तिसरी वन-डे आज : लंकेविरुद्ध भारताचे पारडे जड, मालिकाविजयावर नजर

विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या वन-डेत भारतीय संघ आज रविवारी विजय मिळविण्याच्या, तसेच मालिका खिशात घालण्याच्या निर्धारासह खेळणार आहे. या मैदानावर भारताने २०१५ चा अपवाद वगळता सामना गमाविलेला नाही, हे विशेष.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 05:55 AM2017-12-17T05:55:05+5:302017-12-17T05:55:05+5:30

whatsapp join usJoin us
Third ODI: Today's Indian heavyweights against Sri Lanka, | तिसरी वन-डे आज : लंकेविरुद्ध भारताचे पारडे जड, मालिकाविजयावर नजर

तिसरी वन-डे आज : लंकेविरुद्ध भारताचे पारडे जड, मालिकाविजयावर नजर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या वन-डेत भारतीय संघ आज रविवारी विजय मिळविण्याच्या, तसेच मालिका खिशात घालण्याच्या निर्धारासह खेळणार आहे. या मैदानावर भारताने २०१५ चा अपवाद वगळता सामना गमाविलेला नाही, हे विशेष. दुसरीकडे आठ मालिका गमाविणारा लंकेचा संघदेखील पहिल्यांदा द्विपक्षीय मालिका जिंकण्याच्या आशेने उतरणार आहे.
मोहालीत कर्णधार रोहित शर्माच्या द्विशतकी खेळीच्या बळावर भारताने सहज विजय नोंदविला. त्याआधी धर्मशालातील पहिला सामना लंकेने जिंकला होता.
भारताने विशाखापट्टणममध्ये सात सामने खेळले. केवळ एक सामना गमावला. विजयाची घोडदौड कायम राखण्याच्या इराद्यानेच
विराट अ‍ॅन्ड कंपनी खेळणार, यात शंका नाही.
धर्मशाला येथे अवघ्या ११२ धावांत गारद झालेल्या भारताने नंतर फलंदाजीत वर्चस्व स्थापन केले. रोहितने स्वत: चौफेर फटकेबाजी केली, तर श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांचीही बॅट तळपली. मधल्या फळीत दिनेश कार्तिक, मनीष पांडे दमदार खेळी करण्यास सक्षम आहेत. अजिंक्य रहाणे याला मात्र पुन्हा एकदा बाहेर बसावे लागेल. गोलंदाजांनीदेखील आतापर्यंत सरस कामगिरी केली असून कामगिरीच्या पुनरावृत्तीची त्यांच्याकडून अपेक्षा असेल. येथील खेळपट्टी मात्र फलंदाजांना पूरक मानली जात आहे.
अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजची उपलब्धता ही लंकेसाठी आनंदाची बाब आहे. त्याच्यामुळे गोलंदाजी भक्कम होईल, शिवाय मोहालीतील शतकी खेळीची त्याच्याकडून पुनरावृत्ती होईल, अशी संघव्यवस्थापनाला आशा आहे. उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलक आणि निरोशन डिकवेला यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवला. त्यांनाही सुधारणा करावीच लागेल. (वृत्तसंस्था)

बीसीसीआयच्या डीआरएस कार्यशाळेत १२ पंच
बीसीसीआयने शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या डीआरएस कार्यशाळेत १२ स्थानिक पंच सहभागी झाले आहेत. डीआरएस प्रोटोकॉलबद्दल माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आयसीसी पंचांचे कोच डेनिस बर्न्स आणि आॅस्ट्रेलियाचे माजी खेळाडू, तसेच पंच पॉल रॅफेल यांनी मार्गदर्शन केले. येथे पहिल्यांदा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

फलंदाज चुकांपासून बोध घेत आहेत : शिखर धवन
हवेत वळण घेणाºया चेंडूवर फटका मारताना भारतीय फलंदाज आधी चाचपडायचे. या मालिकेतही कोलकाता येथील पहिली कसोटी आणि धरमशालातील पहिल्या वन-डेत केलेल्या चुकांपासून बोध घेत आमचे फलंदाज आता चांगली कामगिरी करीत असल्याचे मत सलामीवीर शिखर धवन याने व्यक्त केले.
वेगवान खेळपट्ट्यांवर पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या द. आफ्रिका दौºयात भारतीय फलंदाज कसा खेळ करतील, याबद्दल शंका उपस्थित होत आहे. यावर लंकेविरुद्ध तिसºया वन-डेपूर्वी धवन म्हणाला, ‘कोलकाता आणि धरमशाला येथे ज्या चुका झाल्या त्यातून बोध घेत मोहालीत कामगिरी सुधारली. चेंडू सुरुवातीला बॅटवर येत नव्हता. दडपणातही खेळपट्टीवर स्थिरावलो. दहा षटकांनंतर खेळाची दिशा बदलली.
रोहित आणि मी अनेक सामन्यांत सलामीला आलो आहोत. ज्या सलामीवीरांसोबत खेळलो त्यात रोहित सर्वोत्कृष्ट असल्याचे शिखरने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मालिकेतील निर्णायक सामन्यात दडपण असतेच पण भारतीय संघ आता दडपण झुगारायला शिकला आहे. लंका संघ मोहालीतील पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत असल्याने आम्हाला सावध खेळावे लागेल, असे शिखरने स्पष्ट केले.

अनुकूल परिस्थितीचा लाभ घेऊ : थिसारा परेरा
या शहरात आमच्या देशासारखे वातावरण आहे. या परिस्थितीचा लाभ घेत सामना व मालिका जिंकण्याची तयारी असल्याचे लंकेचा कर्णधार थिसारा परेरा याने म्हटले आहे.
तिसºया वन-डेच्या पूर्वसंध्येला परेरा म्हणाला, ‘या शहरातील हवामान लंकेसारखे आहे. मोहाली आणि धर्मशाला येथील वातावरण वेगळे होते. तिसºया सामन्यात अनुकूल हवामानाचा आम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मालिका जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला असल्याने विचार न करता आम्ही खेळणार आहोत. उलट भारतीय संघावर मालिका विजयाचे अधिक दडपण असेल.’ अंतिम संघ अद्याप निवडला नसून खेळपट्टी पाहिल्यानंतरच अंतिम एकादशचा निर्णय घेऊ, असे परेराने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

उभय संघ यातून निवडणार
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल व सिद्धार्थ कौल.
श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलका, लाहिरू थिरीमन्ने, असेला गुणरत्ने, सदिरा समरविक्रमा, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्व्हा, अँजेलो मॅथ्यूज, सचित पतिराना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, अकिला धनंजया, चतुरंगा डिसिल्व्हा, दुष्मंता चामिरा व कुसल परेरा.

Web Title: Third ODI: Today's Indian heavyweights against Sri Lanka,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.