भारत आज किवींविरुद्ध लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार

न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेतील निर्णायक सामन्यात भारतीय संघ ग्रीन पार्कवर विजयी लय कायम राखण्याच्या, तसेच मालिका विजयाच्या निर्धारासह उतरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 03:31 AM2017-10-29T03:31:45+5:302017-10-29T03:32:09+5:30

whatsapp join usJoin us
Today India will be determined to maintain the target against Kiwi | भारत आज किवींविरुद्ध लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार

भारत आज किवींविरुद्ध लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कानपूर : न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेतील निर्णायक सामन्यात भारतीय संघ ग्रीन पार्कवर विजयी लय कायम राखण्याच्या, तसेच मालिका विजयाच्या निर्धारासह उतरणार आहे. पहिल्याच सामन्यात झालेल्या पराभवानंतर दडपणात आलेल्या भारतीय संघाने स्वत:ला सावरताना दुसºया वन-डेत शानदार खेळाच्या बळावर विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. आज निर्णायक लढतीत विराट कोहली अ‍ॅन्ड कंपनी सलग सातव्या मालिका विजयासाठी खेळणार असून कानपूरच्या मैदानावर प्रथमच विद्युत प्रकाशझोतात सामना खेळविला जात आहे. न्यूझीलंडवर दुसºया वन-डेत सहा गड्यांनी मिळविलेल्या विजयाबद्दल कोहली म्हणाला, ‘पुण्यात आम्ही मुसंडी मारली. आव्हान पेलण्यास सज्ज आहोत. कानपूरमध्ये विजयासाठीच खेळू. येथे थंड हवामान आहे, पण दोन्ही संघ गुरुवारी दाखल झाल्याने वातावरणाशी एकरूप होण्यास खेळाडूंना पुरेसा वेळ मिळाला.’
पुण्यात गोलंदाजांनी अर्धे काम सोपे केल्यानंतर फलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडली होती. आजच्या सामन्यातदेखील कोहली विजयी संघ उतरविण्याच्या विचारात आहे. तरीही कुलदीपला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळते का, हे पाहणे रंजक ठरेल. पुण्यात चौथ्या स्थानावर फलंदाजीला आलेला दिनेश कार्तिक याने नाबाद ६४ धावा ठोकल्या होत्या. २०१५ च्या विश्वचषकापासून चौथ्या स्थानावर फलंदाज कोण हे तपासण्यासाठी आतापर्यंत ११ जणांना संधी देण्यात आली. कार्तिकने त्या स्थानासाठी दावेदारी सिद्ध केली आहे. शिखर धवनने ६ डावानंतर अर्धशतक ठोकले. पण रोहित शर्माने दोन्ही सामन्यांत लौकिकानुसार खेळ केला नाही. मालिका जिंकण्याची न्यूझीलंडलाही संधी असेल.

कोहलीची सरावाला दांडी
कानपूर : कर्णधार कोहलीसह जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या अशा पाच भारतीय खेळाडूंनी आज संघाच्या ऐच्छिक सरावास दांडी मारली. अक्षर पटेलदेखील सरावात दिसला नाही. नेट्समध्ये धवनने दीर्घ काळ फलंदाजी केली. पाहुण्या संघाने मात्र तब्बल तीन तास
सराव करीत बराच घाम गाळला.

तणाव नव्हे, उत्साह : साऊदी
भारताविरुद्ध निर्णायक लढत जिंकण्याचे दडपण नाही. आम्ही तणावात नसून आमच्या तंबूत उत्साह असल्याचे न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदी याने सांगितले. न्यूझीलंडने हा सामना जिंकल्यास भारतात पहिल्यांदा वन-डे मालिका जिंकेल. आमच्यावर विजयाचे दडपण नाही.

संघात उत्साह आहे. भारतातून अनेक चांगले संघ रिकाम्या हाताने परतले. आम्ही मात्र मालिका जिंकण्यासाठी आलो आहोत. दोन्ही संघांना सारखी संधी असून आम्हाला परिस्थितीशी ताळमेळ साधावा लागेल. मुंबईच्या तुलनेत पुणे आणि कानपूरच्या हवेत गारवा असल्याचे साऊदीने आवर्जून सांगितले.

घरच्या मैदानावर खेळण्याची इच्छा
न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाल्यास सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने व्यक्त केला. कुलदीपने बालपणी क्रिकेटचे धडे याच मैदानावर घेतले. आज रविवारी याच मैदानावर खेळण्याबद्दल उत्साही आहे.
‘जगात कुठेही खेळा पण आपल्या चाहत्यांपुढे खेळण्याचा आनंद वेगळाच असतो. अंतिम एकादशमध्ये निवड झाल्यास डावपेच मैदानावरच ठरवेन. येथील खेळपट्टीची खडान्खडा माहिती आहे. मी येथे खूप क्रिकेट खेळलो आहे.’ कुलदीप काल कानपूरनजीकच्या जाजमऊ येथील स्वत:च्या घरी जाऊन आला. अनेक दिवसांनंतर आलेल्या कुलदीपने आईच्या हातचे जेवण घेतले. वडील आणि बहिणींची विचारपूस केली. बराच वेळ सर्वांसोबत गप्पा मारल्यानंतर तो रवाना झाला. 


‘चेंडू स्विंग करणे यशाचे रहस्य’
कानपूर : पूर्वीच्या तुलनेत मी अधिक वेगवान मारा करायला शिकलो. वेगवान चेंडू हवेत अधिक स्विंग करणे हेच माझ्या यशाचे रहस्य असून दोन वर्षांपूर्वीपेक्षा अधिक भेदक मारा करू शकतो, असे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने म्हटले आहे. भुवीने जसप्रीत बुमराहसोबत वन-डेमध्ये भारतीय संघासाठी नव्या चेंडूवर प्रभावी मारा केला आहे. यॉर्करमधील विविधता तसेच चेंडूच्या वेगावरील नियंत्रणामुळे तो ‘डेथ ओव्हरमधील’ प्रभावी गोलंदाज बनला. चेंडूला अधिक वेग देण्याच्या प्रयत्नांत भुवीने सुरुवातीला नैसर्गिक क्षमता घालविली होती, पण कोच भरत अरुण यांनी त्याचा आत्मविश्वास परत आणल्याने या गोलंदाजाला पुन्हा सूर गवसला.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कॉलीन डी ग्रॅन्डहोमे, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, अ‍ॅडम मिल्ने, कॉलीन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटेनर, टीम साऊदी, रॉस टेलर, जॉर्ज वर्कर आणि ईश सोढी.

Web Title: Today India will be determined to maintain the target against Kiwi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.