तिरुवनंतरपुरम : भारतीय संघ आज (मंगळवारी) न्यूझीलंडविरुद्ध तिस-या व निर्णायक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात मालिका विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. या लढतीत महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजी क्रमावर सर्वांची नजर राहणार आहे. दरम्यान, या लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. मालिका १-१ ने बरोबरीत असून, यापूर्वी भारत-आॅस्ट्रेलिया मालिकेप्रमाणे या मालिकेच्याही अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चांगल्या फॉर्मात आहे. पण न्यूझीलंडने पहिल्या वन-डे व त्यानंतर टी-२० मालिकेत चांगली टक्कर दिली आहे.
या शहरात जवळजवळ तीन दशकानंतर (२९ वर्षे) आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन होत आहे. धोनीला सर्वात जलद क्रिकेट प्रकारात बदलण्याच्या मागणीला अधिक जोर धरल्यामुळेही ही लढत महत्त्वाची आहे. भारताने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला होता. पण दुस-या लढतीत संघाला ४० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत कोलिन मुन्रोने शतकी खेळी करीत यजमान संघाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. फलंदाजीमध्ये कोहलीने ४२ चेंडूंमध्ये ६५ धावा फटकावल्या. पण उर्वरित फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. क्षेत्ररक्षकांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

भारताला झेल सोडण्याची झळही बसली, तर न्यूझीलंडने पदार्पणाची लढत खेळणाºया मोहम्मद सिराजला लक्ष्य केले. जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार यांनी प्रभावी गोलंदाजी केल्यामुळे, भारत न्यूझीलंडला दोनशे धावांच्या आत रोखण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे संघव्यवस्थापन सिराजला आणखी एक संधी देते की त्याच्या स्थानी अतिरिक्त फलंदाज खेळविते, याबाबत उत्सुकता आहे. राजकोटमध्ये पराभवानंतर कोहलीने फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरल्याचे कबूल केले होते. सर्व खेळाडूंकडून योगदान अपेक्षित असल्याचे त्याने म्हटले होते.

न्यूझीलंडने मालिकेची सुरुवात जागतिक क्रमवारीतील अव्वल टी-२० संघ म्हणून केली होती. पण त्यानंतर त्यांची क्रमवारीत घसरण झाली आणि पाक संघ अव्वल स्थानी आला. न्यूझीलंडला अखेरच्या लढतीत भारताचा पराभव करीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविण्याची संधी आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला तर फिरकीपटू व वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. बोल्टने राजकोटमध्ये एकाच षटकात सलामीवीर शिखर धवन व रोहित शर्मा यांना तंबूचा मार्ग दाखवीत भारताच्या आघाडीच्या फळीला धक्के दिले. युवा फलंदाज श्रेयस अय्यरने २३ धावांच्या खेळीमध्ये काही उपयुक्त फटके मारले, पण त्यानंतर चुकीचा फटका खेळून माघारी परतला. अष्टपैलू हार्दिक पांड्या गेल्या काही लढतींमध्ये अपयशी ठरला आहे, पण कर्णधाराने त्याची पाठराखण केली आहे. मंगळवारच्या लढतीत पांड्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे.

बुमराहने आपल्या शैलीवर बरीच मेहनत घेतली : भुवनेश्वर
जसप्रीत बुमराहची भारताचा स्ट्राईक गोलंदाज म्हणून होत असलेली प्रगती अनुभवणाºया भुवनेश्वर कुमारने म्हटले, की गुजरातच्या या गोलंदाजाने आपल्या शैलीवर बरीच मेहनत घेतली असून, त्याचा त्याला लाभ मिळत आहे. बुमराहच्या यशाचे रहस्य विचारले असता भुवनेश्वर म्हणाला, ‘बुमराहची शैली वेगळी आहे, त्यामुळे फलंदाजांना अडचण येते. त्याने आपल्या शैलीवर बरीच मेहनत घेतली आहे. त्याच्या भात्यात सुरुवातीला यॉर्कर आणि स्लोअर चेंडू हे अस्त्र होतेच, पण यात आता आणखी भेदकता आली आहे. बुमराह डेथ ओव्हर्समध्ये चांगला मारा करू शकतो, असा मला विश्वास आहे.’
भुवनेश्वर म्हणाला, ‘ज्या वेळी तुम्ही बुमराहसोबत गोलंदाजी करता त्या वेळी डेथ ओव्हर्समध्ये धावा वाचविण्याचा आणि त्याचप्रमाणे तुम्हाला योग्य सहकार्य मिळेल, याचा विश्वास असतो. सामना सुरू असताना आम्ही मैदानावर चर्चा करतो आणि रणनीती निश्चित करतो. त्याचा आम्हाला लाभ होतो.’

गोलंदाजी करताना लय खूप महत्त्वाची असते. ईशने शानदार लयीमध्ये मारा केला, ज्यामुळे भारतीय फलंदाजांना अडचणी आल्या. मीदेखील असाच मारा करण्याचा प्रयत्न केला. अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल यांनीही दिल्लीमध्ये चांगला मारा केला होता. मात्र, मागच्या सामन्यात त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. आम्ही प्रत्येक सामन्याकडे नव्याने पाहतो. दोन सामने गमावण्यापेक्षा बरोबरी साधणे चांगले आहे. पुढील निर्णायक सामन्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत.
- मिशेल सँटनर, फिरकीपटू, न्यूझीलंड


प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, यजुवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि लोकेश राहुल.
न्यूझीलँड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, टॉम ब्रूस, कोलिन डी ग्रँडहोम, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अ‍ॅडम मिल्ने, कोलिन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटेनर, ईश सोढी, टीम साऊदी आणि रॉस टेलर.

सामना : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजल्यापासून. स्थळ : ग्रीनफिल्ड स्टेडियम तिरूवनंतपुरम.