Third Test drawn; DeSilva, Roshan Silva defeated, defeated India's series against Sri Lanka | तिसरी कसोटी अनिर्णीत; डीसिल्व्हा, रोशन सिल्व्हा यांनी टाळला पराभव, भारताचा श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय

नवी दिल्ली : धनंजय डीसिल्व्हाच्या शतकापाठोपाठ पदार्पण करणारा रोशन सिल्व्हाच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेला तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यात बुधवारी यश आले. मात्र, नागपूर कसोटीतील विजयाच्या जोरावर भारताने ३ सामन्यांची ही मालिका १-० अशी जिंकली.
या विजयामुळे आॅस्ट्रेलियाच्या सलग नऊ कसोटी मालिका जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरीही साधली आहे. आॅस्ट्रेलियाने हा विक्रम २००५ ते २००८ या कालावधीत केला होता. भारताची विजयी मोहीम २०१५ मध्ये लंकेच्या भूमीतून सुरू झाली. तेव्हापासून विजयाची घोडदौड सुरूच आहे. डीसिल्व्हाने निवृत्त होण्याआधी २१९ चेंडू टोलवत १५ चौकार आणि एका षटकारासह ११९ धावांचे योगदान दिले. कर्णधार दिनेश चंडीमलने ३६ धावा करीत पाचव्या गड्यासाठी ११२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोशनने १५४ चेंडूंचा सामना करीत ११ चौकारांसह नाबाद ७४ धावा ठोकल्या. निरोशन डिकवेलासोबत(नाबाद ४४) त्याने सहाव्या गड्यासाठी नाबाद ९९ धावांची भागीदारी करताच लंकेने ५ बाद २९९ पर्यंत मजल गाठून सामना अनिर्णीत राखला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने सामना थांंबविण्याचा निर्णय घेतला.
रवींद्र जडेजाने ५९ धावांत तीन आणि रविचंद्रन आश्विनने एक गडी बाद केला. रोशन आणि डिकवेला या दोघांनाही जीवदान देणाºया भारतीय क्षेत्ररक्षकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लागले. लंकेच्या फलंदाजांनी संकल्पासह खेळ केला. पहिल्या सत्रात त्यांनी एका गड्याच्या मोबदल्यात ८८, दुसºया सत्रात ३४ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात १०७ आणि नंतर अखेरच्या सत्रात २२ षटकांत बिनबाद ७३ धावा वसूल केल्या. ३ बाद ३१ वरून सुरुवात करणाºया लंकेचा सकाळच्या सत्रात अँजेलो मॅथ्यूज (१) हा एकमेव फलंदाज बाद झाला. दिल्लीत आज ऊन पडले होते शिवाय प्रदूषणाचा स्तर कमी होता. डीसिल्व्हाने १८८ चेंडूत तिसरे कसोटी शतक पूर्ण केले. गेल्या १० वर्षांत विदेशात चौथ्या डावात शतकी खेळी करणारा लंकेचा तो पहिलाच फलंदाज बनला. अखेरच्या सत्रात मैदानात दोनदा पतंग आल्यामुळे खेळ थांबवावा लागला. लंकेकडून भारतात चौथ्या डावात आज सर्वाधिक धावसंख्येच्या विक्रमाची नोंद झाली. वेस्ट इंडिजने १९८७ साली या मैदानावर ५ बाद २७६ धावा करीत विजय नोंदविला होता.

कसोटीतही वन- डेसारखाच खेळ : विराट
‘कसोटी सामना असो की वन डे मी दोन्ही प्रकारांत एकसारखाच चेंडू टोलवितो. सुरुवातीला चाचपडत होतो, पण नंतर ध्यानात आले की कसोटीतही वेगाने धावा काढता येतात. वेगवान खेळ ही माझ्यासाठी नवी बाब नसल्याचे ३ शतकांसह ६१० धावा ठोकून सामनावीर व मालिकावीर पुरस्कार मिळविणाºया कोहलीने सांगितले.

