिम झे. कार्तिक गो. शंकर १८, महमुदुल्लाह झे. शार्दुल गो. शंकर १, शब्बीर रहमान झे. कार्तिक गो. उनाडकट ३०, मेहेदी हसन झे. मनिष गो. उनाडकट ३, टस्किन अहमद नाबाद ८, रुबेल हुस्सैन धावबाद (रैना - ठाकूर) ०, मुस्तफिझूर रहमान नाबाद १. अवांतर - १५. एकूण : २० षटकात ८ बाद १३९ धावा. बाद क्रम : १-२०, २-३५, ३-६६, ४-७२, ५-१०७, ६-११८, ७-१३४, ८-१३५. गोलंदाजी : जयदेव उनाडकट ४-०-३८-३; वॉशिंग्टन सुंदर ४-०-२३-०; शार्दुल ठाकूर ४-०-२५-१; युझवेंद्र चहल ४-०-१९-१; विजय शंकर ४-०-३२-२. भारत : रोहित शर्मा त्रि. गो. मुस्तफिझूर १७, शिखर धवन झे. दास गो. टस्किन ५५, रिषभ पंत त्रि.गो. हुस्सैन ७, सुरेश रैना झे. हसन गो. हुस्सैन २८, मनिष पांडे नाबाद २७, दिनेश कार्तिक नाबाद २. अवांतर - ४. एकूण : १८.४ षटकात ४ बाद १४० धावा. बाद क्रम : १-२८, २-४०, ३-१०८, ४-१२३. गोलंदाजी : मुस्तफिझूर रहमान ४-०-३१-१; तस्किन अहमद ३-०-२८-१; रुबेल हुस्सैन ३.४-०-२४-२; मेहदी हसन ४-०-२१-०; सौम्य सरकार १-०-८-०; महमुद्दुलाह १-०-११-०; नझमुल इस्लाम २-०-१५-०.

Web Title: Tricolor T20 Series: Strong Victory in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.