....तर सामना गमावला असता
‘ड्रॉच्या इराद्याने खेळलो असतो तर सामना गमावला असता. आम्ही विजयाच्या निर्धाराने खेळलो. सहकाºयांची ही भूमिका आवडली. पुढील मालिकांमध्ये याच निर्धारासह खेळणार आहोत. कसोटीत विजय मिळवायचा झाल्यास गोलंदाजी सुधारावीच लागेल. कसोटी जिंकण्यासाठी २० गडी बाद करणारे गोलंदाज हवेत. आमच्या संघात प्रतिभावान आणि शिस्तप्रिय खेळाडू असल्याने नव्या वर्षात संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल.’ - दिनेश चंडीमल, कर्णधार, श्रीलंका

स्लिपमध्ये झेल घेण्यावर भर
‘या सामन्यात क्षेत्ररक्षण खराब झाले. आम्ही स्लिपमध्ये झेल घेण्यावर भर देत आहोत. लंकेच्या दोन फलंदाजांना झेल सोडून जीवदान दिले नसते तर निकाल वेगळा असता. स्लिपमधील क्षेत्ररक्षण सुधारल्यास विजयाचे अर्धे काम सोपे होऊ शकते. क्षेत्ररक्षणात तांत्रिकदृष्ट्या कुठे कमी पडतो, हे शोधण्यास प्राधान्यक्रम दिला जाईल. द. आफ्रिका दौºयावर रवाना होण्याआधी या उणिवा दूर होणे गरजेचे आहे.’ - चेतेश्वर पुजारा

प्रदूषणामुळे खेळणे कठीण : कोटला मैदानावर प्रदूषणामुळे खेळणे कठीण झाले होते. श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. आम्ही दुसºया दिवसापासून मास्क घालणे पसंत केले तरीही काही खेळाडू आजारी पडले. पण संघर्ष करीत सामना वाचविणाºया सहकाºयांचे मी आभार मानतो, असे चंडीमल म्हणाला. प्रदूषण हा सर्वांच्याच चिंतेचा विषय असला तरी त्यामुळे सामना रद्द करणे परवडणारे नव्हते, असे बीसीसीआयचे ज्येष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले.

भारताची आॅस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी
भारताने आज लंकेविरुद्ध मालिका १-० अशी जिंकून सलग नऊ मालिका विजयाच्या आॅस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. सर्व मालिका विराट कोहलीच्याच नेतृत्वात जिंकल्या. भारताने मायदेशात सहा, श्रीलंकेत दोन आणि वेस्ट इंडिजमध्ये एक मालिका जिंकली आहे. यादरम्यान ३० पैकी २१ सामने भारताने जिंकले असून, दोन सामने गमावले. आजच्या विजयासह भारताने मायदेशात सलग आठवा मालिका विजय नोंदविला. मायदेशात २६ पैकी २० सामने जिंकण्याचा पराक्रमदेखील केला.


धावफलक
भारत पहिला डाव :
७ बाद ५३६ वर घोषित, श्रीलंका पहिला डाव: ३७३ धावा, भारत दुसरा डाव : ५ बाद २४६ वर घोषित, श्रीलंका दुसरा डाव : दिमुथ करुणारत्ने झे. ससाहा गो. जडेजा १३, सदीरा समरविक्रम झे. रहाणे गो. शमी ५, धनंजय डीसिल्व्हा निवृत्त ११९, सुरंगा लकमल त्रि. गो. जडेजा ००, अँजेलो मॅथ्यूज झे. रहाणे गो. जडेजा १, दिनेश चंडीमल त्रि. गो. आश्विन ३६, रोशन सिल्व्हा नाबाद ७४, निरोशन डिकवेला नाबाद ४४, अवांतर ७, एकूण १०३ षटकांत ५ बाद २९९ धावा. गोलंदाजी: ईशांत १३-२-३२-०, शमी १५-६-५०-१, आश्विन ३५-३-१२६-१, जडेजा १-०-३-०, विजय १-०-३-०, कोहली १-०-१-०.